चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2015)
अग्नी-1 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
- भारताने पुन्हा स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-1 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटरवरील लक्ष्य भेदू शकते.
- हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असून, या सिंगल स्टेज क्षेपणास्त्रासाठी घनरूपातील इंधनाचा वापर करण्यात आला आहे.
- तसेच अब्दुल कलाम आयलंडवरील लॉंच पॅड-4 वरून या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे.
- लॉंच पॅडवरून हे क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर ते लक्ष्यभेद करेपर्यंत त्याच्यावर रडार, टेलिमेट्री ऑब्झर्व्हेशन इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रो- ऑप्टिक इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती.
- या क्षेपणास्त्राचे वजन 12 टन एवढे असून त्याची लांबी 15 मीटर एवढी आहे. हे क्षेपणास्त्र एक टनांहून अधिक वजन वाहून नेऊ शकते तर वजनाच्या तुलनेमध्ये या क्षेपणास्त्राचा पल्ला कमी-जास्त केला जाऊ शकतो.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मधील ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने ते विकसित केले आहे.
- यासाठी संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इम्रातमधील संशोधन केंद्र व हैदराबादेतील भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संस्थांनीही मदत केली होती.
बराक-8 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
- इस्राईलने भारतासमवेतच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केलेल्या बराक-8 क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा यशस्वी चाचणी घेतली.
- या क्षेपणास्त्राने शत्रू म्हणून एका छोट्या ड्रोनवर हल्ला केला. इस्राईल सैनिकांच्या सूत्रानुसार, इस्राईलच्या नौसेनेच्या जहाजावरून सोडण्यात आलेले बराक-8 क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधले आणि शंभर टक्के यश मिळवले. त्यानंतर दहा डिसेंबर रोजी भारतीय नौसेनेकडून या क्षेपणास्त्राची चाचणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- या चाचणीसाठी भारतीय बनावटीच्या आयएनएस कोलकता याचा वापर होण्याची शक्यता आहे. कारण आयएनएसवर रॉकेट लॉंचर आणि क्षेपणास्त्राचा शोध घेणारे रडार तैनात करण्यात आले आहे.
- डीआरडीओ आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय), इस्राईल्स ऍडमिनिस्ट्रेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ वेपन्स अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, एल्टा सिस्टिम्स, राफेल आणि अन्य कंपन्यांच्या सहकार्याने क्षेपणास्त्राची निर्मिती केली जात आहे.
- तसेच भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) याला क्षेपणास्त्र निर्मितीची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
- प्रारंभी 32 क्षेपणास्त्र आयएनएस कोलकतावर तैनात करण्यात आले असून या क्षेपणास्त्रामुळे हवाई संरक्षणाची कक्षा वाढण्यास मदत होणार आहे.
- येत्या दोन वर्षांत ती संरक्षणासाठी सज्ज असेल, अशी अपेक्षा आहे.
- बराक-8 हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप मानले जाते. हे क्षेपणास्त्र विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी :
- फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली आहे.
- दुकाने, रेस्टॉरंट, सार्वजनिक इमारती व ठिकाणे या ठिकाणी महिलांना बुरखा घालून फिरता येणार नाही.
- ही बंदी तोडल्यास सुमारे साडेसहा लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये सुमारे 40 हजार मुस्लिम महिला आहेत.
- तसेच फ्रान्समध्ये आधीच बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.
भारतातून एचएसबीसी या बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय :
- आशियातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतातून एचएसबीसी या बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- भारतातील खाजगी बॅंकिंगचे धोरणात्मक पुनरावलोकन केल्यानंतर आम्ही व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेच्या मुंबईतील प्रवक्त्याने दिली आहे.
- भारतातील व्यवसाय बंद करणारी एचएसबीसी दुसरी परदेशी बॅंक आहे. याआधी आरबीएसने भारतातील आपला बँकिंगव्यवसाय बंद केला होता.
- तसेच गेल्या काही वर्षात एसएसबीसीने जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे.
- तर वर्ष 2010 पासून जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल दीड लाखांची घट केली आहे.
चीनमधील एड्सग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक :
- चीनमधील एड्सग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या विषयातील तज्ज्ञाने चीनमधील एका दैनिकाशी बोलताना म्हटले आहे.
- चीनमध्ये या वर्षअखेर अंदाजे 1 लाख 10 हजार नवीन एड्सग्रस्त रुग्ण आढळून येण्याची शक्यता असून त्यापैकी 3 हजार 400 पेक्षा अधिक रुग्ण 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थी असण्याची शक्यता आहे, असा अंदाज राष्ट्रीय एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वु झुंगयू यांनी वर्तविला आहे.
- 2008 मध्ये ही संख्या 779 एवढी होती. मात्र आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ही चिंताजनक बाब असल्याचेही ते म्हणाले.
एच.एल. दत्तू यांचे नाव राष्ट्रीय मानवाधिकर आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विचाराधीन :
- डिसेंबरमध्ये निवृत्त होणारे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच.एल. दत्तू यांचे नाव राष्ट्रीय मानवाधिकर आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी केवळ निवृत्त मुख्य न्यायाधीशांचीच नियुक्ती करता येते.
- न्यायाधीश दत्तू हे येत्या 2 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली तर इतर कोणाच्याही नावाचा विचार केला जाणार नाही अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
- न्यायाधीश के. जी. बालाकृष्णन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या मे महिन्यापासून आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे.
महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर :
- संस्कृत भाषेतील अपूर्व योगदानासाठी देण्यात येणारे राज्य शासनाचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- प्राचीन संस्कृत पंडित या वर्गवारीतील पुरस्कारासाठी अशोक विष्णू कुलकर्णी, तर वेदमूर्ती वर्गवारीतील पुरस्कारासाठी मनोज बालाजी जोशी यांची निवड केली आहे.
- अन्य राज्यांतील संस्कृत पंडित म्हणून डॉ. सिद्धार्थ वाय. वाकणकर यांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे.
मॅगी पाझ्तामध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याने कंपनी वादाच्या भोवऱ्यात :
- मॅगीनंतर नेस्ले कंपनीच्या ‘मॅगी पाझ्ता’ नावाने विकल्या जाणाऱ्या पास्त्यात शिशाचे प्रमाण जास्त आढळल्यानंतर ही कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- त्यानंतर कंपनीची उत्पादने सुरक्षित असल्याचा दावा करत यासंदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढणार असल्याचे कंपनीने सांगितले.
- उत्तरप्रदेश सरकारने आपल्या लखनौच्या प्रयोगशाळेत नेस्लेच्या पास्ताचे नमुने तपासले होते. त्यात शिसे प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.
- तसेच शिशाचे प्रमाण 2.5 पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) पर्यंत असणे अपेक्षित आहे. परंतु, लखनौच्या राष्ट्रीय अन्न पृथक्करण प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत हे प्रमाण 6 पीपीएम इतके असल्याचे आढळले.
- जूनमध्ये ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ने मॅगीचे सेवन आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगत तिच्यावर बंदी घातली होती.
- हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश तीन प्रयोगशाळांना दिले. या चाचण्यांत मॅगी उत्तीर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिच्यावरील बंदी उठवली. त्यानंतर आता देशातल्या शंभर शहरांमध्ये तिचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, अजूनही आठ राज्यांमध्ये मॅगीवरील बंदी कायम आहे.
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची नियुक्ती :
- 2017 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या फेरबदलात माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना नवे प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले आहे, तर ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले आहे.
- तसेच अमरिंदर प्रतापसिंग बाजवा यांची जागा घेतील. बाजवा यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही घडामोड झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले.
दिनविशेष :
- 1960 : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- 1890 : महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक यांचा मृत्यू
- 1967 : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक यांचा मृत्यू