Current Affairs of 26 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 जुलै 2016)
शरद पवार यांना ‘लोकमान्य टिळक पारितोषिक’ :
- माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’चे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ जाहीर झाले आहे.
- संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त रोहित टिळक यांनी या पारितोषिकाची (दि.25) पत्रकार परिषदेत घोषणा केली.
- लोकमान्य टिळक यांची 96वी पुण्यतिथी आणि त्यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्ष या निमित्ताने या पारितोषिकाचे वितरण टिळक स्मारक मंदिर येथे 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
- तसेच पारितोषिकाचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहेत.
- पारितोषिकाचे हे 34 वे वर्ष असून या आधी इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, पांडुरंगशास्त्री आठवले, डॉ. शंकरदयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, डॉ. वर्गिस कुरियन, एन. आर. नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
- कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत देशाची प्रगती घडविण्यात शरद पवार यांनी साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांची यंदाच्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
यंदा सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार :
- रत्नागिरीनंतर आता पुढील स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे.
- अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा मानही ठाण्याला मिळाला आहे.
- ठाण्यात प्रथमच हे संमेलन होत असून संमेलनाच्या तारखा मात्र लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ठाणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
- सांस्कृतिक चळवळीत ठाण्याचे मोठे योगदान आहे. या सांस्कृतिक नगरीत 2010 साली 84 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले, तर 2016 साली 96 वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन झाले.
- आता 2017 साली 29 वे अ.भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलनही पार पडणार आहे.
भारताचा गोळाफेकपटू उत्तेजक चाचणीत दोषी :
- रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघी काही दिवसांवर आली असताना भारताला आणखी एक धक्का बसला आहे.
- कुस्तीपटू नरसिंग यादवपाठोपाठ आता भारताचा गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळला आहे.
- नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने अगोदरच वाद निर्माण झाला असताना आता इंद्रजितही चाचणीत दोषी आढळल्याने भारतासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
- एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजितची 22 जूनला घेण्यात आलेल्या चाचणीत बंदी असलेले स्टेराईडचे सेवन केल्याचे समोर आले होते.
- तसेच या प्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) याबाबतची माहिती अॅथलेटिक्स फेडरेशनला पत्र पाठवून दिली आहे.
- इंद्रजितने एशियन चॅम्पियनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे.
- रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पहिला खेळाडू ठरला होता.
रिझर्व्ह बँके कडून बँक ऑफ बडोदाला दंड :
- 6,100 कोटी रुपयांच्या विदेशी चलन देण्याच्या घोटाळ्यात अडकलेल्या बँक ऑफ बडोदाला रिझर्व्ह बँकेने 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- बँक ऑफ बडोदाच्या वतीने शेअर बाजारास देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये काही अनियमितता आढळून आल्या होत्या.
- तसेच या प्रकरणी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी चौकशी केली. बँकेच्या अंतर्गत व्यवहारात अनेक त्रुटी आणि दुर्बलता दिसून आल्या आहेत.
- मनी लाँड्रिंग प्रतिबंधक तरतुदींच्या बाबतीत या त्रुटी घातक आहेत.
- देवघेवीच्या व्यवहारांची निगराणी, वित्तीय माहिती यंत्रणेला वेळेत माहिती देणे, विशिष्ट ग्राहक कोड प्रदान करणे इ. पातळीवर या त्रुटी आढळून आल्या.
- तसेच या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने म्हटले की, बँकेने व्यापक सुधारणात्मक कार्य योजना लागू केली आहे.
आता ध्वनिप्रदूषण केल्यास होणार तुरुंगवास व दंड :
- तुम्ही तुमच्या परिसरात कार्यक्रम जरूर घ्या, मात्र उत्साहाच्या भरात आवाज वाढवून ध्वनिप्रदूषण केलेत तर सावधान..! आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येईल.
- विविध सण, उत्सव व इतर कार्यक्रमांमधूनही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोंगाटामुळे नाहक त्रासलेले नागरिक सतत नाराजी व्यक्त करीत असतात.
- तसेच याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही अशी तक्रार असते… हे लक्षात घेऊन आता येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात ध्वनिप्रदूषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे.
- या पथकाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 15(1) प्रमाणे गुन्हा असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यास पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
- ध्वनिक्षपकासाठी कर्णे (डीजे) वापरू नयेत. त्याऐवजी 2 स्पीकर्स बॉक्स वापरावेत. दोनपेक्षा जास्त स्पीकर्स लावू नयेत असे पोलिसांनी सूचित केले आहे.
- शहरातील विविध भागांनुसार आवाजाच्या मर्यादा निश्चित केल्या असून, त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिनविशेष :
- क्युबा राष्ट्रीय क्रांती दिन.
- 1847 : लायबेरियाला स्वातंत्र्य.
- 1874 : शाहू महाराज, समाज सुधारक यांचा जन्मदिन.
- 1965 : मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 1999 : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती) विजय दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा