Current Affairs of 2 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2017)
मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम :
- राज्यातील 9 जिल्हे व 13 महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 7 ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.
- लसीकरणाने टाळता येणार्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले. मिशन इंद्र्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. या वेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.
- राज्यात 9 जिल्हे व 13 महापालिका क्षेत्रांत 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 0 ते 2 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
- सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे, ते येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले.
- 7 ऑक्टोबरला ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या 7 तारखेला ही मोहीम राबवली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठे यांचे निधन :
- ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह.मो. मराठे (वय 77 वर्षे) यांचे 2 ऑक्टोबर रोजी निधन झाले.
- ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही मराठे यांची पहिली कादंबरी होती. दैनिक गोमंतक, दैनिक लोकसत्ता, लोकप्रभा, मार्मिक, नवशक्ती अशा नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केले होते. ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या संपादक मंडळातही मराठे यांचा समावेश होता.
- ह.मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी झाला. सुरवातीच्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये अध्यापनाचे काम केले. ‘साधना’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. 1972 मध्ये ही कादंबरी पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाली होती.
- पाच वर्षांपूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठे यांनी अर्ज भरला होता. ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार’ या जुन्या लेखामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.
सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान :
- सुप्रशासन ही आजच्या युगात आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा अत्यावश्यक बाब बनलेली असताना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते हे तपासून उत्तम शासन पुरवणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते.
- नेमक्या याच कारणासाठी गतवर्षीच्या रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड्स’ची (जिल्हाधिकाऱ्यांसाठीचा बदलकर्ता पुरस्कार) घोषणा केली होती. त्यानुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन वर्षांत गांधी जयंतीनिमित्त अशा बदलकर्त्यांचा शोध सुरू करण्यात येत आहे.
- ‘सुप्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव या पारितोषिकांद्वारे करण्यात येईल. जिल्हा स्तरावरील हे अधिकारी सुप्रशासनाचे खरे दूत आहेत,’ असे विवेक गोएंका म्हणाले.
- तसेच राज्य शासनामध्ये उत्तम कार्यपद्धतींचा, नवसंकल्पनांचा, पारदर्शी कारभाराचा, नेतृत्वगुणांचा प्रसार करणे आदी यामागील उद्दिष्टे आहेत.
आता इतर देशातही आकाशवाणीचे प्रसारण होणार :
- ऑल इंडिया रेडिओ (AIR) अर्थात ‘आकाशवाणी’ आता जपान, जर्मनी आणि अन्य देशांत आपली सेवा सुरु करणार आहे.
- अनिवासी भारतीयांना आकाशवाणीचा उपयोग व्हावा हा या सेवेमागील भारत सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.
- कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि मालदिव या देशांमध्येही आकाशवाणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकारी अमलनज्योती मुझुमदार यांनी ‘पीटीआय’ला दिली.
- सध्या बाह्य प्रसारण विभागाकडून (ईएसडी) 150 देशांत 27 भारतीय भाषांमध्ये आकाशवाणीची सेवा दिली जात आहे. यांपैकी 14 भाषांमध्ये शेजारील देशांत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सेवा पुरवण्यात येणार आहे. यापुढे अनेक देशांत आकाशवाणीच्या सेवांचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवल्याचे मुझुमदार यांनी सांगितले.
- तसेच आकाशवाणी जपान, कॅनडा, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मालदीव आणि इतर काही राष्ट्रकुल देशांत नव्या सेवा सुरु करणार असल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. नुकताच आकाशवाणीचा हा प्रस्ताव बाह्य प्रसारण विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्याता आला होता.
दिनविशेष :
- सन 1869 मध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी (मोहनदास कमरचंद गांधी) यांचा जन्म झाला. तसेच भारतात 2 ऑक्टोबर हा दिवस ‘महात्मा गांधी जयंती’ म्हणून साजरा केला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा