चालू घडामोडी 20 जुलै 2015
महाराष्ट्र सर्वाधिक आत्महत्येत आघाडीवर :
- महाराष्ट्र सर्वाधिक आत्महत्येत आघाडीवर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- गेल्या वर्षभरात भारतात एकूण एक लाख 31 हजार जणांनी आत्महत्या केली.
- महाराष्ट्रात 2014 मध्ये सर्वाधिक 16,307 जणांनी आत्महत्या केली. त्यानंतर तमीळनाडू (16,122) आणि पश्चिम बंगालचा (14,310) क्रमांक लागतो.
- ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
- अहवालातील माहितीनुसार, विवाहासंबंधीचे प्रश्न वगळता इतर कौटुंबिक कारणांमुळे 21.7 टक्के आत्महत्या होतात, तर आजारपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण 18 टक्के आहे.
- तसेच आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक 19.7 टक्के लोक व्यावसायिक होते. तसेच, रोजंदारीवर काम करणारे (12 टक्के), नोकरदार (7.4 टक्के), विद्यार्थी (6.1 टक्के) आणि निवृत्त नागरिक (0.7 टक्के) या वर्गांचाही यामध्ये समावेश आहे.
- आत्महत्या करण्यासाठी 26 टक्के लोकांनी गळफासाचा मार्ग स्वीकारला, तर 6.9 टक्के जणांनी जाळून घेण्याचा, 5.6 टक्के जणांनी बुडून मरण्याचा आणि 1.1 टक्के जणांनी इमारतीवरून अथवा रेल्वेसमोर उडी मारण्याचा मार्ग स्वीकारला.
यूडब्ल्यू 158 लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार :
- रविवारी रात्री 11 वाजता (लंडन प्रमाणवेळेनुसार) तर सोमवारी पहाटे 4 वाजता एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून, त्याचे प्रक्षेपण इंटरनेटवर थेट पाहायला मिळणार आहे.
- या लघुग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात पृथ्वीवरील सर्वात महाग असलेल्या प्लॅटिनमचा मोठा साठा आहे.
- प्लॅटिनम हा धातू सोन्यापेक्षाही महाग असतो व तो दागिन्यांसाठी वापरला जातो.
- यूडब्ल्यू 158 असे या लघुग्रहाचे नाव असून त्याचा काही भाग 9 कोटी टनांचा आहे व त्यात 5 महापद्म डॉलर (ट्रिलियन) इतक्या किमतीचे प्लॅटिनम आहे.
- स्लूह प्रकल्पाच्या मदतीने या लघुग्रहाची पृथ्वी भेट कॅनरी बेटांवरून थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
- हा लघुग्रह पृथ्वीच्या निकटच्या ग्रहापेक्षा 30 पट जवळ येणार आहे, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ बॉब बेरमन यांनी दिली.
- या लघुग्रहावर भविष्यात खाणकाम करून त्यातील प्लॅटिनम काढून घेण्याचा विचार केला जात आहे व ते भविष्यकाळात शक्य आहे असे बेरमन यांचे मत आहे.
- वैशिष्ट्ये :
- लघुग्रहाचे नाव– यूडब्ल्यू 158
- खनिज– प्लॅटिनमने परिपूर्ण (किंमत 5 महापद्म डॉलर)
- अंतर– पृथ्वीपासून निकटच्या ग्रहाच्याही 30 पट जवळ
- उपयोग– भविष्यात खाणकाम शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार :
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सिलीकॉन व्हॅलीला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
- तसेच येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौरा करणार असून ते यावेळी सिलीकॉन व्हॅलीला भेट देतील.
- पं. नेहरू यांनी 1949 साली कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. तेव्हा या भागाला सिलीकॉन व्हॅली हे नाव नव्हते. 1970 नंतर कॅलिफोर्नियाचा काही भाग सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखला जाऊ लागला.
- तसेच सिलीकॉन व्हॅली हे अनिवासी भारतीयांचे हक्काचे ठिकाण आहे.
‘नेट न्युट्रॅलिटी’ समिती स्थापन :
- बहुचर्चित ‘नेट न्युट्रॅलिटी’बाबत स्थापन करण्यात आलेली समिती देशातील ‘नेट न्युट्रॅलिटी‘बाबत अनुकूल असून समितीने दूरसंचार मंत्रालयाकडे सोपविलेला अहवाल 16 जुलै रोजी दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- ‘नेट न्युट्रॅलिटी’ :
इंटरनेटवरील प्रत्येक बाइट हा सारखा असतो, मग तो तुम्ही यू ट्यूबसाठी वापरा, नाहीतर एखादे वर्तमानपत्र वाचण्यासाठी किंवा इंटरनेटवर सिनेमा पाहण्यासाठी वापरा, नाहीतर विकिपिडियावरील काही माहिती डाउनलोड करण्यासाठी वापरा.
- विजेचा प्रवाह घेतला आणि त्याचा वापर खोली प्रकाशमान करण्यासाठी वापरता की एखादे होम अप्लायन्स किंवा विद्युत उपकरण चालवण्यासाठी वापरता, याच्याशी वीज कंपनीला काही देणेघेणे नसते. त्याला दर सारखाच असतो. अगदी त्याच प्रकारे इंटरनेटच्या वापराला नियम पाहिजे, यालाच ‘नेट न्युट्रॅलिटी’ म्हणतात.
- एअरटेल झीरोअंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून मुक्तसंचार सुरू झाल्यानंतर देशात नेट न्यूट्रॅलिटीचा वाद छेडला गेला. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना ही सुविधा देण्यासाठी एअरटेलने पैसा मागितल्यानंतर दूरसंचार कंपन्यांच्या संघर्षात भर पडली.
- त्यानंतर फेसबुक इंटरनेट ऑर्गकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर सदर समितीने चर्चा केली. इंटरनेट ऑर्ग युझर्सना एप्रिल २०१५ पर्यंत काही मोजक्या वेबसाईटच्या माध्यमातून मुक्त संचाराची मुभा देण्यात आली.
- अहवाल :
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे युजरला कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला कोणत्याही अडथळ्याविना वापरता येईल.
- कोणत्याही अधिकृत मजकूराला ब्लॉक करता येणार नाही.
- स्पर्धेला प्रोत्साहन दिले जाईल मात्र त्यातून सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करता येणार नाही
- कायदेशीर गरज नसताना युजरच्या परवानगीशिवाय त्याची माहिती उघड करता येणार नाही.
- मेसेजिंग सेवेवर निर्बंध लादण्याची दूरसंचार कंपन्यांची मागणी अहवालाद्वारे फेटाळून लावली आहे.
- इंटरनेटद्वारे करण्यात येणाऱ्या व्हॉइस कॉलमुळे वर्तमान व्हॉईस कॉल पद्धतीचा अडथळा निर्माण करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच इंटरनेटद्वारे व्हॉईस कॉलच्या सेवांवर निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- एखाद्या संकेतस्थळाची ट्रॅफिक वाढविण्यासाठी अन्यायकारक किंवा स्पर्धेला विरोध करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
‘पिपाव्हेव डिफेन्स’ने रशियन सरकारसोबत केला एक करार :
- भारतीय नौदलासाठी युद्धनौका बांधण्यासाठी ‘पिपाव्हेव डिफेन्स’ने नुकताच रशियन सरकारसोबत एक करार केला आहे.
- तसेच हा करार सुमारे 3 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
- युद्धनौका बांधण्यासाठी खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. ‘रिलायन्स इन्फ्रा’ने काही दिवसांपूर्वी ‘पिपाव्हेव डिफेन्स’ची खरेदी केली आहे.
- रशियन सरकाने भारतीय नौदलासाठी युद्धनौका बनविण्यासाठी उत्सुकता दर्शविली होती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी रशियाने प्रकल्प चालवण्यासाठी भारतीय भागीदार निवडला आहे.
- विविध भारतीय जहाजबांधणी बनविणाऱ्या कंपन्यांचे आणि त्यांच्या क्षमतेचे परीक्षण केल्यानंतर रशियन सरकाने ‘पिपाव्हेव डिफेन्स’ची निवड केली आहे.