चालू घडामोडी (25 मार्च 2017)
आयसीसी चेअरमनपदी पुन्हा शशांक मनोहर :
- शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढेही ते आयसीसीच्या चेअरमनपदी कायम राहतील.
- शंशाक मनोहर यांच्या या निर्णयानंतर आयसीसीच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- 15 मार्च रोजी शशांक मनोहर यांनी तडकाफडकी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. एप्रिलमधल्या वार्षिक परिषदेत आयसीसीच्या आर्थिक मॉडेलची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
- शशांक मनोहर यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे विनंती करण्यात आली होती.
- परिषदेच्या विनंतीला मान देऊन अखेर मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
आता पोलीस वापरणार ‘एम्बिस’ प्रणाली :
- गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करता यावे यासाठी पोलीस आधुनिकीकरणातून राज्य पोलीस दलात आता नव्याने ‘एम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- तसेच या नवीन प्रणालीमुळे आरोपीच्या बोटांचे ठसे व छायाचित्रांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करून त्याचा वापर गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी निश्चित होईल.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
- ‘एम्बिस’ प्रणाली याच उपाययोजनांचा एक भाग असून जगातील ही सर्वोत्तम प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
- गुन्हा सिद्ध करण्याकरिता पुरावे महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्र पोलिसांकडे याकरिता फिंगर प्रिंट ब्युरो स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत आहे.
वैभव रास्कर ठरला कामगार केसरीचा विजेता :
- मुंबई येथे चुरशीच्या रंगलेल्या लढतीत सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने साताऱ्याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन प्रतिष्ठेच्या कामगार कुस्ती स्पर्धा विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, कुमार केसरीसाठी झालेल्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या विक्रम मोरेने बाजी मारली.
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ना.म. जोशी मार्गावरील कामगार मैदानात रंगतदार कुस्ती पार पडल्या.
- मुंबई शहर तालिम संघाच्या सहकार्याने खेळवण्यात आलेल्या कामगार केसरीच्या अंतिम सामन्यात कुंडल येथील पैलवान वैभवने आक्रमक सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निर्णायक गुणांची कमाई करताना तांत्रिक गुणाच्या आधारे वैभवने बाजी मारत मानाची गदा उंचावली.
- कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या कुमार केसरी स्पर्धेतही तांत्रिक गुणांच्या आधारे कोल्हापूर, कुंभी कासरीच्या विक्रम मोरेने विजय मिळवला.
- सरदार बरगेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कामगार केसरी आणि कुमार केसरी विजेत्या रोख रक्कम, गदा, मानाचा पट्टा व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील 154 गावे ‘तंटामुक्त’ घोषित :
- महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015–16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली.
- गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे.
- तसेच या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत 18 हजार 993 गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तर, 1 हजार 298 गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.
- नवव्या वर्षातील मोहिमेच्या अंमलबजावणी कार्यक्रमानुसार 15 ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला होता.
दिनविशेष :
- 25 मार्च 1898 रोजी शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
- अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा