Current Affairs of 23 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 मे 2018)
समुद्रमार्गे विश्वभ्रमंती करुन भारतात परतल्या तारिणी :
- भारतीय नौदलात कार्यरत असणाऱ्या सहा महिला अधिकारी संपूर्ण जगाची भ्रमंती केल्यानंतर अखेर मायदेशी परतल्या आहेत. जवळपास आठ महिन्यांहून जास्त काळ समुद्राच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा मारणारं ‘आयएनएसव्ही तारिणी’चे महिला दल गोव्यात दाखल झाले आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली.
- लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीच्या नेतृत्त्वाखाली या धाडसी महिला अधिकाऱ्यांच्या गटाने हे आवाहन पेलले होते. साधारण 254 दिवसांसाठीच्या या प्रवासात त्यांनी 26 हजार समुद्र मैलांचे अंतर कापले. या अद्वितीय कामगिरीबद्दल रक्षामंत्री निर्मला सीतारामन आणि नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी गोव्यात या सहा महिला अधिकाऱ्याचे स्वागत केले.
- सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विश्वभ्रमंती करुन परतलेल्या या सहाजणींचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. नेटकऱ्यांनी आपल्याला या महिला अधिकाऱ्यांचा प्रचंड अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.
Must Read (नक्की वाचा):
‘एसबीआय’ला 7 हजार 718 कोटींचा तोटा :
- बुडीत कर्जे, बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली.
- देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या बुडीत कर्जामध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात बँकेने बुडीत कर्जांकरिता 66 हजार 58 कोटींची तरतूद केली. बॅँकेला वर्षभरात 2 लाख 65 हजार 100 कोटिंचा महसूल मिळाला असून यात गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ घट झाली.
- चौथ्या तिमाहीत बँकेला 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला. या तिमाहीत 23 हजार 601 कोटींची तरतूद केली. चौथ्या तिमाहीत बँकेला 68 हजार 436 कोटींचा महसूल मिळाला असून 15 हजार 883 कोटींचा परिचालन नफा झाल्याचे बँकेने म्हटले आहे.
- तसेच ऊर्जा, पोलाद आणि बांधकाम आदी पायाभूत सेवा क्षेत्रात बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जे दिली असून त्यातील अनेक बुडीत खात्यात गेली आहेत.
गुगलकडून राजा राममोहन रॉय यांना मानवंदना :
- भारतात आधुनिक विचारांचा लढा उभारणाऱ्या आणि सतीप्रथी, बालविवाह यांसारख्या प्रथा बंद करण्यासाठी आग्रही असलेल्या राजा राममोहन रॉय यांना गुगलने आदरांजली वाहिली आहे. 246व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे डुडल तयार करत त्यांना मानवंदना दिली आहे.
- राजा राममोहन रॉय यांनी शेकडो वर्षापूर्वी महिलांच्या अधिकाराचे समर्थन करत स्त्रीयांची समाजातील विविध जाचातून सुटका होण्यासाठी पुढाकार घेतला होता. समाजसुधारक म्हणून ओळख असणाऱ्या राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी येथे त्यांचा जन्म झाला. हेच निमित्त साधत गुगलने अतिशय आकर्षक असे डुडल बनवले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एका भारतीय समाजसुधारकाची जागतिक स्तरावर अशाप्रकारे दखल घेतली जाणे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
- त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी चार भाषा अवगत होत्या. फारसी आणि अरबी भाषेबरोबरच त्यांनी संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी वैदीक ग्रंथांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. श्रुती, स्मृती, पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा त्यांनी सखोल अभ्यास केला.
- मूर्तीपूजा अयोग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तत्कालिन समाजाला ते पटणारे नव्हते. त्यामुळे आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
- तसेच सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून ब्रिटिश सरकारकडे अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खूश होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब देऊन गौरवले होते.
जी.परमेश्वर होतील कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री :
- कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी.परमेश्वर शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के.आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळ स्थापनेबाबत चर्चा झाली. यामध्ये एकूण 34 खात्यांपैकी 22 खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह 12 खाती जेडीएसला देण्याबाबत निर्णय झाला.
- तसेच 24 मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल, असे काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
सोलापूर व शिझियाझाँग शहरामध्ये भगिनी शहरे करार :
- तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे करारावर शिक्कामोर्तब झाले. महापौर शोभा बनशेट्टी व शिझियाझाँग शहराचे महापौर डेन पेरीयन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
- सोलापूर आणि शिझियाझुयँग या दोन शहरामध्ये 2005 साली भगिनी शहर करार संमत झालेला आहे. तथापि, यामध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती. शिझियाझुयँग या शहरात 16 मे 2018 रोजी चीन व भारत या देशामध्ये करार झाला.
- येथील महापौरांनी सोलापूरातून वौद्यकीय व इतर शिक्षण घेण्यासाठी आपल्या शहरातून विद्यार्थी पाठवा, आम्ही त्यांना शिक्षण देऊ तसेच औद्योगिक विकासासाठी वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री व टेक्नॉलॉजी देणे आणि सोलापूरात त्यांच्या खर्चातून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊन त्याचा विकास करुन सेवा देता येईल याबद्दल परवानगी मागितली.
- एक महान चिकित्सक डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्यामुळे या दोन शहरांचे बंध जुळले आहेत. डॉ. कोटणीस यांनी त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहिले आहे. तथापि, त्यांनी केलेले कार्य आजही चीनमधील लोकांमध्ये जिवंत आहे आणि चीनमधील लोक आणि चीन सरकारला डॉ. कोटणीस यांच्या मानवतावादी कार्याबद्दल नितांत आदर आहे.
दिनविशेष :
- आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक 23 मे 1956 रोजी मंजूर झाले.
- बचेन्द्री पाल यांनी 23 मे 1984 रोजी दुपारी 1.09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
- जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती सन 1995 मध्ये 23 मे रोजी प्रकाशीत केली गेली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा