Current Affairs of 28 June 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 जून 2018)
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता बंद होणार :
- बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता आता बंद करण्यात येणार असून तसा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये ऑपरेशनल स्टाफ आणि औद्योगिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता थांबवण्यात येणार आहे, असे खर्च विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग, भारत सरकारशी जोडलेली आणि संलग्न असलेल्या सर्वप्रकारच्या कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या प्रशासनाला त्यांच्याकडील ऑपरेशनल स्टाफची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक उपस्थिती असल्यास ओव्हरटाईम भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशनल स्टाफच्या ओव्हरटाइम भत्त्यात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा भत्ता 1991च्या आदेशाप्रमाणेच कायम राहणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
मॅक्रोग्राफर्सच्या दुनियेचे अनोखे विश्व :
- रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी… छोटासा बेडूक असो वा मुंगी… त्यांच्या विश्वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या ‘सूक्ष्म’ (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम ‘पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप’ करत आहे.
- ज्या वस्तू किंवा जे कीटक डोळ्यांनी नीट पाहता येऊ शकत नाहीत, अशा छोट्या वस्तू आणि कीटकांचे विश्व टिपण्याचा या ग्रुपमधील छायाचित्रकार अनोखा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या छायाचित्रांना जागतिक स्तरामधील प्रदर्शनांमध्येही स्थान मिळत आहे.
- वन्यजीव छायाचित्रणापलीकडे खास सूक्ष्म छायाचित्रणासाठी 2014 मध्ये अन्वय नाकाडे आणि योगेंद्र जोशी या हौशी छायाचित्रकारांनी या ग्रुपची सुरवात केली. सध्या ग्रुपचे 30 छायाचित्रकार सूक्ष्म फोटोग्राफी करत आहेत.
- तसेच या ग्रुपला फेसबुकच्या माध्यमातून 400 छायाचित्रकार जोडले गेले असून, त्यांच्यात या छायाचित्रणाची आवड निर्माण करण्याचे काम विविध उपक्रमांद्वारे ग्रुपचे सदस्य करत आहेत. या छायाचित्रणाद्वारे छोट्या वस्तूमधील डिटेल्स आपल्याला कळतात. दुर्मीळ कीटकांसह इतर सूक्ष्म प्राण्यांचे जग यातून टिपता येते.
जनतेमध्ये जागृतीसाठी प्लॅस्टिक बंदीवर कार्यशाळा :
- पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिकवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कॅरी बॅग वापरू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के यांनी केले.
- राज्यात सुरू झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे करण्यात येत आहे. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना या कायद्याची सविस्तर माहिती देण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष कारवाई करताना येणाऱ्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
- ‘एमपीसीबी‘ बरोबरच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट‘, ‘वेस्ट मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर‘ यांच्यातर्फे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
21व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण :
- आजपासून बरोबर एक महिन्याने म्हणजेच 27 जुलै रोजी 21व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्राचे असेल असेल म्हटले जात आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 34 मिनिटांचा असेल. या काळात चंद्र अतिशय सुंदर अशा लालसर रंगात दिसेल.
- वैज्ञानिकांनी या चंद्रग्रहणाला ब्लड मून (Blood Moon) असे नाव दिले आहे. हे ग्रहण भारताबरोबरच आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
- तसेच जाणून घेऊया सुपरमून, ब्लड मून आणि चंद्रग्रहणाबद्दलच्या काही खास गोष्टी पुढील प्रमाणे –
- सुपरमून – चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असते तेव्हा चंद्र जास्त प्रमाणात चमकतो, त्याला सुपरमून म्हणतात.
- ब्लड मून – यात चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसतो. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते आणि तो लाल दिसतो. यालाच आपण ब्लड मून म्हणतो. असे तेव्हाच होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यातही सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात.
- चंद्रग्रहण – जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही. सुर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सुर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सुर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.
सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन :
- जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
- सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
- सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स:जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम 2013 मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.
- वायगाव हे गाव 80 टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण 6 ते 8 टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते. त्यामुळे सांगलीच्या हळदीचे जीआय मानांकन हुकले होते. नंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाला.
- भारतातील 80 टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे, ‘सांगलीची हळद‘ म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स-जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या ‘इंडियन पेटंट’ कार्यालयाकडे पुन्हा केली होती.
दिनविशेष :
- भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
- 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
- अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने सन 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
- संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा