चालू घडामोडी (28 एप्रिल 2016)
अमेरिकन संशोधन प्रकल्पाला भंवरलाल जैन यांचे नाव :
- जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याचा सन्मान म्हणून अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठ व रॉबर्ट बी. डोहर्टी वॉटर फॉर फूड इन्स्टिट्युटने तेथील संशोधन प्रकल्पाला ‘भंवरलाल हिरालाल जैन- वॉटर फॉर फूड कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम नेब्रास्का युनिव्हर्सिटी’ असे कायमस्वरूपी नाव दिले आहे.
- प्रकल्पाअंतर्गत सहभागी होणाऱ्या संशोधकांना ‘बी. एच. जैन स्कॉलर्स’ तर संशोधन पूर्ण करणाऱ्यांना ‘बी. एच. जैन फेलो’ म्हणून गौरवण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.
- लिंकन, नेब्रास्का येथे सुरू असलेल्या ‘वॉटर फॉर फूड ग्लोबल कॉन्फरन्स’मध्ये नेब्रास्का विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. हॅन्क एम. बॉन्डस् यांनी ही घोषणा केली.
- जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना त्यांनी सन्मानपत्राच्या वाचनानंतर स्मृतिचिन्ह प्रदान केले.
- कृषि व जल व्यवस्थापनातील अमूल्य योगदानासह लोकोपकारी, गांधीवादी, तत्त्वज्ञ, लेखक, उद्योजक, समाजसेवक व शेतकरी म्हणून भवरलालजींनी ठसा उमटविला, या शब्दांत नेब्रास्का विद्यापीठाने मानपत्रात गौरव केला आहे.
- परिषदेला जगभरातील कृषी व जलव्यवस्थापनातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
नासाने शोधला नवा ग्रह :
- सौरकक्षेच्या बाहेर ‘कुईपर बेल्ट’मध्ये ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ने नवीन खुजा ग्रह शोधला आहे.
- प्लुटोनंतर हा दुसरा शुभ्र, बर्फाळ ग्रह मानला जात आहे.
- मेकमेक ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा 13 हजार मैल अंतरावर असून, त्याचा व्यास शंभर मैल आणि 870 मैल रुंद असल्याचे सांगितले जाते, या चंद्राला एमके-2 असे टोपणनाव दिले आहे. त्याची दृश्यमानता मेकमेकपेक्षा 1300 पटींनी कमी आहे.
- इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल यूनियनने मान्यता दिलेल्या पाच खुज्या उपग्रहामालिकेपैकी मेकमेक हा एक उपग्रह आहे.
- एप्रिल 2015 पासून ‘हबल’च्या दुर्बिणने या उपग्रहावर लक्ष ठेवले होते, मायनर प्लॅनेट इलेक्ट्रॉनिक सर्क्युलरने हा शोध जाहीर केला.
- ‘हबल’च्या पथकाने यापूर्वी उपग्रह शोधण्यासाठी 2005, 2011 आणि 2012 मध्ये हेच तंत्र वापरले होते.
- ‘मेकमेक’ भोवतालची संशोधन मोहीम पूर्ण केल्यानंतर या पथकाने या चंद्रावर लक्ष केंद्रित केले. या चंद्राच्या शोधामुळे खुज्या ग्रहाच्या कक्षेतील महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रज्ञांना मिळणार आहे.
वार्षिक महसूल वसुलीमध्ये रायगड जिल्हा सर्वप्रथम :
- अलिबाग-रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून 217 कोटी 50 लाख 12 हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित केला आहे.
- तब्बल 102.25 टक्के यश साध्य करून वार्षिक महसूल वसुलीमध्ये संपूर्ण कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- कोकण विभागात सिंधुदुर्ग द्वितीय, पालघर तृतीय, रत्नागिरी चतुर्थ, मुंबई शहर पाचव्या, ठाणे सहाव्या तर मुंबई उपनगर जिल्हा सातव्या स्थानावर आहे.
- जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक कर आणि शासकीय कर्ज वसुली यांचा 2015-16 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरिता शासनाने 212 कोटी 72 लाख 47 हजार रुपयांचा इष्टांक दिला होता.
- जिल्ह्यातील गौण खनिज महसुलातील सर्वात मोठी बाब असणारे रेती उत्खनन जिल्ह्यात बंद असल्याने त्यांतून प्राप्त होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल या आर्थिक वर्षात प्राप्त झाला नसला तरी जिल्ह्यातील 15 तहसीलदार कार्यालये आणि 8 उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालये यांनी वर्षभरात विक्रमी महसूल वसुली करून राज्य शासनाने दिलेला इष्टांक पार करून 217 कोटी 50 लाख 12 हजार रुपयांचा महसूल संकलित करून, तब्बल 102.25 टक्के यश साध्य केले असल्याची माहिती रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.
विद्यालयांमध्ये ऑफलाईन संचमान्यता करण्यास परवानगी :
- कनिष्ठ महाविद्यालयांची 2015-16 या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता प्रचलित निकषानुसार ऑफलाइन पद्धतीने करण्याचा शासनाने आदेश काढला आहे.
- तसेच त्यामुळे आता संचमान्यतेबाबतचा संभ्रम संपुष्टात आला असून, शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
- (दि.26) अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन संचमान्यता होण्यास अधिक वेळ लागत आहे ही शक्यता गृहीत धरून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये संचमान्यतेच्या प्रचलित निकषानुसार ऑफलाईन संचमान्यता करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
- तसेच त्यानुसार माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनीही परिपत्रकाद्वारे ऑफलाईन संचमान्यता होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय तिरंदाजकडून विश्वविक्रमाची बरोबरी :
- भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात (दि.27) मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.
- जागतिक तिरंदाजी क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू राहिलेल्या दीपिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णांची कमाई केली होती.
- तसेच तिने आज 72 नेम साधताना 686 गुण संपादन करीत लंडन ऑलिम्पिकची सुवर्ण विजेती कोरियाची किबो बाई हिच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- किबो बाईने लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात दोन सुवर्ण जिंकले होते.
- 2015 साली तिने ग्वांगझृ येथे आपलीच सहकारी पार्क सूंग हून हिचा 11 वर्षे जुना 682 गुणांचा जुना विश्वविक्रम मोडीत काढला होता.
- दीपिकाने पहिल्या टप्प्यात 346 गुणांची कमाई करीत आश्चर्याचा धक्का दिला.
- कोरियाच्या खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी नऊ गुणांची गरज होती; पण दीपिकाला ही कामगिरी मात्र करता आली नाही.
- अव्वल मानांकित दीपिकाला आता थेट 32 खेळाडूंमध्ये तिसरी फेरी खेळण्याची संधी मिळणार आहे.
- भारतीय महिला संघाला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. मिश्र प्रकारात दीपिकाने अतनू दाससोबत तुर्कीच्या जोडीला 5-3 ने पराभूत केले.
दिनविशेष :
- 1920 : होमरुल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
- 1931 : मधु मंगेश कर्णिक, मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक यांचा जन्म.
- 2001 : डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा