चालू घडामोडी (21 जुलै 2017)
रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती :
- भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाप्रणित रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे.
- रामनाथ कोविंद यांना 7 लाख 2 हजार 44 (65.65 टक्के) मते तर काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांना 3 लाख 67 हजार 314 (35.34 टक्के) मते मिळाली.
- रामनाथ कोविंद यांनी मीराकुमार यांचा 3 लाख 34 हजार म्हणजे जवळपास दुप्पट मतांनी पराभव केला.
- रामनाथ कोविंद यांच्या रूपाने राष्ट्रपतिपदी प्रथमच भाजपचा नेता विराजमान होत आहे.
महिला विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत :
- अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
- अष्टपैलू हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या तुफानी दीड शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या भारताने गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी नमवले.
- प्रथम फलंदाजी करताना भारताने 42 षटकांत 4 बाद 281 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 40.1 षटकांत 245 धावांवर रोखले.
- तसेच विश्वविजेतेपदासाठी भारतीय महिला संघ यजमान इंग्लंडविरुद्ध 23 जुलैला लॉडर्स मैदानावर अंतिम फेरी खेळतील.
कर्मचारींना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ आणि पेन्शन :
- कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने (ईपीएफओ)ने स्वतःच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ देण्याचे निर्देश दिले आहेत.
- प्रश्नोत्तराच्या तासाला संसदेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली.
- ईपीएफओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रिय कार्यालयांना हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफ) योजना, 1952 आणि कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस), 1995च्या सदस्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शनचा भरणा करावा, असे स्पष्ट निर्देश कंपन्यांना ईपीएफओने केले आहेत.
- केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय म्हणाले, ग्रॅच्युइटी देयके कायदा 1972 अंतर्गत ज्या व्यक्तीला ज्या वेळेपासून ग्रॅज्युटीचे पैसे द्यावे लागणार आहेत, त्यांना 30 दिवसांच्या आतच सर्व रक्कम देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियात आढळले हजारो वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष :
- ऑस्ट्रेलिया खंडात 65 हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाले आहे. या शोधाने आधुनिक मानवाने आफ्रिकेतून स्थलांतराला सुरुवात केल्याच्या ज्ञात इतिहासाला बदलले आहे.
- ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडील प्राचीन काकाडूतील जाबिलूका येथील खाणींच्या पट्टय़ामध्ये पुरातत्त्व खोदकामात ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीचे वास्तव्य येथे किमान 65 हजार वर्षांपासून असल्याचे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आढळून आले. त्याप्रमाणे येथे राहणारे मानवाचे पूर्वज हे अवजारे बनविण्यातदेखील कुशल असल्याचे आढळले.
- तसेच याआधी समजल्या जाणाऱ्या काळाच्या 18 हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे ऑस्टेलियात वास्तव्य होते असे आढळून आले.
- या नव्या शोधामुळे जगभरातील पुरातत्त्वक्षेत्रामध्ये कुतूहल निर्माण झाले असून या संशोधनाची समीक्षा प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केली असून ती नेचर या प्रतिष्ठित विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच व्यवहारात येणार नवी नोट :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच महात्मा गांधी मालिका-2005ची 20 रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या नोटेची रचना सध्या बाजारात असलेल्या नोटेप्रमाणेच असेल.
- आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकाप्रमाणे या नव्या 20 रूपयांच्या नोटेच्या नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये ‘S’ हे आद्याक्षर लिहिलेले असेल. यावर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
- आरबीआयने म्हटले आहे की, या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलमधील इनसेट लेटरमध्ये ‘S’ लिहिलेले असेल. त्याचबरोबर या नोटेची रचना बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या नोटेप्रमाणेच असेल, असेही आरबीआयने म्हटले आहे.
- तसेच 20 रूपयांच्या सध्या व्यवहारात असलेल्या नोटाही व्यवहारात असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. जुन्या 20 रूपयांच्या नोटांच्या इन्सेट लेटरमध्ये ‘R’ हे आद्याक्षर आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा