Current Affairs of 26 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 जानेवारी 2018)
देशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर :
- देशात विविध क्षेत्रात विशिष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पद्म’ या नागरी पुरस्कारांनी सन्मान केला जातो.
- यंदा या पुरस्कारातील पद्मश्री हा किताब राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे राणी बंग आणि अभय बंग, संपत रामटेके, अरविंद गुप्ता तसेच मुरलीकांत पेटकर यांना जाहीर झाला आहे.
- यंदा देशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये 3 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 73 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तसेच यामध्ये 14 महिलांचा तर 16 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. 3 जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण होईल.
Must Read (नक्की वाचा):
आधारकार्डने फिलिपीन्स प्रभावित :
- ‘आधार‘ वरुन भारतात वाद निर्माण झाला असतानाच फिलिपीन्सही ‘आधार‘ कार्डने प्रभावित झाला आहे.
- फिलिपीन्सने केंद्र सरकारकडे आधारबाबत विचारणा केल्याचे वृत्त असून ‘आधार‘ सारखी योजना फिलिपीन्समध्येही येते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
- ‘आसिआन‘ मधील नऊ देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताक दिनानिमित्त सध्या भारतात आहेत.
- फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डूटर्ट हे भारतात असून त्यांनी आधार बाबत माहिती जाणून घेतली आहे. ते आधार कार्ड योजनेने प्रभावित झाले असून फिलिपीन्स सरकारने याबाबत सरकारकडे विचारणा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हास्तरीय पहिली स्केटिंग रिंग नवी मुंबईमध्ये :
- नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली सेंट्रल पार्क येथे स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे.
- ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच स्केटिंग रिंग असल्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात त्यामुळे भर पडली आहे.
- तसेच या सुविधेमुळे शहरातील होतकरू खेळाडूंना स्केटिंगच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
- नवी मुंबई शहराने विविध क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंना सरावासाठी पालिकेने जागा आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध देण्यावर भर दिला आहे.
- आजच्या घडीला नवी मुंबई शहरात 10 हजारांपेक्षा अधिक स्केटिंग खेळणारे खेळाडू असून राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू वास्तव्य करतात.
कमांडो निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर :
- असामान्य शौर्याबद्दल हवाई दलाचे कमांडो कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले. शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च शौर्य सन्मान आहे.
- जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीच्या चौथ्या बटालियनचे मेजर विजयंत बिश्त यांना कीर्ती चक्र जाहीर झाले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दलांसाठी 390 पदके राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोषित केली.
- घोषित सन्मानांमध्ये एक अशोक चक्र, एक कीर्ती चक्र, 14 शौर्य चक्रे, 28 परमविशिष्ट सेवा पदके, चार उत्तम सेवा युद्ध पदके, अतिविशिष्ट सेवेसाठीचे दोन बार, 40 अतिविशिष्ट सेवा पदके, दहा युद्धसेवा पदके, सेना पदकांचे दोन बार (शौर्यासाठी) आणि 86 सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.
- जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील चांदेरगर येथे 18 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या कारवाईत कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना दहशतवाद्यांबरोबर सामना करताना वीरमरण आले.
सीबीआयमध्ये नव्या सहसंचालकांची नियुक्ती :
- केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती केली आहे.
- गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर पाच अशा एकूण सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली.
- प्रवीण सिन्हा हे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेत आहेत. सध्या ते केंद्रीय दक्षता आयोग विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
- सिन्हा आणि इतर पोलिस अधिकारी अजय भटनागर आणि पंकज कुमार श्रीवास्तव यांचा सीबीआयने सहसंचालक म्हणून समावेश केला आहे.
- तसेच यामध्ये भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी शरद अगरवाल, गजेंद्र कुमार गोस्वामी आणि व्ही. मुरुगेसन यांचाही तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला. यातील तीन अधिकारी हे सध्या पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
नाशिकमध्ये दुधाच्या एटीएमचे उद्घाटन :
- पैसे आणि पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे.
- सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले आहे. कॉलेज रोडवरील या एटीएमचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
- सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर 10 रुपयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल.
दिनविशेष :
- मुंबई आणि कलकत्ता दरम्यान 26 जानेवारी 1876 रोजी रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
- 26 जानेवारी 1949 मध्ये भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
- 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
- एच.जे. कनिया यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- 26 जानेवारी 1965 मध्ये भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
- महाराष्ट्रात ‘रोजगार हमी कायदा’ 26 जानेवारी 1978 रोजी आमलात आला.