चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2017)
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण :
- तब्बल 56 वर्षे रेंगाळलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण झाले.
- 17 सप्टेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण झाले असून काँग्रेसच्या काळात सुरु झालेला हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी भाजप सरकारनेही प्रयत्न केले होते.
- सरदार सरोवर प्रकल्प हे जगातील दुसरे सर्वात मोठे धरण ठरले आहे.
- 56 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर विस्थापीतांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.
- प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे हक्क व मागण्यांसाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले ‘नर्मदा बचाव आंदोलन’ देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या आंदोलनाची व्याप्ती भारतापुरती मर्यादित राहिली नव्हती.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरही या आंदोलनाची दखल घेतली गेली. शेवटी जागतिक बँकेने सरदार सरोवर प्रकल्पाचा निधी परत घेतला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाचे लोकापर्ण झाले.
- तसेच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून फायदा होणार आहे.
हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचे निधन :
- भारतीय हवाईदलाचे (आयएएफ) मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे 16 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले. ते 98 वर्षाचे होते.
- फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी ते सर्वांत तरूण वायूसेना प्रमुख झाले होते.
- 1919 मध्ये त्यांचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जन्म झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
- तसेच 1965 च्या भारत पाक युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.
पी.व्ही सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद :
- ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.
- सिंधूने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.
- कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी या दोघींमध्ये लढत झाला. सिंधूने ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 असा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
- तसेच सोलमधील उपांत्य लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या हे बिंगजिओ हिचे आव्हान 21-10, 17-21, 21-16 असे परतावून लावत अंतिम फेरी गाठली होती.
महिलांसाठी ‘बडीकॉप’चे सुरक्षा कवच :
- शहरात विविध क्षेत्रांत कार्यरत काही महिलांना कामाच्या ठिकाणी छेडछाड अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते. मात्र, बऱ्याचदा महिला ‘जाऊ दे’ म्हणत तक्रार करत नाहीत. अशा नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ‘बडीकॉप’ संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.
- ‘बडीकॉप’ ग्रुपवर तक्रार केल्यास पोलिस त्या महिलेच्या मदतीसाठी धावून येत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत सर्वच पोलिस ठाण्यात ‘बडीकॉप’ व्हॉट्सऍप ग्रुप स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना पोलिसांकडून सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे.
- आयटी कंपनीतील अंतरा दास आणि रसिला राजू या दोन महिला कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.
- तसेच नोकरदार महिलांच्या छेडछाडीच्या घटना पाहता पोलिस आयुक्त शुक्ला यांनी आयटी हब असलेल्या हिंजवडी, हडपसर, येरवडा आणि विमानतळ या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम सुरू केला.
- विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये नोकरदार आणि अन्य महिलांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.
राज्यात बालकुमार साहित्य संमेलन पुन्हा होणार :
- बालकुमार साहित्य संस्थेतील अंतर्गत वादामुळे गेली तीन वर्षे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच बालकुमार साहित्य संमेलन भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- परिषदेचे पहिले संमेलन लोणावळा येथे होणार असून, याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची सन्मानाने निवड करण्यात आली आहे.
- लोणावळ्यातील मनःशक्ती प्रयोग केंद्राच्या सहकार्याने हे एकदिवसीय साहित्य संमेलन 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार असून, त्यात शाळांमधील सातशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
- तसेच या वेळी ‘मराठी अभिमान गीत’ शालेय विद्यार्थी सादर करतील. त्यानंतर उद्घाटन सत्रात डॉ. अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत.
दिनविशेष :
- शिवाजी सावंत – (31 ऑगस्ट 1940 (जन्मदिन) – 18 सप्टेंबर 2002 (स्मृतीदिन)) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच ‘मृत्युंजयकार सावंत’ म्हणून ओळखले जातात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा