चालू घडामोडी (23 मे 2016)
भारत-ओमानमध्ये संरक्षणविषयक करार :
- भारत आणि ओमान यांनी (दि.22) द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने पावले टाकली.
- दोन्ही देशांनी लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोचल्यानंतर हे करार झाले.
- ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली.
- परस्पर हिताच्या दृष्टीने प्रादेशिक विकासावर दोन्ही देशांनी आपली मते मांडली, असे निवेदन संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
- संरक्षण सहकार्य हा द्विपक्षीय रणनीती भागीदारीचा महत्त्वाचा पैलू असल्याची नोंद दोन्ही देशांनी घेतली.
‘नॅक’कडून मूल्यांकनासाठी नवीन पद्धत :
- विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे.
- नव्या धोरणानुसार आता ‘ए’ ग्रेडमध्ये सुधारणा करून ‘ए ए प्लस’ आणि ‘ए प्लस प्लस’ असे ग्रेड राहणार आहेत.
- बंगळुरू येथील ‘नॅक’ संस्थेचे संचालक डी. पी. सिंग यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जाहीर केले आहेत.
- प्रचलित पद्धतीमध्ये ‘नॅक’तर्फे डी (1 ते 1.5 सीजीपीए), सी (1.51 ते 2.00 सीजीपीए), बी (2.01 ते 3.00 सीजीपीए) आणि ए (3.01 ते 4.00 सीजीपीए) असे ग्रेड देण्यात येतात.
- मात्र आता बी आणि ए ग्रेडअंतर्गत प्रत्येकी तीन श्रेणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- नव्या पद्धतीनुसार डी आणि सी ग्रेड कायम राहणार आहेत. बी ग्रेडअंतर्गत ‘बी बी प्लस’ आणि ‘बी प्लस प्लस’, असे तीन ग्रेड राहतील.
- पूर्वी ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांची एकत्रित श्रेणी बिंदू सरासरी (सीजीपीए) 3.01 पासून ते 4 पर्यंत होती.
- 30 जूनपर्यंत ज्या संस्थांचे ‘नॅक’चे मूल्यांकन होणार आहे, त्या संस्थांना मात्र सध्या प्रचलित असलेली चार ग्रेडेशन पद्धत लागू राहणार असल्याचेही नॅकच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी किरण बेदी :
- माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- मागील जवळपास दोन वर्षांपासून या राज्याचा अतिरिक्त भार अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होता.
- किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातर्फे (दि.22) प्रसिद्ध करण्यात आले.
- तसेच या पदाची सूत्रे त्या स्वीकारल्याच्या दिवसापासून त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे.
- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय झाला असून, त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या असलेल्या बेदी यांची नायब राज्यपाल पदावर नियुक्ती होणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
- तसेच यानंतर अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ले. जन. अजयसिंह यांना पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती.
विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल :
- आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची (दि.22) एकमताने निवड झाली. त्यामुळे त्यांचा या राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
- निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपा आमदारांच्या पहिल्या बैठकीत आमदार हेमंत विश्वशर्मा यांनी सोनोवाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
- आमदार पी. फुकन, अतुल बोरा, अंगुरलता डेला, भाबेश कलिटा आणि ए.सी. जैन यांनी सोनोवाल यांच्या नावाला समर्थन दिले.
- केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत हे भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनीच सोनोवाल यांच्या निवडीची घोषणा केली.
प्रथमच स्वदेशी बनावटीच्या अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच तयार केलेले स्वदेशी बनावटीचे रियूझेबल लॉंच व्हेइकल (आरएलव्ही) या अवकाशयानाचे (दि.23) सकाळी श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण झाले.
- उड्डाणासाठी वातावरण सोयीचे असल्याने आज सकाळी स्वदेशी अवकाशयानाचे उड्डाण घेण्यात आले.
- ‘आरएलव्ही टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’चा उद्देश पृथ्वीभोवतीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करून पुन्हा पृथ्वीवर परत येणे हा आहे.
- तसेच हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या साह्याने केले जाणार आहे. या रॉकेटची लांबी नऊ मीटर असून वजन अकरा टन आहे, असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवन यांनी सांगितले.
- या पंख असलेल्या अवकाशयानासाठी कोणत्याही प्रकारे विदेशी मदत घेतली गेली नसल्याने भारताच्या अवकाश क्षेत्रातील यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- एखाद्या ‘एसयूव्ही’ मोटारइतका आकार आणि वजन असलेले ‘आरएलव्ही-टीडी’ अवकाशयान अंतिम उद्दिष्ट असलेल्या अवकाशयानाचे प्रारूप आहे.
कसोटी क्रिकेट मध्ये जेम्स अँडरसनचा नवा विक्रम :
- पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची दाणादाण उडवलेल्या जेम्स अँडरसन याने 5 बळी मिळविताना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविला.
- तसेच या शानदार कामगिरीसह अँडरसनने भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा सर्वाधिक 434 बळींचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले.
- लंकेविरुद्ध पहिल्या डावात 5 बळी घेताना अँडरसनने आपल्या बळींची संख्या 438 इतकी केली.
- सामन्यात कौशल सिल्वाला बाद करून अँडरसनने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर यानंतर अँजेलो मॅथ्यूजला बाद करून ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
- अँडरसनने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांत 29.18 च्या सरासरीने 438 बळी घेतले आहेत.
- कपिल देव यांनी 227 डावांमध्ये 434 बळी घेतले होते, तर अँडरसनने हीच कामगिरी 213 डावांमध्ये केली.
- तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन असून, त्याने 133 कसोटी सामन्यात तब्बल 800 बळी घेतले आहेत.
- तर, भारताचा माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे 619 बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा