चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2018)
आता पोस्टमनमार्फत न्यायालयीन समन्सवाटप :
- फौजदारी खटल्यांचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी आता न्यायालयाकडून बजावल्या जाणाऱ्या समन्सचे वाटप पोस्टमनमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.
- धनादेश न वटल्यासंबंधीच्या हजारो प्रलंबित दाव्यांची सुनावणी केवळ समन्स वेळेत पोचत नसल्यामुळे रखडली आहे, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
- गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंबंधी एक बैठक घेतली होती. त्यानुसार संबंधित निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे, असे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे.
- समन्स बजाविण्यासाठी सर्वसाधारणपणे पोलिस विभागाची मदत घेतली जाते; मात्र अपुऱ्या पोलिस बळामुळे अनेक समन्स रखडतात आणि त्यांची सुनावणीही थांबून राहते. तसेच साक्षीदारांनाही समन्स वेळेत बजावले न गेल्यामुळेही खटल्याचे कामकाज प्रलंबित असते, असे याचिकादारांनी निदर्शनास आणलेले आहे.
कमल हसनव्दारे ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची घोषणा :
- दाक्षिणात्य अभिनेता कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. मदुराईच्या ओथाकडाई मैदानात आपल्या लाखो पाठीराख्यांच्या साक्षीने कमल हसनने आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली.
- कमल हसनच्या नवीन पक्षाचे नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असे आहे. 21 फेब्रुवारीच्या सभेदरम्यान कमल हसनने आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाक्गेही अनावरण केले. एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असे हसन यांच्या नवीन पक्षांचे चिन्ह असणार आहे.
मोदी सरकारकडून बुंदेलखंड भागात कोटींची गुंतवणूक :
- उत्तर प्रदेशातील विकासापासून वंचित राहिलेल्या बुंदेलखंड भागात संरक्षण उद्योग मार्गिका सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तेथील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते.
- तसेच त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात आम्ही संरक्षण उद्योगांच्या दोन मार्गिकांची घोषणा केली आहे. त्यातील एक बुंदेलखंड भागात सुरू करण्यात येईल. त्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल.
- उत्तर प्रदेशची क्षमता खूप मोठी असल्याचे सांगून ते म्हणाले की, कुठल्याही भागाचा विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व त्यानुसार कामगिरी आवश्यक असते. मुख्यमंत्री आदित्यनाथ व येथील जनता या दोन कसोटय़ांवर खरे उतरतील याचा विश्वस आहे.
मोबाईल क्रमांक 10 अंकांचेच राहणार :
- सध्या 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आहेत. मात्र, आता हे क्रमांक बदलून 13 अंकी मोबाईल क्रमांक होणार असल्याच्या चर्चाँना उधाण आले. त्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, सर्व मोबाईलधारकांचे मोबाईल क्रमांक आता 10 अंकीच असणार आहे. त्यामुळे मोबाईलधारकांनी घाबरू जाण्याचे काही कारण नाही.
- गेल्या काही दिवसांपासून 10 अंकी मोबाईल क्रमांक 13 अंकांचे होणार असल्याचे वृत्त दिले जात होते. त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बदलला जाणार असल्याचे अनेक ग्राहकांना वाटत होते. मात्र, आता या निर्णयामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- 13 अंकी क्रमांक होणार असून, तो फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच. इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.
कृष्णा कोहली लढणार पाकिस्तान निवडणूक :
- जिथे ‘पॅडमॅन’ या चौकटीबाहेरील चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे, अशा पाकिस्तानमध्ये कृष्णा लाल कोहली यांनी एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
- पाकिस्तान संसदेच्या निवडणूकांमध्ये कोहली सहभागी झाल्या आहेत. किशू बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
- कृष्णा यांचे बंधू वीरजी कोहली यांची बेरानोच्या युनियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तेसुद्धा पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये कृष्णा यांची साथ देत आहेत. त्यामुळे जर वीरजी सिनेटर पदी नियुक्त झाले तर, अल्पसंख्याक हिंदू समाज आणि ग्रामीण सिंध प्रांतातून पाकिस्तानच्या संसदेत पोहोणाऱ्या आणि राजकीय सूत्र हातात घेणाऱ्या कृष्णा या पहिल्या महिला ठरणार आहेत.
दिनविशेष :
- महामहोपाध्याय पण्डित ‘महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य’ यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला.
- बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला.
- 22 फेब्रुवारी 1944 रोजी ‘कस्तुरबा गांधी’ यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन झाले.
- श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सन 1978मध्ये 22 फेब्रुवारी रोजी भारताचे 16वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा