चालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2017)
महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित राज्य :
- महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत.
- ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्राची कामगिरी यथायथाच आहे.
- देशभरातील राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. देशातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास महाराष्ट्राची कामगिरी किंचित चांगली आहे.
- महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक सुरक्षित असून बिहार सर्वाधिक असुरक्षित आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते. तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.
- प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा नागपुरमध्ये होणार :
- नागपूर जिल्हा बॅडिमटन संघटना आणि महाराष्ट्र राज्य बॅडिमटन संघटनेच्या संयुक्त यजमानपदाखाली नागपूरातील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात 2 नोव्हेंबरपासून 82 व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- नागपुरात 25 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल साठ लाख रुपयांचे बक्षीस पहिल्यांदाच ठेवण्यात आले असून ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे.
- देशभऱ्यातून दिग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने स्पर्धेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र बॅडिमनट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुजा घाटकरला सुवर्णपदक :
- भारतीय नेमबाजपटूंनी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व कायम राखले आहे.
- 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या शाहजार रिझवी, ओंकार सिंह आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.
- महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात पुण्याच्या पुजा घाटकरने सुवर्णपदकाची कमाई केली. तर भारताच्याच अंजुम मुदगलने रौप्यपदक मिळवले. सिंगापूरच्या मार्टीना वेलेसुने कांस्यपदक मिळवले.
- तसेच या स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी अतिशय चांगला ठरला. भारतीय नेमबाजपटूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकासह 5 पदकांची कमाई केली. याआधी भारताच्या हिना सिद्धूने 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने 10 मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
हिमाचल प्रदेशच्या 50 हजार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप :
- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेसने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच हा चंग दोन्ही पक्षांनी बांधला आहे.
- निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच औपचारिकरित्या पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून दोन दिवस झाले.
- तसेच लगेचच काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप, शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज यासह विविध योजनांची घोषणा केली आहे.
- काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिली असून यामध्ये समाजातील सर्वच घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
- जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. भाजपनेही दोनच दिवसांपूर्वी आपला व्हिजन डॉक्युमेंट जारी केला होता.
- भाजपपेक्षा आमचा जाहीरनामा चांगला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपने प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून आपल्यासाठी ही निवडणूक सोपी केल्याचे वीरभद्र सिंह यांनी यावेळी म्हटले.
ड्रोन्स वापराच्या नियमावलीचा प्राथमिक मसुदा जाहीर :
- देशांतर्गत ड्रोन्सच्या वापरासाठीची नवी नियमावली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केली.
- ड्रोन इंडस्ट्री देशाच्या विविध प्रकारच्या विकासकामांमध्ये फायदेशीर ठरणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपती यांनी सांगितले. यामध्ये कृषी, तेल आणि नैसर्गिक वायू निर्मितीचा समावेश असल्याचे गजपती म्हणाले.
- ड्रोन्सच्या वापरात भारत अग्रगण्य देश म्हणून नावारूपाला यावा, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले.
- तर नागरी हवाई सचिव आर.एन. चौबे म्हणाले, ड्रोन संदर्भातील निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक प्रश्नांवर गृहमंत्रालयाशी चर्चा झाली असून मसुदा नियमावलींमुळे ड्रोन क्षेत्रासाठी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये
- सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ड्रोन्सचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- पाकिस्तानने आपले नाव बदलून 2 ऑक्टोबर 1953 रोजी पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले.
- 2 ऑक्टोबर 2000 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा