चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2016)
नौदलाला ‘शत्रुसंहारक चेन्नई’चे पाठबळ :
- तब्बल 7500 टन वजन, 164 मीटर लांबी, 300 किलोमीटरपर्यंत मारा करणारे संहारक ब्रम्ह्योस क्षेपणास्त्राने सज्ज, शत्रूला रडारवर दिसणार नाही अशी स्टिल्थ प्रणाली आणि शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणारी स्वदेशी ‘कवच’ यंत्रणेने सुसज्ज अशी कोलकाता वर्गातील तिसरी युद्धनौका 21 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात दाखल होणार आहे.
- माझगाव गोदीत उभारण्यात आलेली आयएनएस चेन्नई ही युद्धनौका देशी बनावटीच्या विशाल विनाशिकांपैकी एक आहे.
- 21 नाव्हेंबर रोजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत ही युद्धनौका सभारंभपूर्वक भारतीय नौदलात दाखल केली जाणार असून, त्याबरोबरच कोलकाता श्रेणीतील युद्धनौका निर्मितीचा ‘प्रोजेक्ट 15-ए’ कार्यक्रम पूर्णत्वाला येणार आहे.
- ‘शत्रुसंहारक’ हे घोषवाक्य असणारी आयएनएस चेन्नई युद्धनौका विविध सागरी मोहिमा, कारवाया आणि सागरी युद्धातील सर्व आवश्यकतांना समोर ठेवून तयार करण्यात आली आहे.
- तसेच या युद्धनौकेवर ब्रम्ह्योस तसेच लांब पल्ल्याची बरक-8 ही क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर :
- राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात सोडत काढण्यात आली. त्यात 7 जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
- राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सोडत 10 जून 2016 रोजी काढण्यात आली होती, पण सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी लागोपाठ दोनदा अध्यक्षपद आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील सोडतीमध्ये सुधारणा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते.
- तसेच त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी नव्याने सोडत काढण्यात आली.
गुलाबराव गणाचार्य स्मृती दिन पुरस्कार :
- कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य स्मृती आणि धर्मादाय न्यासतर्फे 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, यावेळी चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी आणि जेष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
- सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या बोधचिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात येणार आहे, असे न्यासचे कार्यकारी विश्वस्त व अध्यक्ष अनिल गणाचार्य आणि बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले.
वाहतूक नियम तोडल्यास परवाना रद्द होणार :
- वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे वीस वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.
- राज्याच्या गृह विभागात अमूलाग्र बदल करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
- राज्यातील वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असते. या वेळी दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते. यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
- वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल, दंडाची रक्कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल.
- तसेच या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल.
- दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 19 नोव्हेंबर हा भारतीय नागरिक दिन म्हणून साजरा करतात.
- 19 नोव्हेंबर 1828 हा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिन आहे.
- प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा 19 नोव्हेंबर 1875 हा जन्मदिन आहे.
- 19 नोव्हेंबर 1917 भारतीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा