चालू घडामोडी (20 मार्च 2017)
देशातील सर्वांत मोठा बोगदा सुरू होणार :
- भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
- काश्मीरवासीयांसाठी हा आशेचा बोगदा असल्याचे संबोधले गेले असून, या बोगदा खुला झाल्यानंतर जम्मू ते काश्मीर या मार्गातील 38 किमीचा खडतर मार्ग कोणत्याही मोसमात खुला राहणार आहे.
- विशेष म्हणजे या बोगद्याचे भूमिपूजन 2011 साली राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते.
- बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प होणा-या राष्ट्रीय महामार्ग एकची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. अडतीस किमीचा फेरा वाचणार आहे.
- तसेच या बोगद्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क आणि मनोरंजनासाठी एफएम सिग्नलही मिळावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ :
- उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी शपथ घेतली. तर, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली.
- लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते, आमदार उपस्थित होते.
- राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते.
- तसेच याबरोबर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले होते.
- गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
- गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून, आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.
सीओएने सर्वात मोठा निर्णय घेत एमसीएचे पुर्ण सदस्यत्व काढून घेतले :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या ‘एक राज्य, एक मत’ या शिफारशीचा अखेर मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) फटका बसला.
- सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने (सीओए) सर्वात मोठा निर्णय घेताना एमसीएचे पुर्ण सदस्यत्व काढून घेतले आहे.
- सीओएने बीसीसीआयच्या नव्या संविधानाची व दिशानिर्देशकाची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली असून याव्दारे एका राज्यातून केवळ एकच पुर्ण सदस्यत्व संघटना राहू शकते, हे स्पष्ट केले.
- बीसीसीआयच्या संविधानाला अंतिम स्वरुप दिल्यानंतर सीओएने हा निर्णय घेतला. त्याचवेळी, या सीओएव्दारा बिहार, तेलंगना आणि उत्तर पुर्वेकडील राज्यांना पुर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आले.
- विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे योगदान मुंबई क्रिकेटचे राहिले असल्याने सीओएने घेतलेला निर्णय धक्कादायक ठरला आहे.
भारतीय रेल्वे तंत्रज्ञान निर्यात करणार :
- ‘मेक इन इंडिया’अंतर्गत पहिली लोकल सेवेत दाखल झाल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत रेल्वेने तंत्रज्ञान आयात करण्यावर भर दिला होता; पण हे चित्र पूर्ण बदलले आहे.
- तंत्रज्ञान आयातीचे प्रमाण तीन टक्क्यांवर आणले आहे. यापुढे भारतीय तंत्रज्ञान परदेशात निर्यात करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.
- भारतीय बनावटीच्या ‘मेधा’ लोकलबरोबर विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये करण्यात आले.
- एलटीटी-टाटानगर या अंत्योदय एक्स्प्रेसला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही एक्स्प्रेस सर्वसाधारण श्रेणीतील प्रवाशांसाठी असून, त्यात कुठलेही आरक्षण नाही. या गाडीला 20 डबे असून, त्यात दोन हजार आसने आहेत.
- तसेच याबरोबर भुसावळ-जळगावदरम्यान चौथ्या मार्गिकेचे भूमिपूजन, मिरज-सोलापूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनसवर 13 हजार चादरी धुण्याची क्षमता असलेली आधुनिक लॉण्ड्री व इतर सुविधांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उद्घाटन करण्यात आले.
- सोलापूर, गुलबर्गा, सुरत, इंदूर व राजकोट स्थानकात वाय-फाय सुविधा व चर्चगेट आणि भुसावळ येथील सौरऊर्जा प्रणालीचे उद्घाटनही करण्यात आले.
दिनविशेष :
- डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना 20 मार्च 1602 मध्ये झाली.
- 20 मार्च 1916 रोजी अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.
- डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा