चालू घडामोडी (27 मार्च 2018)
राज्यातील पहिले सोलर पार्क धुळ्यात :
- राज्यातील तूट भरून काढण्यासाठी दोंडाईचा-विखरण परिसरात सौरऊर्जेवर आधारित 500 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 250 मेगावॉट सौर वीजनिर्मिती प्रकल्पाला म्हणजेच सोलर पार्कला सरकारने मान्यता दिली आहे.
- तसेच त्या अनुषंगाने ‘महाजनको‘ने नियोजन सुरू केले आहे. यात जे शेतकरी किंवा इतरांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्यांना वगळून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे ‘महाजनको’ स्तरावर विचाराधीन आहे.
- ‘औष्णिक’ ऐवजी आता सोलर पार्क होणार –
- दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीतून शिवाजीनगर (ता. साक्री) येथे सुरू झालेल्या दीडशे मेगावॉटच्या सोलर सिटी प्रकल्पानंतर दोंडाईचा-विखरण परिसरात दुसरा आणि वाढीव क्षमतेचा सोलर पार्क प्रकल्प प्रस्तावित आहे. यात 138 शेतकरी आणि सरकारमधील भूसंपादनाच्या मोबदल्याप्रश्नी वाटाघाटी फिसकटल्याने या क्षेत्रात 2009 पासून प्रस्तावित 3300 मेगावॉट औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प गेल्या वर्षी रद्द झाला.
- तसेच त्याऐवजी सुमारे साडेतीन हजार कोटींच्या गुंतवणुकीतील सोलर पार्क प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. पैकी पहिल्या टप्प्यात अडीचशे मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याची महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) अंमलबजावणी करेल.
आता बेकायदा बांधकामांवर उपग्रहांची नजर :
- बेकायदा इमारती आणि झोपडपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिका उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांची मदत घेणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या संस्थांकडून ही छायाचित्रे घेण्याच्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
- बेकायदा इमारती, झोपड्या आणि अन्य बांधकामांवर पालिकेने कारवाई केल्यानंतर अनेक वेळा हे वाद न्यायालयात जातात. त्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी उपग्रहामार्फत शहरातील काढलेल्या छायाचित्रांची मदत घेण्याच्या पर्यायाची चाचपणी पालिका करीत आहे.
- राज्य सरकारने उपग्रहांमार्फत छायाचित्र घेण्याची परवानगी काही संस्थांना दिली आहे. त्या संस्थांकडून छायाचित्र घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यात येईल. आता प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ अभ्यासाचा विषय होणार :
- स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्वच्छ भारत अभियान या वैकल्पिक विषयास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम फक्त थिअरी पद्धतीने न राहता प्रॅक्टीकली स्वरूपात आणण्यात येणार आहे.
- युजीसीच्या 530 व्या बैठक 20 मार्च रोजी झाली. या बैठकीत सीबीसीएस (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम) प्रणालीमध्ये स्वच्छ भारत अभियान या विषयाचा अंतर्भाव करण्यात आले आहे.
- उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा वैकल्पिक विषय असणार आहे. या विषयामध्ये 15 दिवसाचे (100 तास) इंटर्नशिप विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. इतर विषयाप्रमाणे या विषयाला दोन क्रेडिट गुण देण्यात येणार आहेत.
- उन्हाळ्यामध्ये घेण्यात येणाऱ्या इंटर्नशिपमध्ये ग्रामीण भाग, झोपडपट्टी भागात स्वच्छता अभियान घ्यायचे आहे. यासोबतच स्वच्छ केलेला भाग कायमचा स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष द्यायचे आहे. या इंटर्नशिपमधुन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे भारतातील शिक्षणाचा स्तर देखिल उंचावणार आहे.
गुगलने साकारले ‘चिपको आंदोलन’चे डुडल :
- चिपको आंदोलनाला 26 मार्च रोजी 45 वर्षे पूर्ण झाल्याने गुगलने आपल्या डुडलवर चिपको आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे.
- उत्तराखंडमध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल या गावात 1973 साली सर्वप्रथम चिपको आंदोलनाची सुरवात झाली. जंगल व झाडे वाचवण्यासाठी हे आंदोलन खेड्यातील ग्रामस्थांनी सुरू केले.
- जंगलातील मोठमोठी वृक्ष वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आजही महत्त्वपूर्ण मानला जातो. सरकारचे ठेकेदार झाडे कापायला असंख्य लोक घेऊन यायचे, त्यावेळी गावातील महिला, लहान मुले त्याला विरोध करत झाडांना मिठी मारून उभ्या रहायच्या. ‘पेड कटने नहीं देंगे’च्या घोषणा द्यायच्या. यामुळे अनेक जंगले, झाडे वाचली. त्या झाडांवर राहणारे पशुपक्षी वाचले. महिलांनी दाखवलेल्या या धैर्याचे आजही कौतुक होते.
- अलकनंदा खोऱ्यातील जंगलाच्या एका भूभागात ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, पण सरकारने ती नाकारली. त्याऐवजी क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला हा भूभाग देण्याचे निश्चित करण्यात आले. यालाच विरोध म्हणून चिपको आंदोलनाची सुरवात झाली.
- पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनात पुढाकार घेऊन सरकारला विरोध केला. त्याचबरोबर गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया या आंदोलनात उतरल्या. गौरादेवीने आसपासच्या गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.
डोकलाम वादावर भारत अलर्ट अॅन्ड रेडी :
- चीन सोबत डोकलाम बॉर्डर बाबत असलेला वाद चांगलाच टोकाला गेला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत हा ही परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर ती हाताळण्यासाठी ‘अलर्ट अॅन्ड रेडी’ (सावध आणि तयार) आहे, असे देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी म्हटले आहे.
- भारत-भूतान-चीन त्रिकोणी जंक्शन जवळ डोकलाम पठार येथे गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट 2017 दरम्यान भारतीय आणि चीनी सैन्य 74 दिवस अमोरासमोर आले होते. या अडचणीवर दोन्ही देशांकडून चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, अशा अटीवर हा फेस ऑफ ऑगस्ट नंतर मागे घेण्यात आला.
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्या देहरादून येथील निवासस्थानातील एका कार्यक्रमात सीतारामन यांनी डोकलाम आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या हस्तक्षेपाबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही आमचे क्षेत्र रक्षण आणि अखंडत्व अबाधित राहण्यासाठी सदा तत्पर आहोत.’
भारतीय भाषांमुळे नेटकऱ्यांची संख्या वाढली :
- भारतीय भाषांमुळे नेटकऱ्यांची संख्या किंवा इंटरनेट आणि मोबाइल नेट वापरणाऱ्यांची संख्या ही 20 कोटींनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.
- इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात IAMAI या संस्थेने ही माहिती दिली आहे. माहितीचे महाजाल असलेल्या इंटरनेटमध्ये आपल्या आवडीच्या भाषेचा पर्याय भारतीयांना मिळाला. त्यामुळेच नेटकऱ्यांची संख्या 20 कोटींनी वाढली आहे असे या संस्थेने म्हटले आहे.
- तसेच इंटरनेट इन इंडिक 2017 या नावाने या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात त्यांनी ही नोंद केली.
अस्मितादर्श चळवळीचे जनक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन :
- ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे 27 मार्च रोजी पहाटे निधन झाले. केंद्र सरकारने पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. ते 81 वर्षांचे होते.
- दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच जाणीवही होती. पानतावणे यांचे वाचनही चौफेर होते. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करत आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. केंद्र सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
दिनविशेष :
- शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने सन 1667 मध्ये धर्मांतर केले व त्यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
- सन 1794 मध्ये अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
- पंडित भीमसेन जोशी यांना 27 मार्च 1992 मध्ये मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान झाला.
- 27 मार्च 2000 रोजी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा