चालू घडामोडी (23 मार्च 2017)
1 एप्रिलपासून पाच बँकांचे होणार एसबीआयमध्ये विलीनीकरण :
- 1 एप्रिलपासून देशातील 5 बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. 1 एप्रिलपासून या पाच बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक भाग असणार आहेत.
- तसेच या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा या बँकांचा समावेश आहे.
- 1 एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा एसबीआयच्या ब्रँचच्या स्वरुपात काम करणार आहेत. भारतीय महिला बँकेचे सुद्धा एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे.
- केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जागतिक वनदिनी ‘हिरवा संघर्ष’ पुस्तकाचे प्रकाशन :
- जागतिक वनदिनाचे औचित्य साधून किशोर रिठे यांच्या “हिरवा संघर्ष” या महाराष्ट्रातील वनांच्या संवर्धनाची स्थिती, आव्हाने व दिशा मांडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मंत्रालयात झालेल्या एका विशेष समारंभात करण्यात आले.
- 21 मार्च रोजी संपूर्ण जगभर “जागतिक वनदिन” साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील मुख्य सचिवांच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव श्री. सुमित मल्लीक (भा.प्र.से.), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. प्रवीण परदेशी (भा.प्र.से.) व सुप्रसिद्ध कवी श्री. अशोक नायगावकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
ओडिशातील ‘नीलाचल’ला इस्पात सुरक्षा पुरस्कार :
- ओडिशातील नीलाचल इस्पात निगम लि. कंपनीला यंदाचा मानाचा इस्पात सुरक्षा पुरस्कार मिळाला आहे.
- कंपनीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. कंपनीने आपल्या एकात्मिक पोलाद प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा प्राणघातक अपघात घडू दिला नाही. त्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
- रांचीत पार पडलेल्या एका समारंभात कंपनीचे कार्यकारी संचालक (कार्य) आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख एम. एम. पंडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- पोलाद उद्योगातील सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण विषयक संयुक्त समितीने या पुरस्कारासाठी नीलाचलची निवड केली.
- 2016 मध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात घडू न देता सुरक्षितपणे काम पार पाडल्यामुळे नीलाचलची पुरस्कारासाठी निवड झाली. नीलाचल प्रकल्प कलिंगनगर औद्योगिक वसाहतीत आहे.
एलएचसी प्रयोगात पाच नवीन कणांचा शोध :
- अणूचे पाच नवीन उपकण लार्ज हैड्रॉन कोलायडर या महाकाय उपकरणाच्या मदतीने केलेल्या प्रयोगात शोधण्यात आले आहेत. एकाच निरीक्षणात अणूच्या उपकणातील पाच अवस्था सापडण्याचे हे दुर्मीळ संशोधन आहे.
- एलएचसी प्रयोग हा जगातील सात कण भौतिकी शोधन प्रयोगांपैकी एक असून युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीयर रीसर्च या संस्थेच्या नेतृत्वाखाली तो केला जात आहे. काही अणू उपकणांचे क्षरण यात आढळून आले असून त्यात द्रव्य-प्रतिद्रव्य असममिती दिसून आली आहे.
- नवीन कण हे उत्तेजित अवस्थेत असून त्यांची ऊर्जा क्षमता खूप जास्त आहे. यातील कणाचे नाव ओमेगा सी झिरो असे आहे, त्याला बेरीऑन असेही म्हणतात. त्यात तीन क्वार्क असतात.
- ओमेगा सी झिरोचे क्षरण होऊन एक्सआय-सी-प्लस व काओन के हा कण तयार होतो, एक्स आय प्लस कणाचे क्षरण होऊन त्यात काओन के व प्रोटॉन पी व पियॉन पी प्लस हे कण तयार होतात.
- ओसी (3000)0, ओसी (3050)0, ओसी (3066)0, ओसी (3090)0 व ओसी (3119)0 अशी या कण अवस्थांची नावे असून त्यात त्यांचे वस्तुमान मेगाइलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे, बेरीऑन मध्ये तीन क्वार्क कसे बंधित असतात व क्वार्कमधील परस्पर संबंधातून मल्टी क्वार्क स्टेटसचेही ज्ञान मिळणार आहे. त्यात टेट्राक्वार्क व पेंटाक्वार्कचा समावेश आहे.
भारत मॉरिशसला सहकार्य करणार :
- मॉरिशसच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी भारत सतत पाठिंबा देत राहील, असे आश्वासन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मॉरिशसचे उपपंतप्रधान शोकुताली सोधून यांना दिले.
- प्रधान यांनी नवी दिल्ली येथे सोधून यांची भेट घेऊन व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारताचा सार्वजनिक उपक्रम असलेली हायड्रोकार्बन क्षेत्रातील मंगलोर रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) ही रिफायनरी 2006 पासून मॉरिशसला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करीत आहे.
- तसेच हे दोन्ही देश तेल आणि वायू क्षेत्रातील व्दिपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा