चालू घडामोडी (25 मे 2017)
आश्विन ठरला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू :
- भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिलेल्या स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन याला सीएट क्रिकेट रेटिंगच्या (सीसीआर) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले.
- भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि आरपीजीचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते आश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- यंदाच्या मोसमात भारताने घरच्या मैदानावर 13 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये आश्विनने प्रतिस्पर्धी संघांना आपल्या तालावर नाचवले. या दीर्घ मोसमामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 सामन्यांपैकी 10 सामन्यांत बाजी मारली.
- विशेष म्हणजे आश्विनने गेल्या 12 महिन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करताना 99 बळी घेण्याचा पराक्रम केला.
आता दिव्यांगांना मिळणार ‘युनिक कार्ड’ :
- ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करताना पारदर्शकता यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, बोगस अपंग लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी आता दिव्यांगांना लवकरच रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- जिल्ह्यासह राज्यभरात दिव्यांगांच्या नावावर लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यात शासकीय कर्मचारी बदलीसाठी धडपड करीत असतात.
- राज्यात अनेक ठिकाणीही बोगस अपंगांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांच्या विविध सवलती लाटणाऱ्यांवर शासनाने आता टाच आणली आहे.
- अपंगांसाठीच्या सवलती लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा, यासाठी युनिक कार्ड तयार करून देत कार्डधारक अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
- तसेच यासाठी लवकरच दिव्यांगांचा शासनातर्फे नव्याने सर्व्हे करण्यात येणार असून, खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना या ‘युनिक कार्ड’च्या माध्यमातून खड्यासारखे बाहेर काढले जाणार आहे. यासाठी देशभरातील दिव्यांगांच्या संख्येची माहिती एकत्रित केली जात आहे.
भारतीय महिला बॉक्सर्सनांसाठी पहिला विदेशी कोच :
- भारतीय महिला बॉक्सर्सना पहिल्यांदा विदेशी कोच मिळाला आहे. बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
- युरोपियन बॉक्सिंग परिसंघाच्या कोचेस आयोगाच्या सदस्य 41 वर्षांच्या स्टेफनी जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळाडूंसोबत जुळतील.
- इटलीची रफेले बर्गामास्को डिसेंबर 2020 पर्यंत युवा महिला संघाची कोच असेल. अलीकडेच नियुक्त झालेले पुरुष संघाचे कोच सँटियागो निवा यांचा कार्यकाळ डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला.
- भारतीय बॉक्सिंग संघाचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘तिन्ही कोचेसच्या नियुक्तीला काल साईसोबत झालेल्या बैठकीत मूर्त रूप देण्यात आले. भारताच्या कोचिंग स्तरावर स्थिरता आणण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या लाभदायी ठरतील.’
राज्यसरकारतर्फे वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल ‘ऍप’ :
- अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ‘ऍप’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
- ‘गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि.’ या कंपनीने बनविलेले Ambulance.run हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ‘ऍप’ आहे.
- तसेच या ‘ऍप’व्दारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने रुग्णसेवेचे आरक्षण करू शकतात.
- आपल्या जवळील रुग्णवाहिका शोधण्यासाठी, आरक्षण करण्यासाठी आणि सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी हे ‘ऍप’ साह्य करेल.
- ‘गोल्डन हवर सिस्टीम्स’ ही औद्योगिक नीती तथा संवर्धन विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया प्रोग्रामद्वारे आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शिफारस केलेली कंपनी आहे.
दिनविशेष :
- जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी 25 मे 1955 रोजी प्रथमच सर केले.
- 25 मे 1963 मध्ये इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना झाली.
- सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना 25 मे 1981 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा