चालू घडामोडी (22 मार्च 2018)
मुंबईत उभारला जाणार बॉलिवूड संग्रहालय :
- मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षणकेंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भव्य बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल. यासाठी वांद्रे व जुहू परिसरात जागा मिळण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत मागणी करू, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सांगितले.
- पर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम 293 अन्वये विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेला काल रात्री उशिरा उत्तर देताना रावल बोलत होते. चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. मंत्री रावल यांनी या सर्व सूचना लक्षात घेऊन काल विधानसभेत उत्तर दिले.
- तसेच या वेळी रावल म्हणाले, मंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर हेण्याच्या दृष्टीने तसेच देश विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट ऍट्रॅक्शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल.
‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्राची मंजुरी :
- देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 21 मार्च रोजी मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.
- या योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’ मध्येच समाविष्ट होणार आहेत. या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.
- ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात 16 ते 59 या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब; यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्यातून अमोल मोरे पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत खेळणार :
- गतीमंद असुनही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रात, व्यायाम प्रकारात देशविदेशात महाराष्ट्र संघासाठी उल्लेखनिय यश मिळवणारा देवरुख वरचीआळी येथील अमोल अनिल मोरे याने स्पेशल ऑलिंम्पिक मध्ये पाॅवरलिफ्टींग प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आता तो महाराष्ट्र संघातून विदेशात होणार्या पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
- अमोल अनिल मोरे हा गतिमंद आहे. त्याला चिपळुण येथील जिद्द संस्थेने शिक्षण दिले आहे. तर व्यायामाचे धडे चिपळुणच्याच शिर्के जिमकडून मिळाले आहेत. बावीस वर्षीय अमोल आता नॅशनल लेव्हलला होणार्या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेची तयारी करत आहे. देवरुख नगरपंचायत व्यायाम शाळेचे प्रशिक्षक अमोलला बेंचप्रेस, स्कॉट, डिल्ट या तीन प्रकारात व्यायामाचे धडे देत आहेत.
- अमोलने उत्तरप्रदेशमध्ये भोपाळ येथील पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवले यामुळे नॅशनलसाठी त्याचे सिलेक्शन झाले आहे. मुंबई,कोल्हापूर ,मिरजचे प्रशिक्षक अमोलसाठी मेहनत घेत आहेत.
- ऑल इंडिया लेव्हलला अमोलला स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. पॉवरलिफ्टिंग, अॅथलॅटिक्स, गोळाफेक, या प्रकारात अमोलने चांगले यश मिळवलेआहे.आता पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी देशाबाहेर जाण्याची संधी पुन्हा एकदा अमोलला मिळाली आहे.
फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ :
- फेडरल रिझर्व्हने व्याजदर पुन्हा एकदा वाढविले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेले स्थैर्य, रोजगार आणि गुंतवणुकीतील वाढ आणि महागाई नियंत्रणात येत असल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीने फेडरल फंड्स रेट 1.5 ते 1.75 टक्क्यांदरम्यान आला आहे.
- फेडरल रिझर्व्हकडून दर वाढ करण्याची ही सलग सहावी वेळ आहे. ‘आम्हाला अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच सध्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे,’ असे फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले.
- दरवाढीच्या घोषणेला जगभरातील शेअर बाजारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमेरिकी शेअर बाजारातील ‘एस अँड पी 500’ निर्देशांकाने 200 अंशांनी उसळी घेतली आहे. वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याने शेअर बाजारातील वाढ कायम असल्याचे जाणकारांचे मत आहे.
महाराष्ट्रातील जंगलात सुमारे अडीचशे वाघांचा अंदाज :
- देशात व्याघ्रगणनेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, महाराष्ट्रातील जंगलात सुमारे 235 ते अडीचशे वाघ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आनंदाची बाब असली तरी दिवसेंदिवस जगंलाची गुणवत्ता कमी होत चालल्याने भविष्यात वाघांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. याच कारणामुळे मानव व वन्यजिवांमधील संघर्ष वाढणार असल्याचा निष्कर्षसुद्धा तज्ज्ञांनी काढला आहे.
- डिसेंबर 2017 पासून राज्यात व्याघ्रगणनेला सुरवात झालेली आहे. त्याची आकडेवारी देशपातळीवर मार्च 2019 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र आणि इतरही माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयांनी संबंधितांना पाठविलेल्या आहेत. यंदा जळगावमध्येही वाघांचे अस्तित्व दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे.
- गणनेमध्ये देशातील वाघांची संख्या 2 हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात वाघांची संख्या वाढलेली दिसली, तरी यामध्ये वाघ आढळणारी सर्वच राज्ये चांगले काम करत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढली आहे.
केंद्राकडून न्यायालयात आधारचे समर्थन :
- सरकारी योजनांचा, सवलतींचा लाभ घेणाऱ्या व्यक्तिची शहानिशा करणे सुकर व्हावे, या योजनांचा गैरफायदा कुणाला घेता येऊ नये तसेच बोगस पॅनकार्डासारखे गैरप्रकारही रोखता यावेत, यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचा युक्तिवाद केंद्राने 21 मार्च रोजी सर्वोच्च न्यायलयात केला.
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठासमोर केंद्राच्यावतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. आधारमुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तिलाच मिळेल, पारदर्शकता निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल, असा दावा त्यांनी केला.
- आजवरच्या अनेक सरकारांनी सवलती, शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कोटय़वधी रुपयांचे साह्य़ कागदोपत्री केले. मात्र अनेकदा त्या सवलतीचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचलाच नाही, हे उघड झाले आहे. त्यामुळे अंमलबजावणीतील त्रुटी रोखण्यासाठी आधार आवश्यक आहे, असा दावाही वेणुगोपाल यांनी केला.
दिनविशेष :
- सन 1739 मध्ये नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
- ‘ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क’चे स्थापक ‘पॅट रॉबर्टसन’ यांचा जन्म 22 मार्च 1930 रोजी झाला.
- सन 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
- लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना 22 मार्च 1999 रोजी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा