चालू घडामोडी (25 डिसेंबर 2017)
अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी :
- पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर 10-7 अशी मात केली.
- सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.
- सामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात 3-3 अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली.
- किरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला.
श्रीलंकेविरूद्ध भारताची विजयी हॅटट्रिक :
- सलग तिसरा सामना जिंकून भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत त्यांना व्हाइटवॉश देण्याचे लक्ष्य साधले; पण अखेरच्या सामन्यातील विजयासाठी प्राण कंठाशी आले होते. या यशासह भारताने 2017 ची यशस्वी सांगताही केली.
- वानखेडे स्टेडियमवरील हा सामना चौकार-षटकारांनी गाजेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र धावांसाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागला.
- प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 135 धावांत रोखल्यावर भारताला हे आव्हान पार करण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत मैदानात राहावे लागले. धोनी आणि कार्तिक यांनी अनुभव पणास लावत विजय मिळवून दिला.
हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जयराम ठाकूर :
- सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत 68 पैकी 44 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला 21 जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.
- केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जयराम ठाकूर आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. 24 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये जयराम ठाकूर यांची निवड झाली.
मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन :
- बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले.
- तसेच पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन झाले.
- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, संमेलन अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बीसीसीआयचे नवीन महाव्यवस्थापक साबा करीम :
- भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि माजी निवड समिती सदस्य साबा करीम यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- माजी महाव्यवस्थापक एम.व्ही. श्रीधर यांच्या निधनानंतर करीम यांच्याकडे महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2018 पासून साबा करीम आपला कार्यभार सांभाळतील.
- साबा करीम यांनी आपल्या कारकिर्दीत 34 वन-डे आणि एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केले आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर साबा करीम यांच्याकडे विराट कोहली-रवी शास्त्री, क्रिकेट प्रशासकीय समितीमधील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. करीम बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्या अंतर्गत काम पाहतील.
अमित खरे यांनी उघड केला होता चारा घोटाळा :
- लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवारी घडवणारा चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात उपायुक्त म्हणून काम करत असताना अमित खरे यांनी हा घोटाळा उघड केला होता. मूळचे बिहारचे असेलेले अमित खरे हे 1985 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
- नव्वदच्या दशकात बिहारची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राज्याच्या अर्थ खात्याने सर्व जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना विविध सरकारी खात्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान, पशुसंवर्धन खात्यातील देयकांमध्ये गोंधळ असल्याचे समोर आल्याने त्या खात्यातील आर्थिक व्यवहारांकडे विशेष लक्ष दिले जात होते.
दिनविशेष :
- 25 डिसेंबर हा दिवस ‘नाताळ’ म्हणून साजरा करतात.
- 25 डिसेंबर 1924 मध्ये भारताचे 10वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म झाला.
- सन 1976 मध्ये 25 डिसेंबर रोजी आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली.
- वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी 25 डिसेंबर 1990 मध्ये घेण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/8rfv4vBOm_8?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}