चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2016)
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवासीय सामन्यात भारताचा विजय :
- भारतासमोर न्यूझीलंडने 49.4 षटकांत 285 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती; परंतु विराटने मोहालीतील मैदानावर विक्रमी खेळी करताना कठीण लक्ष्य सोपे केले.
- वन-डे कारकिर्दीतील 26 वे शतक ठोकणाऱ्या विराटने धोनीसोबत 27.1 षटकांत 151 धावांची जबरदस्त भागीदारी केली.
- तसेच या भागीदारीच्या बळावर भारताने 48.2 षटकांत 3 बाद 289 धावा करीत सामना जिंकला.
- टीम इंडियाचे रन मशीन विराटने 134 चेंडूंत 16 चौकार व एका षटकारासह नाबाद 154 धावांची विजयी खेळी केली. या खेळीमुळे विराट सामनावीर ठरला.
- विराटचे हे 26 वे शतक होते अणि त्याने श्रीलंकेचा कुमार संगकाराला मागे टाकले आणि तो वनडे-त सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला.
- भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिजितची ऐतिहासिक कामगिरी :
- ग्रँडमास्टर आणि राष्ट्रकुल चॅम्पियन अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
- फिडे ओपन स्पर्धेत सलग दोन विजेतेपद पटकावणारा तो पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
- गत चॅम्पियन व अव्वल मानांकित अभिजितने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना 9 पैकी 7.5 गुणांची कमाई केली आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रँडमास्टर संदीपन चंदाच्या तुलनेत त्याने आघाडी घेतली होती.
- भारतीय ग्रॅण्डमास्टर एम.आर. ललित बाबूने तिसरे तर ग्रॅण्डमास्टर एम. श्यामसुंदरने चौथे स्थान पटकावले.
- अभिजितने या स्पर्धेत सलग चार विजय मिळवल्यानंतर ललित बाबूसोबतची लढत बरोबरीत सोडवली.
- सहाव्या फेरीत अभिजितने मायकल डी जोंगविरुद्ध विजय नोंदवला तर सातव्या फेरीत मायदेशातील सहकारी एस. नितीनविरुद्ध सहज विजय मिळवला.
विश्वकरंडक कबड्डीत स्पर्धेत भारताला विजेतेपद :
- मध्यंतरानंतरची सहा गुणांची पिछाडी… वर्चस्वाला शह मिळण्यासाठी जमा झालेले काळे ढग अशा कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान 38-29 असे मोडून काढले आणि सलग तिसऱ्यांदा विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले.
- तसेच या एका सामन्यात चढायांमध्ये तब्बल 12 गुण मिळवणारा अजय ठाकूर हाच भारताच्या विजयाचा खरा हीरो ठरला.
- जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत इराणने भारताला नेहमीच कडवी लढत दिली आहे. त्यातच तीन खेळाडू प्रो कबड्डीत खेळत असल्यामुळे भारतासमोर आव्हान सोपे नव्हते.
- मध्यंतरानंतर 13-19 अशी पिछाडी दी एरिना ट्रान्सस्टेडिया येथे खच्चून गर्दी करणाऱ्या भारतीय पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होती; पण याच कठीण परिस्थितीत बाजीगर होणारी कामगिरी करणाऱ्या अजयने कमालीच्या चढाया केल्या. त्याच्या झंझावातासमोर इराणचा भक्कम बचाव खचला.
- कर्णधार अनुप कुमारने पकड मिळताच संयमी खेळ करत संघाला विजयी पथावर ठेवले.
- अजय ठाकूरने सलग तीन सामन्यांत दहापेक्षा अधिक गुण मिळवले.
महाराष्ट्राच्या रिओ ऑलिम्पिकपटूंना ‘एमओए’ कडून सत्कार :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या महाराष्ट्रातील 7 खेळाडूंना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) प्रत्येकी 1 लाख रूपये देऊन गौरविण्यात आले.
- मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात एमओएची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
- तसेच यानंतर एमओएचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ललिता बाबर (अॅथलेटिक्स), देवेंद्र वाल्मिकी (हॉकी), दत्तू भोकनळ (रोर्इंग), प्रार्थना ठोंबरे (टेनिस), अयोनिका पॉल आणि हिना सिद्धू (नेमबाजी) यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विमानवाहु नौका आयएनएस विराटला निरोप :
- जगामधील सर्वांत जुनी विमानवाहु नौका असलेल्या आयएनएस विराटला 23 ऑक्टोबर रोजी कोची येथून अखेरचा निरोप देण्यात आला.
- भारतीय नौदलासाठी अनेक वर्षे अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजाविलेल्या आयएनएस विराटने आता अखेरचा प्रवास सुरु केला आहे. ही विमानवाहु नौका आता कोची येथून मुंबई येथे दाखल होणार आहे.
- मुंबई येथे अंतिमत: ही जगप्रसिद्ध युद्धनौका निवृत्त (डिकमिशन्ड) केली जाणार आहे.
- अखेरच्या प्रवासासाठी निघालेल्या आयएनएस विराटला कोची येथून समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
-
- तसेच या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे (सदर्न कमांड) मुख्याधिकारी (चीफ ऑफ स्टाफ) रिअर ऍडमिरल रवींद्र जयंती नाडकर्णी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- आयएनएस विराटने समुद्रामध्ये तब्बल 2,250 दिवस व्यतीत केले असून 10,94,215 किमी प्रवास केला आहे.
- प्रवासाच्या या आकड्यामध्ये पृथ्वीस 27 वेळा प्रदक्षिणा होणे शक्य आहे! पूर्णत: कार्यरत असताना विराटवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1500 इतकी होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा