चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2016)
वर्ल्ड बॅंकच्या अध्यक्षपदी पुन्हा जिम योंग किम :
- जागतिक बॅंकेचे (वर्ल्ड बॅंक) अध्यक्ष जिम योंग किम यांचे नाव पुन्हा अध्यक्षपदासाठी अमेरिकेने जाहीर केले आहे.
- दारिद्य्र आणि हवामान बदलच्या आव्हानांना नावीन्यपूर्ण सामोरे जाण्याची क्षमता किम यांच्यात आहे, असे अमेरिकेचे मत आहे.
- अमेरिकेचे कोषागार विभागाचे मंत्री जॅकब जे लू यांनी किम यांच्या नावाची घोषणा केली.
- लू म्हणाले, ‘किम’ त्यांच्या कारकीर्दीत जागतिक विकासासमोरील आव्हानांना नावीन्यपूर्ण पद्धतीने सामोरे गेले आहेत.
- दारिद्य्र, असमानता आणि हवामान बदलाबाबतही त्यांनी पावले उचलली आहेत.
- ‘इबोला’ आणि निर्वासित यासारखे मोठे प्रश्न त्यांनी हाताळले आहेत.
- तसेच, जागतिक बॅंकेत सुधारणा करण्याचे काम ते करीत असून, वित्तीय स्त्रोतांचा वापर ते वाढवीत आहेत.
- जागतिक बॅंकेत अमेरिका सर्वांत मोठा भागीदार देश आहे. त्यामुळे अमेरिकेकडून किम यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांची पुन्हा निवड निश्चित मानली जात आहे.
- जुलै 2012 मध्ये किम यांनी जागतिक बॅंकेचे बारावे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला.
मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा यांची जयंती :
- थोर मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा यांची आज (26 ऑगस्ट) जयंती आहे.
- भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी असलेल्या मदर तेरेसा यांचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू हे आहे.
- 26 ऑगस्ट 1910 साली रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात त्यांचा जन्म स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला.
- वयाच्या अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात त्यांनी प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला.
- तसेच त्यानंतर त्यांनी जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त त्या भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या.
- 1929 स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने त्यांचे नामांतर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे त्या ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
नसिरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्राचे मराठीत रूपांतर :
- खलनायक, नायक व चरित्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लिहिलेले आत्मचरित्र ‘ऍण्ड देन वन डे’ मराठीत अनुवादित करण्यात आले आहे.
- ‘आणि मग एक दिवस’ असे या पुस्तकाचे नाव असून सई परांजपे यांनी हा अनुवाद केला आहे.
- नुकतीच मुंबईत याविषयी एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या वेळी अभिनेते नसिरुद्दीन शाह, सई परांजपे व पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.
- तसेच या मराठी अनुवादाचे प्रकाशन 2 सप्टेंबरला प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी अभिनेते सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
ई-मेल आयडी आता मराठीत सुरू :
- स्टार्ट-अप कंपनी दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीने देवनागरी लिपित ई-मेल देण्याची सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा मोफत नाही. तथापि, ती लवकरच मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
- तसेच ही सेवा मोफत सुरू झाल्यास भारतात जी-मेल, आऊटलूक आणि याहू या कंपन्यांच्या ई-मेल आयडी सेवांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
- हिंदी, मराठी, नेपाळी आदी अनेक प्रमुख भारतीय भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. या भाषा वापरणारे लोक देवनागरी ई-मेल आयडीला पसंती देऊ शकतील.
- दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अजय दाता यांनी सांगितले की, शे-दोनशे आयडी आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत.
- ‘डॉट भारत’ या डोमेनवर ते आहेत. आमच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही देवनागरीतील ई-मेल आयडी विकत घेऊ शकतो. या वेब पत्त्यावरून पाठवलेले मेल जी-मेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या सेवा यंत्रणांमध्ये स्वीकारले जात आहेत.
- नेटवर हिंदी देवनागरीची सोय यापूर्वीच झाली आहे. आता देवनागरी लिपीत ई-मेल अॅड्रेस तयार करण्याची सोय आम्ही दिली आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने घेतलेल्या एका बैठकीत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी देवनागरी ई-मेल आयडी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.
महाराष्ट्रातील एक हजार गावे होणार आदर्श :
- राज्यातील एक हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला असून कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा कायापालट पूर्णत्वाला नेला जाणार आहे.
- राज्यातील 100 गावांचा पथदर्शी कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर सुरू करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला.
- राज्य सरकार खासगी उद्योजकांच्या मदतीने ‘कॉर्पस फंड’ तयार करून त्यातून गावांचा सर्वंकष विकास करण्यावर भर देणार आहे.
- तसेच या गावांमध्ये पाणी व्यवस्थापन, शिक्षण, कौशल्यविकास अभ्यासक्रम, महिला व बालकल्याण विकास अशा सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यात येणार आहे.
- हजार गावे निवडताना 25 टक्के गावे आदिवासी भागातील असावीत, तसेच किमान 50 टक्के गावे मानवी निर्देशांक अहवालात पिछाडीवर असणारी निवडावीत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- जल, जंगल आणि जमीन यांचा सुयोग्य वापर करून गावात शाश्वत विकासाची ठिकाणे निर्माण व्हावीत यावर भर दिला जाणार आहे.
- कंपन्यांच्या ‘सीएसआर फंड’मधून होणारे काम तसेच सरकारी उपक्रम एकत्र आणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास करता येईल.
दिनविशेष :
- 1910 : समाजसेविका; ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित मदर तेरेसा यांचा जन्मदिन.
- 1922 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गणेश प्रभाकर प्रधान यांचा जन्मदिन.
- 1948 : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, ‘केसरी’चे संपादक स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा