चालू घडामोडी (21 फेब्रुवारी 2018)
भारताकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद :
- ‘राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत’, असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले.
- यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. ‘प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव’ ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य ‘थीम’ असेल.
- ‘विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये भारताने समतोल साधण्यात यश मिळविले आहे’ असे निरीक्षण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (यूएनईपी) नोंदविण्यात आले आहे.
- पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि ‘यूएनईपी’चे प्रमुख एरिक सोलहेम यांनी 19 फेब्रुवारी रोजी संयुक्तरित्या यजमानपदाची घोषणा केली. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी आहे.
पाकिस्तानकडून मँडरिन भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा :
- पाकिस्तानचे चीन प्रेम पुन्हा एकदा समोर आले असून चीनमधील मँडरिन या भाषेचा पाकिस्तानमधील अधिकृत भाषांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत जनतेमधील संवाद वाढण्यास हातभार लागेल, असा दावा केला जात आहे.
- पाकिस्तानमधील सिनेटने मँडरिन भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे. मात्र, पाकच्या या निर्णयाला ट्विटरवरुन अनेकांनी विरोध दर्शवला.
- पाकिस्तानमधील बोली भाषांना डावलून परदेशी भाषेला स्थान देण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
- पाकिस्तानमध्ये इंग्रजी, अरबी, उर्दुसह मँडरिनचा अधिकृत भाषांच्या यादीत समावेश झाला. पंजाबी, पश्तू या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, अजूनही या भाषांना सरकार दरबारी अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
कमल हसन करणार नव्या राजकीय पक्षाची स्थापना :
- प्रसिद्ध तमिळ अभिनेता कमल हसन हे 21 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. तसेच ते मदुराईतील ‘मार्गदर्शक तत्व’देखील जाहीर करतील.
- पहिल्या टप्प्यातील प्रचार रॅलीदरम्यान कमल हसन हे त्यांच्या मूळ गावी रामानाथपुरम भेट घेतील. त्यानंतर मदुराई, दिंडीगुल आणि सिवागंगाई जिल्ह्यात ते दौरा करतील. तामिळनाडूमध्ये राजकारणाची नासधूस होत असल्याने 63 वर्षीय कमल हसन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार केला आहे.
- कमल हसन यांच्या मदुराईतील रॅलीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहे.
अण्वस्त्रवाहू अग्नी 2 ची यशस्वी चाचणी :
- भारताने अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
- ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 20 फेब्रुवारी रोजी सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे.
- इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली.
- अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
- भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलेच हे क्षेपणास्त्र आहे. या सीरीजमध्ये अग्नी 1 (700 किमीचा पल्ला), अग्नी 3 (3000 किमीचा पल्ला), अग्नी 4 (4000 किमीचा पल्ला) व अग्नी 5 (5000 किमीपेक्षा जाल्त पल्ला) यांचा समावेश आहे.
महिलांसाठी पूरक वातावरणाची गरज :
- देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात. त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर मोठे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे मत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत झालेल्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
- उद्योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी स्वत:ला कोणत्याही पातळीवर कमी न समजता पूर्ण आत्मविश्वासाने आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करत वाटचाल करणे गरजेचे आहे. महिलांना काम करण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले.
- या चर्चासत्रात कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटनमंत्री बर्दीश छग्गर, भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन, मेट्रोपॉलीस हेल्थ केअरच्या व्यवस्थापकीय संचालिका अमीरा शाह, मल्टिप्लेस अल्टर्नेट सेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणुका रामनाथ, इस्त्रोच्या उपप्रकल्प संचालिका मीनल संपथ, ‘हे दीदी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय, मेझॉन कंपनीच्या संचालिका अर्चना व्होरा सहभागी झाल्या होत्या.
दिनविशेष :
- जॉर्ज ग्रीनॉ यांना सन 1842 मध्ये शिवणमशिनचे पेटंट मिळाले.
- लाहोर कट-लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी 21 फेब्रुवारी 1915 रोजी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
- 122 वर्षे 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला ‘जीन काल्मेंट’ यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1875 रोजी झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा