चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2015)
अॅड. शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी :
- अॅड. शशांक मनोहर पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
- कारण त्यांना अनुराग ठाकूर व शरद पवार या दोन्ही गटांचा पाठिंबा आहे.
- दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर दोन्ही गटाच्या पसंतीचे उमेदवार ठरले आहे.
- ठाकूर आणि पवार गट एकत्र आले तर मनोहर यांना 29 पैकी 15 मते मिळणे निश्चित आहे.
सानिया आणि मार्टिना यांनी ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :
- विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने यजमान चीनच्या शिलिन शू आणि शियोदी यू या बिगरमानांकित जोडीचा 6-3, 6-1 अशा सलग सेट्समध्ये पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- ग्वांग्झू इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत भारतीय-स्वीस जोडीने अवघ्या 58 मिनिटांत अंतिम सामना जिंकला.
- या वर्षी सलग दोन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया आणि हिंगीस यांनी सर्व्हिसवर 70 टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिसवर 64 टक्के गुण घेतले.
राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रद्द :
- दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘ट्रान्सेंडन्स: माय स्पिरिच्युअल एक्स्पिरियन्सेस विथ प्रमुख स्वामीजी’ या अखेरच्या पुस्तकाच्या मल्याळी अनुवादाचा शनिवारी येथे आयोजित केलेला औपचारिक प्रकाशन समारंभ महिलांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर रद्द करण्यात आला.
- बोचासणवासी अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामींच्या सहवासातून व चर्चेतून अनुभवलेल्या आध्यात्मिक अनुभूती डॉ. कलाम यांनी या पुस्तकात कथन केल्या आहेत.
- डॉ. कमाल यांच्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचे श्रीमती श्रीदेवी एस.कार्था यांनी मल्याळीत भाषांतर केले असून त्रिचूर येथील ‘करन्ट बूक्स’ या प्रकाशन संस्थेने त्याचे प्रकाशन केले आहे.
- त्रिचूर येथील साहित्य अकादमी इमारतीमधील सभागृहात प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
- स्वामीनारायण पंथाचे प्रतिनिधी म्हणून स्वामी ब्रह्मविहारी दास यांना निमंत्रित करण्यात आले होते.
विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस 193 सदस्य देशांनी मान्यता :
- येत्या 15 वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 193 सदस्य देशांनी मान्यता दिली आहे.
- त्याचबरोबर ‘टिकाऊ विकासा’संबंधी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली.
- ‘टिकाऊ विकास’ योजनेतहत आगामी 15 वर्षांत भूक आणि दारिद्र्य समाप्त करावयाचे आहे.
- त्याचबरोबर स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना सन्मानित जीवन जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- 193 सदस्यीय महासभेने ‘आपल्या जगात बदल : टिकाऊ विकासासाठी 2030 ची कार्यक्रमपत्रिका’ हा प्रस्ताव मंजूर केला.
- या प्रस्तावातच पुढील 15 वर्षांत ‘दारिद्र्याचे पूर्णपणे उच्चाटन, विषमता आणि हवामानातील बदल’ या मुद्यावर 17 उद्दिष्टे आणि 169 लक्ष्य निश्चित केले आहेत.
- संयुक्त राष्ट्राच्या 70 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित महासभेसाठी जागतिक वित्तीय संस्थांचे प्रमुख आणि अन्य ज्येष्ठ नेते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आले असताना या महत्त्वाकांक्षी योजनेला मान्यता देण्यात आली.
- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या कार्यक्रमपत्रिकेला ‘बिगुल’ या शब्दात संबोधले.
नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले :
- जागतिक आरोग्य संघटनेने (हू) नायजेरियाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या जागतिक यादीतून वगळले आहे.
- आफ्रिकेतील सर्वात दाट लोकसंख्येच्या या देशात एक वर्षापेक्षा जास्त काळापासून पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.
- नायजेरियन प्रशासनाने नियोजनपूर्वक राबविलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेमुळे त्याला हे यश मिळाले.
- पोलिओग्रस्त देशांच्या यादीत आता केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशांची नावे उरली आहेत.
- नायजेरियाला पोलिओग्रस्त देश नसल्याचे घोषित करताना ‘हू’ने म्हटले की नायजेरियात पोलिओ विषाणूंच्या संसर्गाला प्रथमच अटकाव करण्यात आला आहे.
- त्यामुळे हा देश पोलिओमुक्त देश बनण्याच्या निकट पोहोचला आहे.
- नायजेरियात पोलिओचा अखेरचा रुग्ण 24 जुलै 2014 रोजी आढळून आला होता.
- एखाद्या देशात 12 महिन्यांपर्यंत पोलिओचा रुग्ण आढळून न आल्यास त्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून वगळण्यात येते.
मॅक्समिलन विद्यापीठातील संशोधन
- गेली अनेक वर्षे हुलकावणी देणारे एक आम्ल तयार करण्यात रसायनशास्त्रज्ञांना यश आले आहे.
- सायनोफॉर्म किंवा ट्रायसायनोमिथेन असे त्याचे नाव असून पाठय़पुस्तकांमध्ये त्याचा सर्वात तीव्र असे कार्बनआधारित आम्ल म्हणून उल्लेख आहे.
- 1896 पासून हे आम्ल बनवण्याचे प्रयत्न सुरू होते पण रसायनशास्त्रज्ञांना त्यात यश येत नव्हते.
- म्युनिक येथील लुडविग मॅक्समिलन विद्यापीठातील संशोधक अँड्रीयास कॉरनॅथ या रसायनशास्त्रज्ञाने सांगितले की, हे आम्ल तयार करण्यात तापमान हा मुख्य अडथळा होता.
- सायनोफॉर्म हे कक्ष तापमानाला स्थिर राहते असा पूर्वीचा समज होता, पण ते तसे नाही.
- काही प्रयोग करत शेवटी उणे 40 अंश सेल्सियस तापमानाला हे आम्ल तयार झाले आहे.
- या आम्लाची रासायनिक रचना बघितली तर त्याच्या केंद्रस्थानी कार्बनचा अणू आहे व तीन सायनो समूह त्याला जोडलेले आहेत.
- कार्बनचे नायट्रोजनबरोबर तिहेरी बंध यात आहेत.
- जेव्हा त्याचा रेणू हा हायड्रोजनचा अणू गमावतो त्यावेळी संहत आम्ल तयार होते व त्यात मूलभूत कार्बनी आम्लाचे गुणधर्म दिसतात.
- सायनो समू हे इलेक्ट्रॉनप्रेमी असतात. हे आम्ल तयार होताना सायनो समूहातील छोटय़ाशा जागेत कार्बनचे रेणू स्थिरावतात.
- त्यामुळे हायड्रोजनचे बंध कमकुवत होतात. कक्ष तापमानाला सायनोफॉर्म विघटित होते व वेगळेच रेणू तयारहोतात त्यांना जंक मॉलिक्युल्स म्हणतात.
- 1896 मध्ये जेव्हा हेरमान श्मिडटमन यांनी सायनोफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सल्फ्युरिक आम्ल हे तुलनेने स्थिर असलेल्या सोडियम ट्रायसायनोमेथनाईडबरोबर त्याची अभिक्रिया केली.
- यात सल्फ्युरिक आम्ल ऋणभारित ट्रायसायनोमेथनाईडवरील अणूशी चिकटून सायनोफॉर्म तयार होईल, अशी अपेक्षा होती पण त्यात वेगळेच हिरवे मिश्रण तयार झाले व त्यात अस्थिर आम्लाचे अवशेष होते. त्यानंतर अनेकांनी सायनोफॉर्म वेगळे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.
‘अॅस्ट्रोसॅट’ हा उपग्रह 28 सप्टेंबरला सोडला जाणार :
- भारतीय खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या पहिल्या उपग्रहाची पन्नास तासांची उलटगणती सुरू झाली असून 28 सप्टेंबरला हा उपग्रह पीएसएलव्ही सी 30 प्रक्षेपकाने सकाळी दहा वाजता सोडला जाणार आहे.
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेच्या श्रीहरीकोटा येथील अवकाशतळावरुन सकाळी दहा वाजता हा उपग्रह सोडला जाणार आहे.
- इस्रोचे अध्यक्ष ए.एस.किरणकुमार यांनी सांगितले की, भारतीय संशोधकांसाठीचा हा पहिलाच वैज्ञानिक उपग्रह आहे, त्यामुळे निरीक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
- खगोलांचे एकाचवेळी अनेक तरंगलांबीच्या माध्यमातून निरीक्षण करण्याची संधी या उपग्रहामुळे प्राप्त होणार आहे.
दिनविशेष :
- जागतिक प्रवासी दिन.
- 1821 : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- 1959 : जपानच्या त्रिपक्षी तह स्वीकारला.
- 2002 : पूर्व तिमोरला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 2002 : मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.
- 1907 : भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी यांचा जन्मदिन.