चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2015)
लंडनवर अणुबॉंब टाकण्याचा तत्कालीन सोव्हिएत महासंघाचा विचार :
- शीतयुद्धाच्या काळात लंडनवर अणुबॉंब टाकण्याचा तत्कालीन सोव्हिएत महासंघाचा विचार होता, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका पत्रावरून दिसून आले आहे.
- एका ब्रिटिश अणुतंत्रज्ञान तज्ज्ञाने 1954 मध्ये सरकारला अत्यंत गोपनीय पत्र आपल्या सरकारला लिहिले होते.
- विल्यम पेनी यांनी लिहिलेले हे पत्र द नॅशनल अर्काईव्हज्ने प्रसिद्ध केले आहे.
- पेनी यांचे 1991 ला निधन झाले आहे.
- लंडनमधील क्रॉयडन, अक्सब्रिज आणि रोमफोर्ड या भागांमध्ये बॉंब टाकले जाण्याची शक्यता आहे. अधिक संख्येने बॉंब टाकण्याऐवजी ते तीन, चार अथवा पाच शक्तिशाली बॉंबचा वापर करतील.
- त्यांची तीव्रता तीस ते चाळीस बॉंबइतकीच असेल.
- ते अचूकपणे पडण्याचीही आवश्यकता नाही असे पेनी यांनी ब्रिटनच्या अणुऊर्जा मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एडविन प्लॉडेन यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले होते.
- या संभाव्य बॉंबहल्ल्यानंतर बॉंब पडल्याच्या तीन मैलांच्या परिघातील परिसर संपूर्णपणे नष्ट होईल आणि हा बॉंब अमेरिकेने जपानमधील नागासाकीवर टाकलेल्या बॉंबहून अधिक शक्तिशाली असेल, असे पेनी यांनी म्हटले होते.
अदनान सामीला भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय :
- केंद्रातील ‘एनडीए’ सरकार अदनान सामी या पाकिस्तानी गायकाला भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
- यासंदर्भात ‘द हिंदू‘ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
- ऑगस्टमध्येच अदनाम सामीला अनिश्चित कालावधीपर्यंत भारतामध्ये राहण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती.
- सामीने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता.
- सामी 2001 मध्ये एका वर्षाच्या व्हिसासह भारतामध्ये आला होता.
महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून काम करू देण्याचा निर्णय :
- दुर्दम्य आत्मविश्वास आणि धाडसाच्या बळावर एक-एक शिखर यशस्वीपणे पादाक्रांत करणाऱ्या महिलांसाठी आता आकाश आणखी ठेंगणे झाले आहे.
- केंद्र सरकारने भारतीय वायुसेनेत महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून काम करू देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे प्रथमच महिला देशाच्या सशस्त्र दलात लढाऊ विमानांच्या वैमानिकाच्या भूमिकेत दृष्टीस पडतील.
- एअर फोर्स अकादमीतून यंदा उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीतून महिला फायटर पायलटची निवड करण्यात येणार आहे.
- प्रारंभिक प्रशिक्षणानं तर जून 2016 मध्ये त्यांना वायुसेनेच्या लढाऊ दलात कमिशन देण्यात येईल.
- तसेच एक वर्षाच्या सखोल प्रशिक्षणानंतर जून 2017 पर्यंत हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे सारथ्य महिलांच्या हाती येईल.
- 1992 पासून भारतीय वायुसेनेत महिलांचा समावेश झाला.
चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना फेस्टिवलला सुरुवात होणार :
- भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा उलगडणाऱ्या ‘सिंडे्रला’ या चित्रपटाची यंदाच्या ‘साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल’ मध्ये निवड करण्यात आली आहे.
- 14 नोव्हेंबर 2015 रोजी चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथे या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे.
- येत्या 4 डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ :
- वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला.
- राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
- ‘बिग बी’ अमिताभ यांच्या जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून सकाळी सातला या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली.
- ‘अलायन्स रायडिंग नाईट्स’ या संस्थेतर्फे मुंबई-ठाण्याहून 20 दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले.