चालू घडामोडी (19 मे 2018)
जीना हास्पेल यांची सीआयएच्या संचालकपदी नियुक्ती :
- अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही हास्पेल यांची निवड करण्यात आली आहे.
- 9/11च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर कैद्यांच्या चौकशीसाठी सीआयएकडून वॉटरबोर्डिंगसारख्या अतिशय क्रूर पद्धती वापरण्यात आल्या होत्या, त्यातील सहभागामुळे हास्पेल या वादग्रस्त ठरला आहेत.
- सीआयएच्या संचालकपदावर हास्पेल यांच्या नियुक्तीवर सिनेटने 17 मे रोजी 54 विरुद्ध 45 मतांनी शिक्कामोर्तब केले.
- मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. मात्र, मतदानावेळी सहा डेमोक्रॅटिक सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला.
- हास्पेल यांच्या नियुक्तीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. सीआयएच्या 70 वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत.
रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण :
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण 18 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
- आठवले यांचा हा पुतळा 25 किलो मेणाचा वापर करून शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी बनविला आहे. हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.
- शिल्पकार कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले. या वेळी आठवले यांच्यासह पत्नी सीमा आठवले व मुलगा जीत आठवले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणातील पहिले शहिद जवान स्मारक पूर्णत्वास :
- देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांचा इतिहास त्यांचे शौर्य सर्वांना माहीत व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव जागृत व्हावी या हेतूने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने कोकणातील पहिले शहीद जवान स्मृती स्मारक उभारले आहे. या स्मारकाचे काम पूर्णत्वास गेले आहे.
- 30 मे रोजी या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखात होणार आहे. या निमित्ताने शिवछत्रपतींच्या रायगड येथून ज्योत आणली जाणार आहे.
- सुमारे पस्तीस लाख खर्चून हे शहीद जवान स्मृती स्मारक उभारण्यात आले आहे. संस्था उपाध्यक्ष मदन मोडक यांनी ही संकल्पना मांडली व मंजिरी मोडक, मदन मोडक यांनी या प्रकल्पासाठी 15 लाखाची देणगीही दिली. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळासह पाठिंबा दिला.
- शहीद जवान स्मृती स्मारकासाठी संरक्षण मंत्रालयाकडून बजरंग रणगाडा व एक तोफ मिळाली आहे. या स्मारकात मध्यभागी मनोर्यात प्रेरणादायी स्तंभ उभारण्यात आला असून युद्धात अतुलनीय पराक्रम केलेल्या व परमवीर चक्रप्राप्त जवानांचा इतिहास पॅनेल स्वरुपात मांडण्यात आला आहे. रायगडहून ज्योत आणल्यानंतर शहरातून मिरवणुक काढली जाणार आहे.
झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी लालचंद राजपूत :
- भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-झिम्बाब्वे तिरंगी मालिकेपासून राजपूत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील.
- 2007 साली पहिल्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे राजपूत व्यवस्थापक होते. यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या संघाला प्रशिक्षण दिले होते.
- तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला होता. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनच्या ट्विटर हँडलवरुन राजपूत यांच्या नेमणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.
‘महिला आयपीएल’साठी भारतीयांकडे कर्णधारपद :
- 2017 साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. या कामगिरीनंतर भारतात महिला आयपीएल सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला होता.
- त्याची चाचपणी करण्यासाठी बीसीसीआयने प्ले-ऑफ सामन्यांच्या आधी 22 मे रोजी महिला खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-20 सामना आयोजित केला आहे. या सामन्यासाठी संघांची घोषणाही करण्यात आली आहे.
- भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्याकडे कर्णधारपद सोपावण्यात आले आहे. या सामन्यानंतर महिला आयपीएलबाबत गांभीर्याने विचार केला जाईल.
- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघातील महिला खेळाडूही या प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे.
- आयपीएल पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल, आमचा प्रयत्न महिला खेळाडूंसाठीही अशाच प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा आहे अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.
दिनविशेष :
- संत ज्ञानदेव यांची बहिण ‘मुक्ताबाई‘ यांनी एदलाबाद येथे सन 1297 मध्ये 19 मे रोजी समाधी घेतली.
- 19 मे 1904 हा दिवस आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक ‘जमशेदजी नसरवानजी टाटा‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- ‘नथुराम गोडसे’ यांचा जन्म 19 मे 1910 रोजी झाला होता.
- पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा