चालू घडामोडी (21 जून 2018)
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागाराचा पदावरून पायउतार :
- देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली.
- अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. परंतु, सरकारने त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता.
- जेटली यांनी ‘थँक यू अरविंद‘ या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच त्यामुळे आपल्या समोर पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी दिलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार देखील मानले आहेत. ऑक्टोबरमध्ये ते अमेरिकेत जाणार आहेत, असे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
- मूत्रपिंडाच्या ऑपेरेशनमुळे सुट्टीवर असलेले अरुण जेटली गेले काही दिवस फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक विषयांवर भाष्य करत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांना अटक :
- डी.एस. कुलकर्णी यांच्या आर्थिक गुंतवणूकदार घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी अध्यक्ष सुशिल मुनोत (जयपुर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद), डीएसके कंपनीचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर आणि सीए सुनिल घाटपांडे या सहा जणांना 20 जून रोजी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेकडुन चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशीअंती नियमबाह्य कर्ज देणे व घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
- डीएसके यांच्या अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदोपत्री बनावट कंपन्यांना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
- तसेच डीएसके यांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आणि अन्य गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. सर्व सहा जणांवर खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल : 120 ब, 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 109 / 34, 13 (1 क), 13 (2).
शनी शिंगणापूर मंदिरात महिलांनाही प्रवेश मिळणार :
- नगर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानात यापुढे महिलांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यासह आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली.
- शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. गर्दीच्या प्रमाणात याठिकाणी सोयी-सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्यक होते.
- तसेच यापूर्वीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत तसेच सध्या नव्याने नियुक्त विश्वस्तमंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
- त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही याठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन अधिनियमान्वये शनैश्वर देवस्थान राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जगभरात योगदिनाचा उत्साह 150 देशांचा सहभाग :
- 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात योगदिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत.
- अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच योगदिन साजरा होण्यास सुरुवात झाली असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील डेहरादूनमधील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी जवळपास 50 हजार लोक उपस्थित असल्याची माहिती भाजपाने दिली आहे.
- दुसरीकडे राजस्थानमधील कोटा येथे बाबा रामदेव मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत योगदिन साजरा करत असून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी तब्बल दोन लाख लोक एकत्र योग करणार आहेत.
जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी बीव्हीआर सुब्रमण्यम :
- जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी 20 जून रोजी ही नियुक्ती केली.
- तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी.बी. व्यास यांची राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुळचे आंध्रप्रदेशचे असलेले बीव्हीआर सुब्रमण्यम (वय 55 वर्षे) हे 1987व्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यामुळे ते सध्या मुख्य सचिव असलेल्या बी.बी. व्यास यांची जागा घेतील.
दिनविशेष :
- 21 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक योग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म 21 जून 1912 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते.
- 21 जून 1949 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात 21 जून 2015 पासून झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
v