चालू घडामोडी (18 एप्रिल 2017)
सुखदेव निर्मळचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव :
- संगमनेर तालुक्यातील काकडवाडी सारख्या अगदी छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या, चरितार्थासाठी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर चालकाची नोकरी करणाऱ्या सुखदेव तात्याभाऊ निर्मळ या 32 वर्षाच्या तरुण संशोधकाचा फ्री वाल्व्ह इंजिन टेक्निक या संशोधनासाठी झी टीव्हीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंग इनोव्हेटर श्रेणीतील रँचो अॅवॉर्डने राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
- सुखदेव निर्मळ या सर्वसामान्य युवकाचा हा संशोधन प्रवास अगदी अद्भुत असा आहे. राजापूर (ता. संगमनेर) येथील महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुखदेवला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, घरच्या कोरडवाहू शेतीत लक्ष घालावे लागले.
- मात्र लहानपणापासून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिन बाबत प्रचंड आकर्षण होते. या छंदातून त्याने सर्व प्रकारची इंजिने अभ्यासली. त्यांच्या बाबत अधिकाधिक माहिती मिळवली, हाताळली.
- तसेच परिणामी त्यातील बारकावे माहीत झाल्याने इंजिनाची उपलब्ध असलेली कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग त्याने सुरू केले.
यशोवर्धन जुमळे करणार जर्मनीत भारताचे प्रतिनिधित्व :
- जर्मनी येथील हंबुर्ग शहरात सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा 2017 मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
- स्पर्धा 16 ते 18 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यजमान जर्मनीचा संघ, तर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, युक्रेन, अमेरिका व यूके या दिग्गज देशातील खेळाडूंना भारतातील खेळाडू टक्कर देत आहेत.
- यशोवर्धन हा अनुभवी खेळाडू असून, यापूर्वी त्याने चीन, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले आहे.
- मंदार याने आपल्या प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळविले आहे.
- स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू एकत्रित प्रो डबल व प्रो सिंगल या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.
- भारतीय टेबल सॉकर फेडरेशनचे महासचिव मनोज सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील एकूण 9 खेळाडूंचे पथक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट परवानाधारक कंपन्यांसाठी RBIची नवी मसुदा :
- रिझर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जारी केला असून, या मसुद्याबाबत पेटीएमसह अन्य मोबाइल वॉलेट कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
- पेटीएम आणि मोबीक्विक यासारख्या मोबाइल वॉलेट कंपन्यांसाठी हे प्रस्तावित नियम जाचक ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी एक महत्त्वाची बैठक गेल्या आठवड्यात घेतली.
- कंपन्यांनी प्रामुख्याने केवायसीविषयक नियमांवर चर्चा केली. केवायसीविषयक नियम छोट्या व्यवहारांसाठी अतिशयोक्त ठरतील. छोटे आर्थिक व्यवहार बंदच होण्याचा धोका आहे, असे कंपन्यांना वाटते.
- रिझर्व्ह बँकेने मात्र, प्रस्तावित नियमांबाबत ठाम भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
भविष्य निर्वाह निधीवर व्याज मिळणार :
- भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वर 8.65 टक्के व्याज मिळण्याच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
- 2016-17 या वर्षासाठी पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील 4 कोटी ईपीएफओ सदस्यांना मिळणार आहे.
- सदस्यांना व्याज मिळावे या दृष्टीने तुमच्या कडे निधी आहे की नाही याकडे लक्ष ठेवावे अशी सूचना अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला दिली आहे.
- पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळावे अशी सूचना ईपीएफओ ट्रस्टीजने केली होती. हे व्याज कमी करावे असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. व्याजदर वाढवल्यास सरकारी तिजोरीवर ताण पडेल असे अर्थमंत्रालयाचे म्हणणे होते.
दिनविशेष :
- 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन (World Heritage Day) म्हणून साजरा करतात.
- दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना 18 एप्रिल 1336 मध्ये झाली.
- 18 एप्रिल 1898 हा चाफेकर बंधू यांचा स्मृतीदिन आहे.
- प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचा जन्म 18 एप्रिल 1910 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा