चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2017)
कॅन्सर रोखणार सिन्थेटिक जीन सर्किट :
- रोगप्रतिकारक पेशींना चालना देऊन त्यांना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करणारी व्यवस्था मानवी शरीरात बसविणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. तसे संशोधन ‘एमआयटी’ या जगप्रसिद्ध संस्थेतील संशोधकांनी केले आहे.
- कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच रोगप्रतिकार पेशींना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्याची सूचना देता येऊ शकेल, असे सिन्थेटिक जीन सर्किट संशोधकांनी विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल ‘सेल’ या विज्ञानविषयक नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
- रोगप्रतिकारक पेशींवर उपचाराची पद्धती कॅन्सरला रोखण्यात महत्वाची मानली जाते. या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या आहेत, असे ‘एमआयटी’मधील बायोलॉजिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहप्राध्यापक टिमोथी लू यांनी सांगितले.
- ‘आतापर्यंतच्या चाचण्यांवरून काही एक माहिती गोळा झाली आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य पद्धतीने सजग केल्यास त्या कॅन्सरपेशींना ‘ओळखू’ शकतात. कॅन्सरच्या पेशी स्वतःच्या बचावासाठी विशेष व्यवस्था राबवितात. आपल्यावर इतर पेशींनी हल्ला करू नये, अशी सूचना देणारे जणू फलकच त्या घेऊन वावरतात. ही एकप्रकारची सिग्नल व्यवस्था असते. ती नष्ट करणाऱया अँटीबॉडीज् विकसित झालेल्या आहेत. एकदा हा सिग्नल कॅन्सर पेशींवरून हटला, की रोगप्रतिकारक पेशींचा हल्ल्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्या कॅन्सर पेशींना संपवू शकतात,’ असे लू यांचे संशोधन सांगते.
चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा क्षी जिनपिंग :
- चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची निवड झाली आहे. त्यांच्या विचारसरणीचा व नावाचा समावेश कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत करण्यात आला असून त्यामुळे आता ते पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग व त्यांचे वारसदार डेंग शियाओपेंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
- क्षी यांची साम्यवादाची संकल्पना ही नवीन काळातील असून, त्याला चीनच्या मूल्यांची डूब दिलेली आहे व त्यांचा समावेश आता पक्षाच्या घटनेत करण्यात आला आहे. माओ यांच्यानंतर क्षी जिनपिंग हे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत.
- कम्युनिस्ट पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या अधिवेशनामध्ये जिनपिंग यांच्या पक्षप्रमुखपदी निवडीचा निर्णय घेण्यात आला.
- चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत दुरुस्ती मंजूर करताना त्यात क्षी जिनपिंग यांच्या नव्या साम्यवादी विचारसरणीचा समावेश करण्यात आला आहे, असे चीन कम्युनिस्ट पक्षाच्या 19व्या अधिवेशनात करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे.
- क्षी यांचे नाव त्यांच्या विचारसरणीसह समाविष्ट केल्याने त्यांना माओ व डेंग यांच्याइतकेच राजकीय महत्त्व आले आहे.
- माओ व डेंग या दोनच नेत्यांचे विचार व नावे पक्षाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आली होती. आता त्यात क्षी जिनपिंग यांची भर पडली आहे.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी कालवश :
- सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे 24 ऑक्टोबर रोजी निधन झाले, त्या 88 वर्षांच्या होत्या.
- गिरिजा देवी या बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या ‘ठुमरीची राणी’ म्हणून प्रसिद्ध होत्या.
- गिरिजा देवी यांना 1972 मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर 1989 मध्ये पद्मभूषणने तर 2016 मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.
- गिरिजा देवी यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एका युगाचा अंत झाला असला तरी त्यांची गायिकी कायमच जिवंत राहिल. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील तारा निखळल्याच्या प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांनी दिल्या आहेत.
- पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांनी अनेकदा आपल्या गायकीने पुणेकरांसह मराठी रसिकांना शास्त्रीय गायकीची भेट दिली होती.
काश्मीरचर्चेचे सर्वाधिकार संवादक दिनेश्वर शर्मा यांना :
- जम्मू-काश्मीरमधील पेच सोडवण्यासाठी नेमण्यात आलेले संवादक दिनेश्वर शर्मा यांना नेमके कुणाशी बोलायचे याचे अधिकार देण्यात आले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. शर्मा हे हुर्रियतशी चर्चा करणार का, असे विचारले असता सिंह यांनी सांगितले, की कुणाशी चर्चा करायची व कुणाशी नाही ते दिनेश्वर शर्मा ठरवतील.
- काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी अशी मागणी केली होती, की हुरियतशी चर्चा करावी. शर्मा हे गुप्तचर खात्याचे माजी संचालक असून, त्यांची केंद्र सरकारने काश्मीरप्रश्नी संबंधितांशी चर्चा करण्यासाठी संवादक म्हणून कालच नेमणूक केली होती.
- दिनेश्वर शर्मा हे 1979च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असून ते डिसेंबर 2012 ते डिसेंबर 2016 दरम्यान गुप्तचर संचालक होते.
- काश्मीरप्रश्नी सरकारने शाश्वत संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले असून, त्यासाठी शर्मा यांची नियुक्ती केली असल्याचे ते म्हणाले. शर्मा यांना कॅबिनेट दर्जा दिला असून, कुणाशी चर्चा करायची व कुणाशी नाही याचे अधिकारही त्यांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारव्दारे सरकारी बँकांना अर्थसहाय्य :
- वाढत्या बुडीत कर्जाचा तिमाहीतील नफ्यावर विपरीत परिणामांची नोंद करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता केंद्र सरकारने घसघशीत अर्थसाहाय्य देऊ केले आहे. याअंतर्गत बँकांना येत्या दोन वर्षांकरिता 2.11 लाख कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
- सरकारने 24 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जपुरवठा क्षमता आता भक्कम होईल, असा दावा करण्यात आला.
- आधी नोटाबंदी आणि नंतर वस्तू व सेवा करप्रणालीमुळे अधिक गर्तेत गेलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने तयार केलेल्या आर्थिक आराखडय़ाचे सादरीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
- गुजरात तसेच हिमाचल प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जाहीर झालेल्या या आर्थिक साहाय्यतेचे संकेत सरकारकडून यापूर्वी दिले जात होते.
- तसेच 2015 मध्ये जाहीर झालेल्या ‘इंद्रधनुष’ योजनेंतर्गत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता चार वर्षांकरिता 70,000 कोटी रुपये दिले आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा