चालू घडामोडी (24 जानेवारी 2018)
देशातील पहिला पारदर्शक पुल माळशेजघाटात :
- जुन्नर जवळील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचे हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला ‘पारदर्शक पूल’ (वॉक वे) बांधण्यात येणार आहे.
- माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल तसं झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरणार.
- कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेजमध्ये पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल.
- 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. ‘वॉक वे’चं फ्लोरिंग पारदर्शी काचेचे राहील. या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचे थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा देण्यात येईल.
परदेशी गुंतवणुकीसाठी भारत आकर्षक देश :
- भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे.
- जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
- ‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला असून जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
- जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे.
- चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताने जपानला मागे टाकले आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी सुधीरकुमार रेड्डी :
- नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सी.एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी 23 जानेवारी रोजी पदभार स्विकारला. मावळते पोलीस प्रमुख डॉ.बी.आर. रविकांते गौडा यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
- डॉ. रविकांते गौडा यांची मंगळूरला बदली झाली असून, तेथे कार्यरत असलेले पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत.
- सुधीरकुमार रेड्डी 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून, ते मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. यापूर्वी त्यांनी मंड्या, बिदर येथे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम केले केले आहे.
- तसेच यापूर्वी त्यांनी भटकळ येथे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. मंगळूर येथे निर्माण झालेला जातीय तणाव त्यांनी व्यवस्थित हाताळला आहे.
पहिल्यांदाच भारतीय महिला मिग विमाने उडवणार :
- भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमाने उडवणार आहेत.
- अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशी या महिला वैमानिकांची नावे आहेत. या तिघींनी आपले प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
- अवनी आणि भावना मिग-21 बिसन्स हे विमान उडवणार आहेत. मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
- त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. तसेच अवनी, भावना आणि मोहना या तिघींनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.
- इतिहासात पहिल्यांदाच महिला मिग-21 बिसन्स हे विमान उडवणार आहेत पण, त्या महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे.
एम्प्रेस उद्यानात फुलणार पुष्प प्रदर्शन :
- हडपसर एम्प्रेस उद्यानात पुष्प प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरु आहे. या प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंडयांची आकर्षक मांडणी, मनमोहक फुलांची मांडणी, पाने-फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना लक्ष वेधून घेत आहेत.
- तसेच 25 ते 28 जानेवारी या कालावधीत पुष्प प्रदर्शन आयोजित केले आहे. यंदा प्रदर्शनाचे 21 वे वर्षे आहे.
- पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षी देखील मोना पिंगळे आणि त्यांच्या सहकारी यांचा जपानी पध्दतीच्या पुष्परचना तसेच सुनिता शिर्के व मंगला राव यांचे बोन्साय वृक्ष पुष्प रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.
- प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाच्या निमित्ताने एम्प्रेस गार्डन, पुणे महानगरपालिका व काही उद्यान रचनाकार यांनी तयार केलेल्या उद्यानांच्या प्रतिकृती देखील प्रदर्शन कालावधीत पहावयास मिळतील.
भारतीय महिला संघाची नवी कर्णधार हरमनप्रीत कौर :
- भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे.
- आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 मालिकेत हरमनप्रीत भारतीय महिला संघाचेचं नेतृत्व करताना दिसेल.
- 13 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरसोबत महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचे उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेले आहे.
- एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय महिलांचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
- इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पोहचवणाऱ्या मिताली राजकडे भारताच्या वन-डे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे.
दिनविशेष :
- दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे 24 जानेवारी 1857 रोजी स्थापना झाली.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 24 जानेवारी 1901 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
- भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा 24 जानेवारी 1966 रोजी शपथविधी झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा