चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2018)
मुंबईत उभारणार मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ :
- मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. ‘ग्रंथाली’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे बॅंडस्टॅंड येथील जागा या विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे.
- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’च्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.
- मराठी भाषेसाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी 80 वर्षांपासून होत होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ही मागणी सातत्याने होत होती; मात्र त्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली नव्हती.
- राज्यात शिवसेना-भाजपचे राज्य आल्यानंतर या विद्यापीठासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आपल्या मतदारसंघात हे विद्यापीठ असावे, या दृष्टीने शेलार यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. वांद्रे येथे बॅंडस्टॅंड येथील जागा देण्याचे पालिकेने मान्य केले आहे.
आता लहान मुलांसाठी बालआधार कार्ड :
- आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक असते. हे आधारकार्ड आता लहानग्यांसाठीही अनिवार्य असणार आहे.
- 5 वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बालआधारकार्ड देण्यात येणार आहे. एरवी आधारकार्डसाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते पण बालआधारकार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल असे सांगण्यात आले आहे.
- यूआयडीएआयने (UIDAI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार 5 वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल असे सांगण्यात आले आहे. पण हे मूल जेव्हा वयाची 5 वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात.
चंद्रावर पाण्याचे सर्वत्र अस्तित्व :
- चंद्रावरील पाणी कुठल्या एका भागापुरते मर्यादित नसून ते सर्व भागात आहे, असे मत भारताच्या चांद्रयान 1 बरोबर पाठवण्यात आलेल्या नासाच्या शोधक यानाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्त करण्यात आले आहे.
- चंद्रावर दिवसरात्र पाणी उपलब्ध आहे, हे पाणी कुठून आले असावे व त्याचा वापर करणे कितपत शक्य आहे यावर विचार करावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जर चंद्रावर अजूनही भरपूर पाणी असेल व ते मिळवता येण्यासारखे असेल तर आगामी योजनांत त्याचे रूपांतर हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये करून श्वसनासाठी ऑक्सिजन मिळवणे शक्य आहे. चंद्रावर कुठल्याही वेळी कुठल्याही रेखांशावर पाणी उपलब्ध असल्याचे संकेत मिळतात असे अमेरिकेच्या स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे जोशुआ बँडफील्ड यांनी सांगितले.
- नेचर जिओसायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे, की चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याच्याशी पाण्याच्या उपलब्धतेचा संबंध नाही. चंद्राच्या ध्रुवांवर मोठय़ा प्रमाणात पाणी आहे पाण्याचे संकेत तेथे मिळतात. काहींच्या पाण्याचे रेणू चंद्राच्या पृष्ठभागावरून शीत पट्टय़ात जाऊन उत्तर व दक्षिण ध्रुवावरील विवरात जातात.
फायनान्स कंपन्या सरकारच्या ‘हाय रिस्क’ यादीत :
- अर्थ मंत्रालयातंर्गत काम करणाऱ्या वित्तीय गुप्तवार्ता शाखेकडून (एफआययू) सुमारे 9500 नॉनबँकिंग फायनान्शिएल कंपन्यांची (एनबीएफसी) एक यादी जारी करण्यात आली असून त्या अति जोखमीच्या वित्त संस्था असल्याचे सांगण्यात आले आहे.
- एफआययू-इंडियाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या या एनबीएफसीजच्या (बिगर बँकिंग वित्तीय संस्था)नावांचा समावेश असून त्यांना ‘अति जोखीम’ (हाय रिस्क) प्रकारात ठेवण्यात आले आहे. या कंपन्यांनी 31 जानेवारीपर्यंत मनी लाँड्रिंग अॅक्टच्या नियमांचे पालन केले नव्हते.
- 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री 500 आणि 1 हजार रूपयांची नोट अवैध घोषित केल्यानंतर नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाच्या (इडी) रडारवर आल्या होत्या. या कंपन्यांनी अनेक लोकांच्या जुन्या नोटा बदलून देऊन काळ्या पैशाच्या निर्मितीस मदत केली होती.
दिनविशेष :
- सन 1900 मध्ये 27 फेब्रुवारी रोजी ब्रिटन मध्ये मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला, म्हणून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
- थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा