चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2015)
भूकंपांच्या तारखेचे योगायोग :
- जगातील बहुतांश मोठ्या शक्तिशाली भूकंपांची तारीख 26 हीच असून सोमवारी पुन्हा एकदा हा योगायोग जुळून आला असेच मानले जात आहे.
- अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंपाचे हादरे बसले.
- चीनमध्ये 26 जुलै 1976, गुजरातमध्ये 26 जानेवारी 2011 रोजी आलेला भूकंप हिंद महासागरात 26 डिसेंबर 2014 रोजी आलेली सुनामी भयंकर विध्वंसाच्या कटू स्मृती जागवणाऱ्या आहेत.
- तैवानमध्ये 26 जुलै 2010 आणि जपानमध्ये 26 फेब्रुवारी 2010 रोजी विनाशकारी भूकंपात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते.
- यावर्षी 26 तारखेला भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले.
- तसेच 26 जून 1926 रोजी रोड्स येथे शक्तिशाली भूंकप झाला होता तर 26 जानेवारी 1700 रोजी उत्तर अमेरिकेतील शक्तिशाली भूकंपात शेकडो लोक ठार झाल्याची नोंद आहे.
- अगदी अलीकडे इराणमध्ये 26 डिसेंबर 2003 रोजी विनाशकारी भूकंपात किमान 60 हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते.
- युगोस्लाव्हियामध्ये 26 जुलै 1963 रोजी भूकंपाने आणि मेस्पी ज्वालामुखीने 26 ऑक्टोबर 2010 रोजी हाहाकार उडविला होता.
- 26 डिसेंबर 1996 रोजी सबा येथे सागरी लाटांनी हजारो नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.
- 26 डिसेंबर 1939 रोजी तुर्कस्तानात भूकंपाने 41 हजार लोकांना कवेत घेतले.
- चीनमधील कासू येथे 26 डिसेंबर 1939 रोजी 70 हजार तर पोर्तुगाल येथे सुमारे 30 हजार लोक भूकंपात ठार झाले होते.
मुंबई शेअर बाजाराने जागतिक शेअर बाजाराच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळविले :
- भरीव कामगिरी आणि गुंतवणुकीवरील परतावा या दोन निकषांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रमुख जागतिक शेअर बाजाराच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे मानाचे स्थान मिळविले आहे.
- हॉँगकॉँग, दक्षिण आफ्रिका, शांघायनंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आपला नंबर लावला आहे.
- या यादीत भारतीय शेअर बाजारातील एका प्रमुख निर्देशांकाने स्थान पटकाविल्यामुळे अनेक परदेशी वित्तीय गुंतवणूकदार आता भारतीय बाजारात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
- सप्टेंबर 2013 पासून भारतीय शेअर बाजारात तेजी परतली आहे.
- गेल्या आर्थिक वर्षात परदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय शेअर बाजारात 43 अब्ज 50 कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
- चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामहीत 33 अब्ज 20 कोटी अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक परदेशी वित्तीय संस्थांनी केली असून आर्थिक वर्षाखेरीपर्यंत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान 29 टक्के अधिक गुंतवणूक होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
बाजारपेठेत बलेनो हॅचबॅक ही कार केली लाँच :
- हॅचबॅक अर्थात विना डिक्कीच्या कारमध्ये मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी बाजारपेठेत बलेनो हॅचबॅक ही कार लाँच केली.
- या कारची किंमत दिल्लीत 4.99 लाख ते 8.11 लाख रुपयांदरम्यान आहे.
- ही कार कंपनीच्या हरियाणातील मानेसरच्या प्लांटमध्ये तयार होणार आहे.
- मारुती आणि त्यांच्या सहयोगी कंपनीने या मॉडेलसाठी 1060 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- पेट्रोलवरील कारचे अॅव्हरेज 21.4 प्रति लिटर, तर डिझेल कारचे अॅव्हरेज 27.39 कि़मी. एवढे आहे.
- बलेनो हॅचबॅकच्या पेट्रोल कारची किंमत 4.99 ते 7.01 लाख रुपये आहे.
- डिझेल कारची किंमत 6.16 ते 8.11 लाख रुपये आहे.
कोल्हापूरमध्ये ‘लक्ष्मीचे पाऊल’उपक्रम :
- कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे.
- मुलगी झाल्यास मोफत प्रसूती सेवा दिली जात आहे.
- अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
- ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी रुग्णालयीन प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दोन महिन्यांपासून ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे.
- या उपक्रमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आठ रुग्णालयांची निवड केली आहे.
- संबंधित रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीद्वारे मुलगी झाली तर सर्व सेवा मोफत आहेत. मुलगा झाला तर फक्त एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.
- सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास औषधे व सर्व उपचारांसह 4 हजार 500 रुपये घेतले जातात.
- जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाहनसेवा देण्यात येते.
- जोखमीच्या गरोदर मातांना व बालकांवर आवश्यक उपचार केले जातात.
नौदलातही महिलांना महत्त्वाची कामे देण्याची तयारी :
- भारतीय हवाई दलाने महिलांना लढाऊ वैमानिकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नौदलातही महिलांना महत्त्वाची कामे देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे, पण सध्या तरी नौदलात महिलांना प्रत्यक्ष लढाईशी संबंधित काम देण्याचा विचार नाही.
- महिलांना नौदलात लष्करात निवृत्तीपर्यंत सेवेची संधी देण्याच्या निर्णयावर दिल्ली उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याला सरकारकडून आव्हान दिले जाणार आहे.
- लैंगिक मुद्दय़ावर महिलांची प्रगती रोखता येणार नाही, त्यामुळे त्यांना परमनंट कमिशन म्हणजे निवृत्तीपर्यंत सेवेची संधी देण्यात यावी, असा निकाल न्यायालयाने दिला असला तरी त्यात काही त्रुटी असून नौदलात लैंगिकतेवर आधारित समानता असल्याचे आधीच गृहीत धरले आहे.
- येत्या काही दिवसात त्याबाबतची घोषणा केली जाईल.
पॅरिस वेधशाळेचे संशोधन :
- लव्हजॉय हा धूमकेतू त्याच्या नावाप्रमाणेच आनंददायी असून तो मोठय़ा प्रमाणात म्हणजे सेकंदाला मोठय़ा प्रमाणात अल्कोहोल अवकाशात फेकत असतो.
- एकूण 500 वाईनच्या बाटल्या तयार करता येतील इतके अल्कोहोल सेकंदाला बाहेर टाकले जाते, असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे.
- अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये जे एथिल अल्कोहोल असते तेच या धूमकेतूमधून बाहेर पडते.
- या निरीक्षणानुसार धूमकेतू हे गुंतागुंतीच्या कार्बनी रेणूंचा स्रोत आहेत.
- बिव्हर यांच्या नेतृत्वाखालील चमूने केलेले संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
- त्यांना 21 विविध कार्बनी रेणू या धूमकेतूत सापडले असून धूमकेतूमधून जे वायू सोडले जातात त्यात एथिल अल्कोहोल व ग्लायकोलाल्डेहाईड ही साध्या स्वरूपातील साखर बाहेर टाकली जाते.
- धूमकेतू हे आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीनंतर उरलेले अवशेष आहेत.
- सौरमाला कशी तयार झाली असावी याची माहिती मिळण्याकरिता धूमकेतूंचे संशोधन आवश्यक असते.
- अनेक धूमकेतू हे सूर्याच्या कक्षेपासून लांब फिरत असतात गुरुत्वीय बलामुळे धूमकेतू सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांच्यातील वायू बाहेर फेकला जातो.
- लव्हजॉय हा धूमकेतू (सी 2014 क्यू 2) या नावाने नोंदणी झालेला असून तो सर्वात प्रखर आहे.
- 1997 मध्ये दिसलेल्या हेल-बॉप धूमकेतू सारखाच तो क्रियाशीलही आहे.
- या वर्षी 30 जानेवारीला लव्हजॉय धूमकेतू सूर्याजवळून गेला होता व त्यावेळी त्याने सेकंदाला 20 टन इतक्या वेगाने पाणी बाहेर टाकले होते.
- त्यावेळी या धूमकेतूचे निरीक्षण करण्यात आले होते व मायक्रोवेव्हमुळे निर्माण होणारी चमक त्याच्याभोवती सिएरा नेवाडा या स्पेनमधील ठिकाणी असलेल्या पिको व्हेलेटा रेडिओ दुर्बीणीतून दिसली होती.