चालू घडामोडी (24 एप्रिल 2018)
सोलापूर जिल्ह्यातील प्रथम पेपरलेस ग्रामपंचायत :
- मराठवाड्याच्या हद्दीलगत असलेल्या घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीने पेपरलेस होऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे.
- ग्रामपंचायतीच्या कामात गतिमानानता, एकसुत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने पेपरलेस ई-ग्राम प्रकल्पांतर्गत संगणकीकरण केले आहे.
- बहुतांश विभागाच्या कामकाजाचा ऑनलाईन जोड देऊन पेपरलेस विभाग करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू आहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करण्याच्या अन्य ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत.
- ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभारात वापरात येणारे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे ग्रामस्थांना मिळणार आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 अन्वये ग्रामपंचायतीच्या एकूण दप्तराची संख्या 33 इतकी आहे.
समुद्रकिनारा संरक्षण प्रकल्पाला मान्यता :
- शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहीम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या समुद्रकिनारा संरक्षण प्रकल्पाला मान्यता देऊन सदर काम प्राधान्याने सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाची 73 वी बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे संपन्न झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सागरकिनारा संरक्षण प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून 643.50 कोटी रुपये इतके कर्ज घेण्यास मान्यता दिली.
- महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या रुपये 321 कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास (बजेट) मान्यता दिली. तसेच मुंबई- मांडवा (अलिबाग) रो-रो सेवा प्रकल्पाचा आढावा घेतला व प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, हा प्रकल्प सुरू झाल्यास होणाऱ्या संभाव्य वाहतूकवाढीच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करावे, पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
- तसेच, कोस्ट गार्डला डहाणू येथे जेटी उभारण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, विविध ठिकाणच्या जेटी प्रकल्पांनाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त करण्यासाठी उज्ज्वला योजना गतिमानतेने राबवली. आतापर्यंत 30 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
- कोणी कितीही अपप्रचार केला तरी प्रत्यक्ष कामावर या सरकारने भर दिलेला आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे येथे ‘उज्ज्वला दिवस’चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
- खासदार अमर साबळे अध्यक्षस्थानी होते. या योजनेंतर्गत पंढरपुरातील 207 महिलांना लाभ झाला आहे. शहरातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
केंद्र सरकारकडून अफस्पा कायदा हटवण्यात आला :
- मेघालयातून पूर्णतः तर अरुणाचल प्रदेशमधून अंशतः सैन्य दल विशेष अधिकार कायदा अर्थात AFSPA कायदा हटवण्यात आल्याची घोषणा 23 एप्रिल रोजी केंद्र सरकारने केली.
- सप्टेंबर 2017 पासून मेघालयातील 40 टक्के भागात तर, 2017 पासून अरुणाचल प्रदेशातील 16 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अफस्पा कायदा लागू करण्यात आला होता.
- दरम्यान, अरुणाचलच्या 8 ठाण्यांच्या हद्दीतून अफस्पा हटवण्यात आला आहे. केंद्रीय गृहखात्याने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
- तसेच ईशान्येतील बंडखोरांच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत निधीची 1 लाखांवरून 4 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू झाला.
माकपच्या महासचिवपदी पुन्हा सिताराम येचुरी :
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी सीताराम येचुरी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. माकपच्या 22व्या पक्ष अधिवेशनातही निवड झाली असून येचुरी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ असणार आहे. त्याशिवाय माकपच्या 17 जणांच्या पॉलिट ब्युरोची निवड करण्यात आली आहे.
- मागील तीन दिवसांपासून माकपचे राष्ट्रीय अधिवेशन हैदराबाद येथे सुरू होते. 23 एप्रिल रोजी त्याचा समारोप झाला. या पक्ष अधिवेशनात माकपने विविध ठराव मंजूर केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला केंद्रातील सत्तेतून हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे येचुरी यांनी सांगितले.
- माकपच्या राजकीय प्रस्तावात अधिवेशनात बदल करण्यात आले. प्रतिनिधींनी सुचवलेल्या 373 दुरुस्त्यांपैकी 37 दुरुस्त्या मान्य करण्यात आल्या. माकपच्या नव्या 17 सदस्यीय पॉलिट ब्युरोमध्ये निलोत्पल बसू आणि कामगार नेते तपन सेन यांचा समावेश करण्यात आला आहे.
पीएम नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 27 आणि 28 एप्रिलला मोदी हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक शिखर बैठक होणार आहे.
- भारत-चीनमधील संयुक्त पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी डोकलाममध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील ही पहिलीच बैठक आहे.
- चीनच्या नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या समारोपाच्या पूर्व संध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन केला होता. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. विचारांची देवाण-घेवाण करत भारत-चीन संबंध आणखी सुधारण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, असे वांग यांनी सांगितले.
- तसेच भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी SCOच्या माध्यमातून आणखी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भारत यात पुढाकार घेऊन सकारात्मक योगदान देईल, अशी अपेक्षा वांग यांनी व्यक्त केली.
दिनविशेष :
- 24 एप्रिल 1674 मध्ये भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
- जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची 24 एप्रिल 1800 रोजी अमेरिकेत सुरवात झाली.
- भारतीय प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला.
- सन 1990 मध्ये 24 एप्रिल रोजी अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा