चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2017)
भैरवी बुरड ठरली मिस ग्लोबल एशिया 2017 :
- जमैका येथे आयोजित ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या नाशिकच्या भैरवी बुरड (वय 20 वर्षे) हिने याच स्पर्धेतंर्गत ‘मिस ग्लोबल एशिया 2017’ होण्याचा मान मिळविला आहे.
- भैरवी ही बी.वाय.के. महाविद्यालयात तृतीय वर्षांत आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या भैरवीने ऑगस्टमध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया 2017’ या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिला ‘ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
- तसेच भैरवीला नृत्याचीही आवड असून तिने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धामध्ये बक्षिसे मिळविली आहेत.
राष्ट्रीय तपास पथकाच्या महासंचालकपदी वाय.सी. मोदी :
- वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- गृहमंत्रालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. एनआयएचे विद्यमान महासंचालक शरदकुमार यांची ते जागा घेतील. 30 ऑक्टोबर रोजी शरदकुमार निवृत्त होत आहेत.
- 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. या पथकात वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांचा समावेश होता.
- गोध्रा प्रकरणानंतर घडलेल्या तीन महत्वाच्या प्रकरणांचा तपासही वाय.सी. मोदी यांनी केला आहे. यामध्ये गुलबर्ग सोसायटी, नरोडा पाटिया आणि नरोडा गाम येथील हिंसाचार प्रकरणांचा समावेश आहे.
- 2015 मध्ये त्यांची सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- तसेच सीबीआयमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांनी शिलाँग येथे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला व्हायोलेट ब्राऊन कालवश :
- जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन (वय 117 वर्षे) यांचे जमैकामध्ये निधन झाले.
- ‘आँट व्ही’ नावाने या बाई त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळात परिचयाच्या होत्या. त्यांचा जन्म ट्रेलॉनीत 10 मार्च, 1900 रोजीचा. आपले प्रदीर्घ आयुष्यही त्यांनी तेथेच घालविले.
- व्हायलेट यांना या वर्षी 15 एप्रिल रोजी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून जाहीर केले गेले.
- व्हायलेट यांच्या आधी इटलीच्या एम्मा मोरॅनोंकडे हा सन्मान होता. त्यांच्या आयुष्याने 1899 ते 2017 अशा तीन शतकांना स्पर्श केला होता. असे दुर्मीळ भाग्य लाभलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.
- इटलीच्या एम्मा यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे, त्यांनी न केलेला विवाह आणि दररोजचा कच्च्या अंड्यांचा आहार.
91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार :
- आठ दिवसांच्या ‘राजकीय’ घडामोडींनंतर 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा 18 सप्टेंबर रोजी महामंडळाने केली.
- मराठवाडा साहित्य परिषदेने अखेरच्या क्षणापर्यंत सर्वतोपरी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने साहित्य वर्तुळात उमटत आहे.
- संमेलन स्थळाच्या वादानंतर हिवरा आश्रमाने माघार घेतल्यानंतर बडोद्याचा एकमेव पर्याय महामंडळापुढे होता. गेले पाच दिवस बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषदेची तयारी आहे किंवा नाही, याची चाचपणी करण्यात आली. बडोद्याकडून तयारी असल्याचे पत्रही प्राप्त झाले.
- महामंडळाच्या कार्यकारिणीशी सल्लामसलत केल्यानंतर अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बडोद्याला यजमानपद देण्याचा निर्णय घोषित केला.
- ‘महामंडळाच्या सर्व सभासदांकडे परिपत्रक पाठवून महामंडळाची कामे निर्णित करण्याचा जो अधिकार महामंडळ अध्यक्षांना दिलेला आहे, त्याअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानुसारच रीतसर प्रक्रिया पार पाडून महामंडळाने निर्णय घेतला,’ असे डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
- तसेच यापूर्वी बडोद्यात 1909, 1921 आणि 1934 अशी तीन साहित्य संमेलने झाली आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतात होणारे बडोद्यातील हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये :
- संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या.
- भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज जगभरातील विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या दौऱ्यात चर्चा करणार आहेत.
- स्वराज यांचा हा दौरा आठवडाभराचा असून, त्यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील एक शिष्टमंडळही न्यूयॉर्कमध्ये पोचले आहे.
- ‘यूएन’च्या आमसभेला हजेरी लावण्यासाठी येथे आलेल्या विविध देशांच्या नेत्यांबरोबर स्वराज द्विपक्षीय व त्रिपक्षीय स्तरावरील 20 बैठका घेणार आहेत.
- स्वराज यांचे येथील विमानतळावर स्वागत करण्यासाठी भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना आणि भारताचे ‘यूएन’मधील कायमस्वरूपी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन हे उपस्थित होते.
- दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी स्वराज या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन आणि जपानचे परराष्ट्रमंत्री टारो कोनो यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
- चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपान यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती.
- तसेच ‘यूएन’च्या सरचिटणीसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सुधारणांच्या प्रक्रियेला 120 पेक्षा अधिक देशांनी पाठिंबा दिला असून, त्यात भारताचाही समावेश आहे.
दिनविशेष :
- सन 1957 मध्ये 19 सप्टेंबर रोजी अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
- 19 सप्टेंबर 2007 मध्ये 20-20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा ‘युवराज सिंग’ पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा