चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2015)
सात कंपन्यांची आपल्या बाजारमूल्यात 54 हजार 619 कोटी रुपयांची भर :
- मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर प्रभाव पाडणाऱ्या टॉप दहा कंपन्यांपैकी सात कंपन्यांनी आपल्या बाजारमूल्यात 54 हजार 619 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
- शेअर बाजाराने गेल्या शुक्रवारी दोन महिन्यातील उच्चांक गाठला.
- तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने देखील 8300 ची पातळी गाठली होती.
- रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांनी संपलेल्या आठवड्याच्या उलाढालींमुळे बाजारमूल्यात अतिरिक्त भर घातली आहे.
- टॉप 10 कंपन्यांपैकी ओएनजीसी, सन फार्मा आणि स्टेट बँक वगळता आयटीसी, एचडीएफसी बँक, कोल इंडिया आणि एचडीएफसी या कंपन्यांनी बाजारमूल्यात मोठी भर घातली आहे.
- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 183 अंशांनी वधारून 27,470.81 पातळीवर बंद झाला आहे.
- तर राष्ट्रीय शेअर बाजराचा निर्देशांक निफ्टी 8,295.45 पातळीवर व्यवहार करत 43.75 अंशांनी वधारून बंद झाला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी चीनचाही हातभार :
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वांत उंच पुतळा बनविण्यासाठी चीनचाही हातभार लागणार आहे.
- सरदार पटेलांच्या या पुतळ्याच्या उभारणीच्या कामासाठी चीनमधील एक कंपनी कामगार आणि साहित्य पाठविणार आहे.
- जिआंशी तॉंग किंग मेटल हॅंडिक्रॉफ्ट असे या कंपनीचे नाव आहे.
- कंपनीकडून यबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
इराकमध्ये मध्ये झालेल्या युद्धाबद्दल टोनी ब्लेअर यांनी माफी मागितली :
- इराकमध्ये 2003 मध्ये झालेल्या युद्धाबद्दल ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी आज माफी मागितली आहे.
- इराकचा तत्कालीन हुकूमशहा सद्दाम हुसेन याला पदच्युत केल्याची कोणतीही खंत नसली, तरी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये जाऊन युद्ध केल्याबद्दल ब्लेअर यांनी ही माफी मागितली आहे.
- इराक युद्धाच्या वेळी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान होते.
- सद्दामकडे रासायनिक अस्त्रांचा मोठा साठा असून त्यापासून जगाला धोका आहे, असा आरोप करत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने इराकमध्ये घुसखोरी करत सद्दामचे सरकार उलथवून लावले होते.
- ब्लेअर यांनी “सीएनएन”या वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली.
गीता 13 वर्षांनी मायदेशी परतणार :
- लहानपणी चुकून भारतीय हद्द ओलांडून पाकिस्तानात गेलेली मूकबधीर युवती गीता 13 वर्षांनी मायदेशी परतणार आहे.
- भारतीय वेळेनुसार 26 ऑक्टोबर सोमवारी सकाळी 8.30 वाजता गीता पाकिस्तान एअरलाईनच्या विमानाने दिल्लीला रवाना होत आहे.
- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले की, गीताला भारतात आणून तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं जाईल.
- गीता भारतात परतल्यानंतर तिची सीबीआय कार्यालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
सरकारी कार्यालयांमधील बी, सी व डी या वर्गांच्या भरतीसाठी मुलाखती बंद करण्याचा निर्णय :
- सरकारी कार्यालयांमधील बी, सी व डी या वर्गांच्या भरतीसाठी मुलाखती घेण्याचा फार्स नववर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2016 पासून बंद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.
- पंतप्रधान मोदी यांनी आज “मन की बात” या आकाशवाणी कार्यक्रमात बोलताना हे जाहीर केले.
- येत्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “एकता दौड”मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी देशवासीयांना केले.
- त्याचबरोबर 2019 मध्ये देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मायदेशी आगमनाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करेल आणि त्यातून देशवासीयांनी राष्ट्रपित्याला “कचरामुक्त भारता”ची भेट द्यावी, असेही ते म्हणाले.
- राष्ट्रध्वजावरील अशोकचक्राचे प्रतीक असलेली 5 व 10 ग्रॅमची सोन्याची नाणी सरकार लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या मेट्रो प्रकल्पास लवकरच केंद्राची मान्यता :
- पुण्याची मेट्रो भुयारी व्हावी की एलिव्हेटेड, याबाबतचे सर्व वाद संपुष्टात आले आहेत.
- या प्रकल्पास लवकरच केंद्राची मान्यता मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.
- नागपूर मेट्रोला सात ते साडेसात टक्के व्याजदराने अर्थसाह्य करणाऱ्या कंपनीने पुणे मेट्रोसाठीही त्याच व्याजदराने अर्थपुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे, असेही ते म्हणाले.
- येत्या काही काळात महापालिकेच्या आयुक्तांनी काही बाबींची पूर्तता केल्यानंतर कॅबिनेट नोट तयार होऊन मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल.
बँकेतील सोन्यावर व्याज रोखे, मुद्रा बाजारात :
- आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याची योजना सुरू करण्याचे तसेच सोन्याची नाणी बाजारात आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या कार्यक्रमात रविवारी केली.
- गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार सोन्याशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनाही सरकार बाजारात आणणार आहे.
- याशिवाय ‘स्वायत्त सुवर्ण रोखे’ आणि अशोकचक्राची मुद्रा असलेली नाणी योजनांच्या माध्यमातून आणली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे धनत्रयोदशीला या योजना कार्यान्वित केल्या जातील.
दिनविशेष :
- 1882 : डोंगरी येथील तुरुंगातून टिळक व आगरकर यांची मुक्तता.
- 1937 : ज्येष्ठ संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.