चालू घडामोडी (25 जानेवारी 2016)
फ्रान्स करणार नागपूर स्मार्ट :
- नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेला फ्रान्स विविध प्रकारे तांत्रिक तज्ज्ञांचे सहकार्य देणार असून, यासाठी फ्रेंच सरकार व महाराष्ट्र सरकारमध्ये (दि. 24) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांचे येथे आगमन झाले.
- चंदिगड, नागपूर व पुद्दुचेरी या तीन शहरांच्या स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सकडून तांत्रिक सहकार्य घेण्याबाबत करार झाले.
- नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते तेव्हाच ओलांद यांनी मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फ्रान्स सरकारकडून 2.25 अब्ज डॉलरचे वित्तसाह्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
- फ्रान्सची ‘एजन्से फ्रॅकाईस डी डेव्हलपमेंट’ ही संस्था या तीन शहरांच्या स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा, मलनि:सारण, नागरी परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल.
चीनमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ :
- चीनमध्येही गेल्या काही दशकांतील विक्रमी हिमवर्षाव होत असल्याने बहुतांश भाग गारठला आहे.
- अमेरिकेप्रमाणे येथेही विमान उड्डाणे रद्द झाली असून, जनजीवन ठप्प झाले आहे.
- देशातील काही भागांत तापमान उणे तीस अंशाच्या खाली जाण्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने त्या भागांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- चीनच्या प्रमाणानुसार थंडीसाठी देण्यात येणारा हा इशारा दुसऱ्या क्रमांकाचा धोक्याचा इशारा आहे.
सोमनाथ बनला ब्रँड अॅम्बेसिडर :
- चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी.ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी (दि.24) केली.
- आजवर स्वत:च्या कमाईवर शिक्षण पूर्ण करणारा सोमनाथ आता इतर विद्यार्थ्यांनाही धडे देणार आहे.
- डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस – रुबिकाच्या पदवी प्रदान समारंभात तावडे यांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करण्यात आला.
भारताकडून एल निनोचीही माहिती :
- मान्सून, तापमान यांच्या अंदाजाबरोबरच आता भारताने दक्षिण आशियायी देशांना एल निनोच्या स्थितीबाबतही माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
- भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी एल निनोची स्थिती सांगितली जात असून, ती माहिती आता श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ व म्यानमार या देशांनाही उपलब्ध झाली आहे.
- पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव राजीवन यांनी सांगितले की, दक्षिण आशियायी देशांना एल निनोबाबत माहिती देण्यास आम्ही सुरुवात केली आहे.
- दर महिन्याला एल निनोच्या स्थितीबाबत सुधारित माहिती दिली जाईल, असे हवामान वैज्ञानिक एस.पै यांनी स्पष्ट केले.
- जागतिक हवामान संघटनेने भारताला प्रादेशिक हवामान केंद्र म्हणून जाहीर केले आहे.
भारत आशियाई टी-20 ‘चॅम्पियन’ :
- प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 44 धावांनी पराभव करून यजमान भारताने अंधांच्या पहिल्या टी-20 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानने साखळी फेरीत भारताला पराभूत केले होते.
मलेशिया मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद :
- भारताची हरहुन्नरी बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स ग्रांपी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
- या वर्षातील पहिले विजेतेपद मिळविताना सिंधूने अंतिम फेरीत किर्से ग्लिमोरचा 21-15, 21-9 असा सहज पराभव केला.
- सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी आहे. या विजयामुळे सिंधूचे ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद ठरले आहे.
- तसेच या अगोदर तिने मलेशियातील ही स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत 2013 ते 15 अशी हॅटट्रिक केली आहे.
सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी :
- जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी लय कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
- महिला दुहेरीतील सामन्यात सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना लुडमिया किचनोक आणि नादिया किचनोक या युक्रेनच्या खेळाडूंवर 6-2, 6-3 अशी मात करीत अंतिम 16 खेळाडूंमध्ये आपली जागा पक्की केली.
- मिश्र दुहेरीत अव्वल मानांकनप्राप्त सानिया मिर्झा व क्रोएशियाचा जोडीदार इवान डोडिग या जोडीने जबरदस्त खेळ करताना अजला टोमालानोविच व निक किर्गीयोस या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 7-5, 6-1 अशा फरकाने पराभूत करून विजय मिळविला.
देशातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज :
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे निमित्त साधून (दि.23) रांचीमध्ये इतिहास घडला.
- येथील पहाडी मंदिर परिसरात देशातील सर्वांत उंचावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळी बटन दाबून ध्वजवंदन केले, तिरंगा फडकताच पुष्पवृष्टी करण्यात आली.
- पहाडी मंदिरपासून एक किलोमीटर अंतरावर तिरंगा झेंडा फडकल्यानंतर बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राज्यपाल द्रोपदी मुर्मू अणि मुख्यमंत्री रघुवरदास यांनी मार्गदर्शन केले.
दिनविशेष :
- 1982 : विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान करण्यात आली.
- 1988 : पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- 1991 : मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
- 2001 : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा