चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2017)
जगातील सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये तीन भारतीयांचा समावेश :
- ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील 100 सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे.
- ‘100 ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत.
- तसेच यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.
- विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.
राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण :
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभरातील 2900 जुन्या पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण केले आहे.
- यापैकी एक हजार 123 पुलांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे.
- तसेच हा निधी उभारण्यासाठी ‘हुडको’कडून 1600 कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी पाठवल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने दिली.
- सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत मोठी आर्थिक व जीवितहानी झाली होती. त्यानंतर राज्यातील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे घोषित केले होते.
- असे आहे पुलांचे नियोजन – 1123 पुलांच्या दुरुस्तीसाठी वर्षभराचा कालबद्ध कार्यक्रम होणार.
1792 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
1600 कोटींचे कर्ज ‘हुडको’कडून घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
पुलांच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच 184 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
वर्षभरात 16 पुलांची दुरुस्ती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळंब, पालघरमधील सफाळे आणि बुलडाणा जिल्ह्यातील राहेर या पुलांचा समावेश.
बीसीसीआयकडून एम.एस. धोनीची ‘पद्मभूषण’साठी शिफारस :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याची ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
- ‘पद्म’ पुरस्कारासाठी एकच नाव पाठवण्यात आले असून, त्यात धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड योग्य असल्याचे ‘बीसीसीआय’चे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी सांगितले.
- दोन विश्वकरंडक स्पर्धा (2011 एकदिवसीय आणि 2007 टी-20) जिंकणारा धोनी एकमेव भारतीय कर्णधार आहे.
- धोनीने 302 एकदिवसीय सामने खेळताना 9,737 तर 90 कसोटी सामने खेळताना 4,876 आणि 78 टी 20 सामने खेळताना 1,212 धावा केल्या आहेत.
- यष्टिरक्षक म्हणून त्याने कसोटी 256, एकदिवसीय सामन्यात 285 आणि टी-20 मध्ये 43 असे एकूण 584 झेल घेतले आहेत.
- तसेच त्याने 163 फलंदाजांना यष्टिचीतदेखील केले असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतकही पूर्ण केले आहे.
सोनिया मोकलला आंतरराष्ट्रीय अॅथलॅटिकमध्ये सुवर्णपदक :
- अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे.
- आंतरराष्ट्रीय अॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे.
- सोनिया ही हाशिवरे या गावाची रहिवासी असून, घरची परिस्थिती बेताचीच, परंतु मनातील जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील आवड यामुळे तिने आपल्या क्रीडा गुणांना जोपासले.
- शिक्षण झाल्यानंतर 2011 साली ती मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. पोलीसमध्ये सुद्धा आपल्या क्रीडामध्ये नैपुण्य दाखविले. त्यामध्ये तिची आंतरराष्ट्रीय पोलीस फायर खेळ, लॉसएंजल्स अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये निवड झाली.
- तसेच या स्पर्धेमध्ये 800 मीटरमध्ये गोल्ड, 1500 मीटरमध्ये सिल्व्हर मेडल तर 3000 मीटरमध्ये स्टेपलचेस सिल्व्हर मेडल अशी पदके मिळाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा