चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2017)
भारतीय वंशाचा मुलगा ठरला ‘चाइल्ड जिनियस’ :
- ब्रिटनमधील ‘चॅनेल 4’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा 12 वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला.
- लंडनमध्ये शिकणाऱ्या राहुलने अंतिम फेरीत नऊ वर्षांच्या रोनन याचा 10 विरुद्ध 4 असा पराभव केला. म्हणजे अंतिम फेरीत विचारलेल्या सर्व 10 प्रश्नांची उत्तरे राहुलने अचूक दिली, तर रोननची फक्त चार उत्तरे बरोबर आली.
- आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात स्पर्धकांच्या स्मरणशक्तीसोबत गणित, इंग्रजी, इतिहास व इंग्रजी स्पेलिंगच्या ज्ञानाचा कस लागला.
- एडवर्ड जेन्नरने वैद्यकीय क्षेत्रात लावलेले शोध हा राहुलने आवडीचा विषय म्हणून निवडला होता व त्यावरच त्याला सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, पण त्याला खरा विजय मिळवून दिला, तो 19 व्या शतकातील विल्यम होलमन हंट आणि जॉन एवरेट मिलाईस या दोन कलावंतांशी संबंधित प्रश्नांच्या उत्तरांनी.
‘इन्फोसिस’ कंपनीकडून कोटींचे शेअर बायबॅक :
- इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 19 ऑगस्ट रोजी तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग ‘बायबॅक’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
- कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर तातडीने कंपनीने हा निर्णय घेतला.
- कंपनीच्या संचालक मंडळाने यासंदर्भात निवेदन जारी केले होते. सिक्का यांना मंडळाने पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना संस्थापक नारायण मूर्ती यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यांच्या चुकीच्या मोहिमेमुळे सिक्का यांना जावे लागल्याचे संचालक मंडळाने म्हटले होते.
- तसेच कंपनी स्वतःचेच शेअर खरेदीदारांकडून खरेदी करते, तेव्हा त्या पद्धतीला शेअर बायबॅक म्हणतात.
कृषी विद्यापीठात शहिदांना आदरांजली :
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना 20 ऑगस्ट रोजी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता आंदोलन 1968 साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी 20 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती.
- विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुर्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही.
- कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 रोजी झाली.
- तसेच विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणार्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन 20 ऑगस्ट रोजी करण्यात येते.
दिल्लीला मिळणार वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच :
- भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे.
- केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत, चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे.
- अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊनच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- गूगलचा संस्थापक ‘सर्गेइ ब्रिन’ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1973 मध्ये झाला.
- 21 ऑगस्ट 2006 हा दिवस ख्यातनाम भारतीय सनईवादक ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा