चालू घडामोडी (20 जानेवारी 2018)
महाराष्ट्र सर्वंकष आर्थिक विकासात देशात अव्वल :
- सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. ‘ग्रोथ इनोव्हेशन लीडरशिप इंडेक्स फॉर इकॉनॉमिक डेव्हपलमेंट इन इंडिया’ याबाबत ‘फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
- देशातील 29 राज्यांचे 100 निर्देशकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. ‘फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरूप झुत्शी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.
- या संशोधनाच्या माध्यमातून देशातील 29 राज्यांचा आर्थिक विकास या संबंधी संशोधन करण्यात आले. त्यासाठी प्रमुख दहा मापदंडाच्या आधारे संशोधन करण्यात आले असून त्यात संगणकीकरण, आर्थिक समृद्धी, शैक्षणिक कौशल्य, प्रशासनातील परिणामकारकता, गुंतवणूक क्षमता, महिला सबलीकरण, पायाभूत विकास, रोजगार कार्यक्षमता, आरोग्य सुधारणा आणि दळणवळणाच्या सुविधा या निकषांच्या आधारे अभ्यास करून एकूणच सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
विमानात इंटरनेट सेवा देण्याची ‘ट्राय’ची शिफारस :
- भारतीय हवाई हद्दीत विमानाचे उड्डाण सुरू असताना माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी संपर्क सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केली आहे.
- माहितीचे महाजाल अथवा भ्रमणध्वनी संपर्क सेवा किंवा दोन्ही सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या किंवा नाही हा निर्णय एअरलाइन्सचा असेल. तथापि, तांत्रिकदृष्टय़ा या सेवा उपलब्ध करून देता येणे शक्य असल्याने आणि सुरक्षेच्या मुद्दय़ावर तोडगा निघू शकत असेल तर या दोन्ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाची कोणतीही आडकाठी असण्याची गरजच नाही. त्यामुळे माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी सेवा भारतीय हद्दीत उपलब्ध करून द्याव्या, असे ट्रायने म्हटले आहे.
- गेल्या सप्टेंबर महिन्यात या बाबत सर्व संबंधितांशी चर्चा सुरू करण्यात आली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सदर निर्णय घेण्यात आला. जमिनीवरील नेटवर्कशी सुसंगतपणा राहण्यासाठी भ्रमणध्वनीसाठी ट्रायने जास्तीत जास्त तीन हजार मीटर उंचीचे निर्बंध सुचविले आहेत.
- तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची मुभा विमानांत असेल तर वाय-फायमार्फत ऑनबोर्ड इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, असे नियामकाने म्हटले आहे.
नौदलाच्या महिलांनी पार केला समुद्रातील ड्रेक पॅसेज :
- समुद्रमार्गाने जगाची सफर करत असलेल्या भारतीय नौदलातील महिलांची INSV ‘तारिणी’ केपहॉर्नला पोहोचली असून भारताचा झेंडा तेथे फडकावला आहे.
- नाविका सागर परिक्रमा या साहसी मोहिमेतील महिलांचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.
- या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ त्यांनी यशस्वीरित्या पार केला. फॉकलँड बेटावरील पोर्ट स्टॅन्लेच्या दिशेने पुढे जाताना त्यांनी तिरंगा फडकावला.
- एकूण 165 दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) होता. त्यानंतर लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये गाठला. आता पोर्ट स्टॅन्लेनंतर ते केप टाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत.
- नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक मंचावर ‘नारीशक्ती’चे दर्शन घडविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
पुरंदर विमानतळाला सशर्त परवानगी :
- हैदराबाद-मुंबई विमानमार्ग, लोहगाव व एनडीए आणि पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांच्या उड्डाणांमध्ये हवाई अडथळे निर्माण होऊ शकतात. या व अशा काही तांत्रिक अडचणी असून त्या दूर कराव्यात, या अटी-शर्तींवर पुरंदर येथील नियोजित विमानतळास हवाई दलाकडून मान्यता देण्यात आली आहे.
- तसेच या अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले आहे. या अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर एअरपोर्ट ऍथॉरिटीचे एक पथक पुन्हा एकदा या जागेची पाहणी करणार असून, त्यानंतर अंतिम मान्यता मिळणार आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. त्यांनी पश्चिम विभागातील सर्व विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास हवाई दलाने मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र गणना 50 वनक्षेत्रांत :
- चौथ्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेत वाघांच्या अधिवास क्षेत्रापेक्षा संरक्षित क्षेत्रावर अधिक भर देण्याचे धोरण या वेळी ठेवण्यात आले आहे.
- तसेच गणना अंतराची व्याप्ती दोनऐवजी अडीच चौरस किलोमीटर करण्यात आली आहे. 20 ते 25 जानेवारीदरम्यान ही गणना देशभर चालणार आहे.
- देशभर एकाच वेळी ही गणना होत असल्याने जीपीएस यंत्रणेचा अधिकाधिक उपयोग करीत समन्वय साधण्याचे प्रयत्न आहेत.
- तसेच यापूर्वीच्या तीन व्याघ्रगणनांत संरक्षित क्षेत्रातील निरीक्षण दुय्यम होते. मात्र, वाघांचा वावर संरक्षित (बफरझोन) क्षेत्रात अधिक वाढत असल्याचे गत दोन वर्षांतील चित्र वनखात्यापुढे उभे झाले.
- अधिवास क्षेत्रापेक्षा वाघाने संरक्षित क्षेत्रात अधिक धुमाकूळ घालून स्वत:चे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले. गणना करताना यापूर्वी अधिवास क्षेत्रावर दिला जाणारा भर आता मागे पडून नवा बदल झाला.
दिनविशेष :
- टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म 20 जानेवारी 1871 मध्ये झाला.
- 21 वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक ‘आपा शेर्पा’ यांचा जन्म 20 जानेवारी 1960 रोजी झाला.
- सन 1963मध्ये चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
- गिरीश कर्नाड यांना 20 जानेवारी 1999 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (21 जानेवारी 2018)
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा