चालू घडामोडी (28 मार्च 2018)
आधार-पॅन जोडण्यासाठी अंतिम तारीखेत मुदतवाढ :
- केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठीची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे.
- कर विभागाच्या धोरणे निश्चित करण्याऱ्या समितीने ही निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी दोन ओळखपत्रे एकमेकांना जोडण्यासाठीची शेवटची तारिख ही 31 मार्च होती. त्यात आता वाढ करण्यात आली होती.
- सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला आधारला विविध प्रकारच्या सेवांसोबत जोडण्याचा अंतिम दिवस 31 मार्चच्या पुढे वाढवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतला आहे.
- चौथ्यांदा सरकारने आधार-पॅन अंतिम मुदत वाढवली आहे. मात्र, सरकारने प्राप्तिकर जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पॅन कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे.
आरोग्य सुरक्षा कायद्याचा मसुदा जाहीर :
- वैयक्तिक माहितीच्या संरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका होत असतानाच सरकारने हळुवारपणे संकेतस्थळावर आरोग्यविषयक माहितीच्या संरक्षणाच्या कायद्याचा मसुदा टाकला असून त्यामध्ये पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
- द ड्राफ्ट डिजिटल इन्फॉर्मेशन इन हेल्थकेअर अॅक्ट (दिशा) मध्ये म्हटले आहे की, शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्थितीबाबतची कोणतीही माहिती, वैद्यकीय नोंदी ही संबंधित व्यक्तीची खासगी मालमत्ता आहे.
‘टॅक्स रिटर्न’ भरण्यासाठी 31 मार्च शेवटची मुदत :
- 2016-17 या आर्थिक वर्षांसाठीचे प्राप्तिकर विवरण पत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरले नसेल तर त्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपली आहे. 31 मार्च 2018 प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख आहे.
- 2016-17 या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या दरम्यान मिळवलेल्या उत्पन्नासाठी 31 मार्च 2018 पर्यत प्राप्तिकर विवरण पत्र भरायचे आहे. त्याचबरोबर 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचे ज्यांचे प्राप्तिकर विवरण पत्र भरायचे राहून गेले आहे त्यांच्यासाठीसुद्धा 31 मार्च हीच अंतिम तारीख आहे.
- तसेच प्राप्तिकर विभागाने दिवसेंदिवस अतिशय काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.
बीजिंग ते न्यूयॉर्क दोन तासांत विमान प्रवास शक्य होणार :
- चीन जगातील सर्वाधिक वेगवान विमान विकसित करणार असून, ते बीजिंग ते न्यूयॉर्क अंतर दोन तासांत कापू शकेल, असे वृत्त चीनमधील सरकारी माध्यमांनी दिले आहे. हे विमान सेकंदाला बारा किलोमीटर वेगाने प्रवास करू शकते.
- तसेच हे विमान विकसित करण्यासाठी पवन बोगदा (विंड टेन) विकसित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे. हा बोगदा 265 मीटर लांबीचा असेल. त्यातून 25 माक वेगाने (ताशी 30,625 किलोमीटर) विमान प्रवास करू शकेल. हा वेग ध्वनीच्या वेगाच्या 25 पट आहे.
- सध्याच्या पवन बोगद्यातून पाच ते नऊ माकपर्यंत वेगाने प्रवास करणे शक्य आहे, अशी माहिती चीनची सरकारी संस्था चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्समधील (सीएएस) संशोधक हान गिलाई यांनी दिली.
‘एमआरपी’ पेक्षा जास्त वसुलीवर दंड बसणार :
- एमआरपी अर्थात कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जास्त पैशांना वस्तूंची विक्री करणे आता आणखी महागात पडू शकते. ग्राहकांकडून अशा पद्धतीने ‘वसुली’ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा विचार सरकार करत आहे.
- ग्राहक मंत्रालयाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास संबंधित विक्रेत्यांना 5 लाख रुपये दंड आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
- एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेऊन वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्वाची बैठक झाली.
- तसेच एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2017 ते 22 मार्च 2018 पर्यंत 636 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाढत्या तक्रारींचा आकडा पाहता मंत्रालयाने यासंबंधीचे नियम अधिक कठोर करण्याचा विचार केला आहे.
दिनविशेष :
- सन 1737 मध्ये बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
- रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे 28 मार्च 1942 रोजी ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
- सन 1992 मध्ये 28 मार्च रोजी उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-10000 हा महासंगणक 28 मार्च 1998 रोजी देशाला अर्पण करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा