चालू घडामोडी (24 एप्रिल 2017)
सुनीत जाधव ठरला तिसऱ्यांदा मुंबई महापौर श्री स्पर्धेचा मानकरी :
- स्टार शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने पुन्हा एकदा आपला दबदबा राखताना तिसऱ्यांदा मानाची मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकली.
- विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्याचवेळी, त्याने यंदाचा मुंबई श्री ठरलेल्या अतुल आंब्रेचे आव्हान सहजपणे परतावून लावले.
- दरम्यान, अभिषेक खेडेकर याने आपल्या आकर्षकरीत्या शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना बेस्ट पोझरचा किताब पटकावला.
- बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना व मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या सहकार्याने शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत सुनीतचाच बोलबाला राहिला.
- 80 किलोवरील वजनी गटातून सहभागी झालेला सुनीत ज्यावेळी मंचावर आला, तेव्हाच स्पर्धेचा विजेता निश्चित झाला.
पासपोर्टसाठी हिंदीतही अर्ज करता येणार :
- नव्याने पासपोर्ट काढण्यासाठी आता हिंदी भाषेमध्येही अर्ज करण्याची सुविधा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- अधिकृत भाषांबाबतच्या संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील या बाबतची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्विकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- 2011 मध्ये देण्यात आलेल्या या अहवालात पासपोर्टसाठी हिंदी भाषेत अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच पासपोर्ट कार्यालयांमध्ये हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील अर्ज असावेत, अशी शिफारस करण्यात आली होती.
- पासपोर्टमध्ये होणाऱ्या नोंदी सुद्धा हिंदीमध्येच करण्यात याव्यात असेही अहवालात सांगण्यात आले होते. या शिफारसी राष्ट्रपतींव्दारे स्विकारण्यात आल्या आहेत. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हा निर्णय घेतला.
- तसेच यापुढे पासपोर्ट काढताना इंटरनेटवरुन हिंदी भाषेतील हा अर्ज डाउनलोड करता येऊ शकतो व त्याव्दारे अर्ज करता येऊ शकतो.
उत्तर प्रदेशमध्ये होणार योग आरोग्य केंद्र स्थापन :
- उत्तर प्रदेशच्या चाळीस जिल्ह्यांत चालू आर्थिक वर्षात योग आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत.
- आरोग्य विभागाच्या सादरीकरणादरम्यान राज्यातील उर्वरित 35 जिल्ह्यांत योग आरोग्य केंद्राची स्थापना केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार असल्याचे नमूद केले.
- तसेच येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये 51 हजार सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचीही माहिती आदित्यनाथ यांनी दिली.
- आयुर्वेद, युनानी, पंचकर्म आणि क्षारसूत्र विशेष विभाग केंद्राची स्थापना लखनौ, गोरखपूर, वाराणसी, सहारनपूर तसेच बांदा येथे केली जाणार आहे.
हिमांता शर्मा बॅडमिंटन महासंघाचे अंतरिम अध्यक्ष :
- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसाम बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांची 23 एप्रिल रोजी झालेल्या भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत अंतरिम अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- महासंघाचे सरचिटणीस आणि अधिकृत प्रवक्ता अनुप नारंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, की हिमांता बिस्वा शर्मा यांना 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अध्यक्ष अखिलेश दास यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
- महासंघाच्या घटनेनुसार कार्यकारी परिषदेच्या सदस्यालाच पदाधिकारी होता येणार असल्याने शर्मा यांना पहिल्यांदा विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारी परिषदेत सहभागी करून घेण्यात आले; त्यानंतर त्यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रक्रियेनंतर ते अंतरिम अध्यक्ष होण्यास पात्र ठरले.
बोपन्ना-क्युवासला मोंटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद :
- भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा त्याचा सहकारी पाब्लो क्युवासने अंतिम सामन्यात विजय मिळविताना मोंटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- बोपन्ना आणि क्युवास यांनी बिगरमानांकित फेलिसियानो लोपेझ आणि मार्क लोपेझ या स्पॅनिश जोडीला 1 तास 14 मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात 6-3, 3-6, 10-4 असे पराभूत केले.
- बोपन्ना आणि क्युवास जोडीचे हे या सत्रातील पहिलेच विजेतेपद आहे. बोपन्नाचे यावर्षीचे हे दुसरे विजेतेपद.
- तसेच यापूर्वी बोपन्नाने जीवन नेदुचेझियनसोबत चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली होती. दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा