Current Affairs of 2 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 जुलै 2018)
भारतीय लष्करात दाखल होणार ‘अग्नी-5’ :
- चीनलाही माऱ्याच्या टप्प्यात आणणारी “अग्नी-5” ही आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा लष्करात समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे.
- पाच हजार कि.मी.चा पल्ला आणि अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) या विशेष तुकडीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
- तसेच या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या काही चाचण्या झाल्या असून. काही अद्याप बाकी आहेत. चीनची राजधानी बीजिंगसह शांघाय, हॉंगकॉंग अशी शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकतात.
Must Read (नक्की वाचा):
‘व्हॉट्सॲप ॲडमिन’ला वाढीव अधिकार :
- ‘व्हॉट्सॲप मॅसेंजर’ने आता ग्रुप ॲडमीनला संपूर्ण नियंत्रणाची सुविधा देणारे ‘सेंड मेसेज’ हे फीचर देण्यास सुरवात केली असून, यामुळे ॲडमिन अधिक सशक्त होऊन तो आता कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये परिवर्तित करू शकणार आहे.
- अलीकडे बरेच ग्रुप मेंबर हे त्रासदायक मेसेज पाठवत असतात. ग्रुपमधील अशा सदस्यांना रिमूव्ह करणे शक्य असते, मात्र अनेकदा तसे करणे जिकिरीचे असते. अशा सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी ‘रेस्ट्रिक्ट ग्रुप’ हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. या नव्या फिचरमुळे कोणत्याही सदस्याला संबंधित ग्रुपमध्ये मेसेज टाकण्यापासून रोखणे ॲडमीनला शक्य होणार आहे.
- अर्थात ‘सेंड मॅसेज’ या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपवरील संवाद हा ‘वन वे’ होण्याचा धोका आहे. कारण यामध्ये फक्त ग्रुपचा ॲडमीनच पोस्ट टाकू शकणार आहे.
- ‘ऑल पार्टीसिपेंट’ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्यावर क्लिक केल्यास फक्त ग्रुप ॲडमीन पोस्ट करू शकणार आहेत. तर, दुसऱ्याची निवड केल्यास ग्रुपमधील अन्य सदस्यदेखील पोस्ट करू शकतील. अर्थात, कोणत्याही ग्रुप मेंबरला पोस्ट करण्यापासून रोखू शकण्याचा पर्याय यात ॲडमीनला देण्यात आलेला आहे.
जीएसटी हे टीम इंडियाचे जिवंत उदाहरण :
- वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होण्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारने ‘जीएसटी दिवस‘ धूमधडाक्यात साजरा केला.
- जीएसटी हे संघराज्य व्यवस्था आणि टीम इंडियाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रशंसा पंतप्रधान मोदींनी केली. तर, जीएसटी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला.
- गेल्या वर्षी 1 जुलै रोजी भव्य सोहळ्याव्दारे जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर वर्षभरात जीएसटी परिषदेने कर सुधारणा, विवरणपत्र सादरीकरण याबाबतचे विविध निर्णयही केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘जीएसटी’च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोदींनी “ट्विट”व्दारे जनतेला शुभेच्छा दिल्या.
- ‘जीएसटी‘ हे सहकारी संघराज्यवाद आणि टीम इंडियाच्या भावनेचे जिवंत उदाहरण असून, जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे मोदी म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी जीएसटीचा संदेश देणाऱ्या ‘एक राष्ट्र एक कर’ या पोस्टरचे प्रकाशन केले.
‘युनेस्को’कडून मुंबापुरीचा पुन्हा सन्मान :
- दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.
- ‘युनेस्को‘च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या 42व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार आहे.
- दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह व फोर्ट परिसरात 19व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तुशैलींच्या इमारती व 20व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती, तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेशनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल, तसेच मरिन ड्राइव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे.
राहुल द्रविडचा आयसीसीकडून सन्मान :
- भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ असं बिरुद मिरवणाऱ्या राहुल द्रविडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीकडून राहुल द्रविडचा Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
- राहुल हा आयसीसीच्या मानाच्या यादीत सहभागी होणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या बिशनसिंह बेदी, कपिल देव, सुनील गावसकर आणि अनिल कुंबळे या खेळाडूंना आयसीसीच्या Hall of Fame या यादीत स्थान मिळालं आहे.
- तसेच द्रविडसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग आणि इंग्लंडचे ज्येष्ठ फलंदाज क्लेरी टेलर यांनाही आयसीसीच्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये द्रविड 13 हजार 288 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये द्रविडच्या पुढे अनुक्रमे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिज हे खेळाडू आहेत.
दिनविशेष :
- 2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.
- सन 1865 मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
- पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
- सन 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा