Current Affairs of 28 February 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2017)
मराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान :
- मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
- 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे रंगलेल्या या भव्य सोहळ्यात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारविजेते मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार विजेत्या यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेते श्याम जोशी यांना, तसेच श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला.
- तसेच याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक-लेखक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाच’ लोकार्पणही करण्यात आले.
- यावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत हरिकाला कास्यपदक :
- भारतीय ग्रॅण्डमास्टर डी हरिका हिला 26 फेब्रुवारी रोजी विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झ्योंगी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य पदक आहे.
- भारताची स्टार खेळाडू असलेल्या द्रोणवली हरिका हिने टायब्रेकमध्ये अनेक संधी गमावल्या. त्याचा परिणाम हा तिला पराभवाच्या रूपाने पाहावा लागला. अंतिम फेरीत आता झ्योंगीचा सामना युक्रेनच्या अन्ना मुजिचुक हिच्याशी होईल.
- हरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त 17 व्या चालीतच विजय नोंदवला. तिच्या या धडाक्याने झ्योंगी मागे पडली.
- मात्र, दुसऱ्या डावात हरिकाने झ्योंगी हिला पुनरामन करण्याची संधी दिली. काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने दुसरा डाव ड्रॉ होण्याची स्थिती असताना चूक केली. त्यामुळे तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसरा डाव जिंकल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी साधली.
- तसेच त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला 5-4 ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने 2012 आणि 2015 मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
विराट कोहली वर्षातील सर्वोत्तम कर्णधार :
- भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीची 10व्या वार्षिक इएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवड झाली.
- कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने 12 पैकी 9 सामन्यांत विजय मिळविला.
- माजी महान क्रिकेटपटू, इएसपीएन-क्रिकइन्फोचे सीनिअर संपादक, लेखक आणि जागतिक वार्ताहरांच्या स्वतंत्र समितीने विजेत्यांची निवड केली. त्यात इयान चॅपेल, माहेला जयवर्धने, रमीज राजा, ईसा गुहा, सम्बित बाल, कर्टनी वॉल्श, मार्क बुचर आणि सायन टफेल यांचा समावेश होता.
- इंग्लंडच्या बेन स्टोक्सने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 198 चेंडूंमध्ये 258 धावांची खेळी केली होती. त्यासाठी फलंदाजीमध्ये वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.
- स्टोक्सचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीमध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेत इंग्लंडचा मालिका विजय निश्चित केला होता. त्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी ‘वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज’ या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.
राज्याचे नवे मुख्य सचिव सुमित मलिक :
- सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ते 31 जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.
- सुमित मलिक हे 1982 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभाग (राज शिष्टचार)चे अति. मुख्य सचिव आहेत.
- ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ही नवी संधी दिल्याचे म्हटले जाते. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे 2 वर्षांचा असेल. शांत व संयमी स्वभावाचे, तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे.
वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध :
- कोचीमधील इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.
- मनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे.
- विभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै 2015 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.
- इम्पॅटिअन श्रेणीतील ही वनस्पती नवी असल्याचे त्या वेळी नागराज यांनी सांगितले होते, या कामात त्यांना संशोधक के.एम. प्रभुकुमार यांची मदत लाभली होती.
- 2016च्या सप्टेंबरमध्ये कन्नडिपारा येथे ही वनस्पती पुन्हा आढळली, जगासाठी मात्र ती अनोळखी वनस्पतीच होती.
- आता आंतरराष्ट्रीय जनरल फायटोटाक्सामध्ये याबाबतचे शोधपत्र छापून आले असून, या वनस्पतीची 100 ते 150 झाडेच सापडली असल्याने तिला अतिशय चिंताजनक श्रेणीत दाखल करण्यात आले आहे.
- तसेच ही वनस्पती दगडांमध्ये असलेल्या ओलाव्यात वाढते, तिला जुलै ते ऑक्टोबर दरम्यान फुले येतात आणि ती पांढरी असून, त्यांच्यावर गुलाबी रंगाची हलकी छटा असते, अशी माहिती या शोधपत्रात देण्यात आली आहे.
दिनविशेष :
- सन 1931 मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ.सी.व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले. पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.
- 28 फेब्रुवारी 1987 हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा