चालू घडामोडी (18 एप्रिल 2016)
ओडिशात रेल्वे प्रकल्पासाठी एक नवी कंपनी :
- मागील काही दिवसांमध्ये ओडिशातील रेल्वे प्रकल्पांना त्यांच्या हक्काचा निधी मिळालेला नाही, यामुळे येथील गुंतवणुकीचा ओघ काहीसा थांबल्याचे दिसून येते.
- राज्यातील प्रकल्पांना गती यावी म्हणून केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने एक नवी कंपनी स्थापन केली जाईल आणि हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
- कलहांडीमधील नरला, गंजममधील सीतालापल्ली या ठिकाणी रेल्वे बोगी दुरुस्ती कारखाने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असून, यासाठी एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
- कलहांडी आणि गंजम जिल्ह्यांमधील प्रकल्पांबाबत पुढील महिनाभराच्या अवधीमध्ये संयुक्त कृती समिती निर्णय घेईल.
- तसेच हे प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
- मध्यंतरी रेल्वे मंत्रालयाने कलहांडीमधील एक प्रकल्प विशाखापट्टणमला नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओडिशामध्ये आंदोलनाचा भडका उडाला होता.
- तसेच त्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्राने संयुक्त कृती समिती नेमली आहे.
ऑस्ट्रेलियात अदानीच्या प्रकल्पाला मंजुरी :
- अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 21.7 अब्ज डॉलरच्या कोळसा खाणकाम प्रकल्पाला अखेर तेथील पारंपरिक मालकांची मंजुरी मिळाली आहे.
- तसेच त्यामुळे मूलनिवासी गटांचे या प्रकल्पासाठी संपुर्ण साह्य असल्याचे सूचित होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- वॅंगन अँड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) गटाने (दि.17) कंपनीसोबत झालेल्या बैठकीत बहुमताने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे.
- संपूर्ण समुदायाला, त्यांच्या मुलांना आणि नातवंडाना भविष्यात मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
- तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे.
- अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कारमायकेल हा जगातील सर्वांत मोठा खाण प्रकल्प सुरू करीत आहे.
टाटा समूहाच्या कंपन्यांना अमेरिकेत दंड :
- टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने 94 कोटी डॉलरचा (6200 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
- अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट‘ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल लागला आहे.
- टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसान भरपाई व 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश विस्कॉन्सिन राज्यातील ग्रँड ज्युरीने दिला आहे.
- ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
- कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टम्सने म्हटले होते.
टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नववे विजेतेपद :
- आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले नववे विजेतेपद जिंकले.
- राफेल नदालने गायलला 7-5, 5-7, 6-0 गुणांनी नमवित 28वे मास्टर्स टायटल जिंकले.
- तत्पूर्वी बलाढ्य राफेल नदालने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेला 2-1 असे नमवले.
- स्पेनच्या नदालने स्पर्धेतील आपला दबदबा सिद्ध करताना कसलेल्या मरेविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतरही विजय मिळवला.
- तसेच या स्पर्धेत 2005 ते 2013 पर्यंत सलग 46 सामने जिंकण्याचा पराक्रम केलेल्या नदलला अंतिम फेरीसाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले.
पाकमधील हिंदूंना भारतात मालमत्ता खरेदीची परवानगी :
- पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक वर्गात मोडणाऱ्या आणि व्हिसावर भारतात दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्या हिंदूंना या पुढे भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे आणि बॅंक खाते उघडण्याची परवानगी मिळणार आहे.
- तसेच पाकिस्तानातील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या या स्थलांतरितांची संख्या तब्बल दोन लाख इतकी असून त्यामध्ये बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे.
- तसेच यापैकी पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर, अहमदाबाद, राजकोट, कच्छ, भोपाळ, इंदौर यांसारख्या विविध शहरांमध्ये वास्तव्याला आहेत.
- दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना वेळोवेळी तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचा विचार करता सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.
फ्रान्सचे पथक भारतात येणार :
- फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याबाबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी पुढील महिन्यात फ्रान्सचे एक उच्चस्तरीय पथक भारतात दाखल होणार आहे.
- राफेल विमानांच्या किमतीबाबत भारत आणि फ्रान्समध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे बऱ्याच काळापासून हा करार पूर्णत्वाला जाऊ शकला नव्हता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी 36 राफेल विमानांची खरेदी करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर राफेलच्या किमतीवरून सुरू असलेली चर्चा अखेर शेवटाकडे आल्याचे संकेत मिळाले आहेत.
- तसेच त्यानंतर या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी फ्रान्सचे एक उच्चस्तरीय पथक पुढील महिन्यात भारतात येणार.
- विमानांची किमत कमी करण्यासाठी भारतातर्फे प्रयत्न केले जात होते. त्याला अखेरीस यश आले असून, या करारावर लवकरच स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान :
- अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन 2016’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या कन्या मंजिरी आणि अंजली यांनी स्वीकारला, तर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आपल्या पत्नीच्या साथीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
- सन्मानचिन्ह, मानपत्र, 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- (दि.16) सावरकर स्मारकात पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले.
- व्यंगचित्रकला हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. चार ते पाच अग्रलेखांत जे काम होत नाही, ते केवळ एका चित्रातून साध्य करता येते.
- तसेच हे संमेलन केवळ व्यंगचित्रकारांचे नाही, तर साहित्यिकांचेसुद्धा आहे.
दिनविशेष :
- 1336 : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
- जागतिक वारसा दिन (World Heritage Day)
- झिम्बाब्वे स्वातंत्र्य दिन.
- इराण सेना दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा