चालू घडामोडी (18 मार्च 2017)
त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री :
- उत्तराखंड भाजपचे माजी अध्यक्ष त्रिवेंद्रसिंग रावत 18 मार्च रोजी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्रिवेंद्रसिंग रावत त्यांच्या डोईवाला या पारंपारिक मतदारसंघातुन 24,000 मतांनी निवडुन आले आहेत.
- 17 मार्चला डेहराडूनमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंदसिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे.
- त्रिवेंद्रसिंग रावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने उत्तराखंडमधील 70 पैकी 57 जागांवर विजय मिळवला.
शिवाजी, म्याँगजी विद्यापीठाचा सामंजस्य करार :
- शिवाजी विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील म्याँगजी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. शैक्षणिक, संशोधन क्षेत्रांतील संबंध अधिक बळकट करण्यासह, दोन्ही विद्यापीठांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी हा करार केला आहे.
- विद्यापीठाच्या नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात या करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि म्याँगजी विद्यापीठातर्फे प्रा. डॉ. जिआँग गिल सिओ यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
- तसेच यावेळी नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाचे समन्वयक प्रा.डॉ. पी.एस पाटील, संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रा.डॉ. डी.टी. शिर्के, आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक ए.व्ही. घुले उपस्थित होते.
- कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, या करारामुळे दक्षिण कोरिया आणि शिवाजी विद्यापीठाचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.
- डॉ. सिओ म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी दक्षिण कोरियात उत्तम संशोधकीय योगदान देत असून, या कराराच्या माध्यमातून सहकार्यवृद्धी होत आहे.
बुलढाण्यात होणार पहिले जिल्हा मराठी संमेलन :
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी 26 मार्च रोजी पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड असणार आहेत.
- करवंड येथील परिसराला ‘राजमाता जिजाऊ साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन 26 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल.
- तसेच ‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शासनासह प्रसारमाध्यमे, लेखक, कलावंत, उदासीन होत आहेत’ या विषयावर टॉक शो होणार आहे. तर या संमेलनात बालमेळावाही आयोजित केला आहे.
पाचवे व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीमध्ये :
- देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या वेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील राहणार आहेत.
- 19 आणि 20 मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या 25 व्यक्ती तसेच 16 संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 मध्ये झाले.
- 18 मार्च 1919 मध्ये ‘रौलेट अॅक्ट’ पास झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा