चालू घडामोडी (27 मार्च 2017)
जी-20 कृती गटाची तिसरी बैठक वाराणसीत होणार :
- जी-20 परिषदेच्या आराखडा कृती गटाची (एफडब्लूजी) तिसरी बैठक 28 आणि 29 मार्चला वाराणसी येथे होणार आहे.
- अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया हे या बैठकीचे सहआयोजक आहेत. यापूर्वीच्या दोन बैठका बर्लिन (जर्मनी) आणि रियाध (सौदी अरेबिया) येथे झाल्या आहेत.
- वाराणसी येथील बैठकीमध्ये जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थितीबाबत आणि विकासादरम्यान येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना असलेल्या धोरणात्मक पर्यायांवर चर्चा अपेक्षित आहे.
- तसेच, जी-20 परिषदेचा अजेंडा निश्चित करणे आणि सर्व देशांना त्यांची विकासात्मक धोरणे राबविणे सोयीचे जावे यासाठी आराखडा निश्चित करणे ही देखील या बैठकीचे उद्दिष्टे आहेत.
- “एफडब्लूजी” हा जी-20 परिषदेचा प्रमुख कृती गट असून भारत आणि कॅनडा हे या गटाचे संयुक्त अध्यक्ष आहेत. भारताचा 2009 मध्ये या गटात समावेश झाल्यापासून भारतात होत असलेली ही चौथी बैठक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा :
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली.
- विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली.
- इंदू मिलच्या जागेवर जनतेच्या मनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
- जमीन हस्तांतरित होण्यापूर्वी राज्य शासनास या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाने काम सुरू केले आहे.
- तसेच निविदाही काढली आहे. आता जमीन नावावर झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार जनतेपर्यंत पोचविणाऱ्या भव्यदिव्य स्मारकाचे काम जोमाने सुरू होईल.
डॉ. नागेश्वर रेड्डी यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान :
- प्रसिद्ध जठरांत्रमार्ग विकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) तसेच हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांना प्रतिष्ठेच्या 44व्या धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल धन्वंतरी फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
- राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. नागेश्वर रेड्डी यांना (ताजमहाल हॉटेल, मुंबई येथे) हा पुरस्कार देण्यात आला.
- तसेच यावेळी धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बी.के. गोयल, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. लेखा आदिक-पाठक, डॉ जीवराज शहा, वैद्य सुरेश चतुर्वेदी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सीबीईसीचे नवे नाव सीबीआयसी :
- अप्रत्यक्ष करांची नवी व्यवस्था वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याच्या दिशेने सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमचे (सीबीईसी) नाव बदलून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (सीबीआयसी) असे करण्याची तयारी सरकारने केली आहे. जीएसटीची अंमलबजावणी देशात 1 जुलैपासून केली जाणार आहे.
- केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कायदेशीर मंजुरीनंतर केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क बोर्डाचे (सीबीईसी) नाव बदलून केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्ड (सीबीआयसी) असे करण्यात येणार आहे.
पाटील स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज :
- फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे.
- देशातील दर्जेदार स्टेडियमपैकी पाटील स्टेडियम हे एक असून विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा विश्वास फिफा स्पर्धाप्रमुख जैमे यार्जा यांनी व्यक्त केला.
- फिफाच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी केली, त्या वेळी जैमे यार्जा बोलत होते.
- तसेच या प्रसंगी फिफा स्पर्धा संचालक झेविअर सेप्पी, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझेझ, स्टेडिअमचे अध्यक्ष विजय पाटील, नवी मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.
दिनविशेष :
- 27 मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस आहे.
- 27 मार्च 1893 रोजी केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
- नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-43 या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती 27 मार्च 2004 रोजी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा