चालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2017)
एअर इंडियाचे नवे सीएमडी प्रदीप सिंह खरोला :
- वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.
- रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 28 नोव्हेंबर रोजी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली. एअर इंडियांवर सुमारे 50 हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी :
- उत्तर कोरियाने 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो.
- उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. याआधी 15 सप्टेंबरला उत्तर कोरियाने शेवटची क्षेपणास्त्र चाचणी केली होती. यानंतर दोन महिने या भागात शांतता निर्माण झाली होती. मात्र उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने ही वादळापूर्वीची शांतता ठरली. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे जगात पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण पसरले आहे.
- उत्तर कोरियाच्या दक्षिण प्योंगयांग प्रांतातून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांच्यानुसार, हे उत्तर कोरियाचे सर्वाधिक अंतराचा टप्पा गाठू शकणारे क्षेपणास्त्र (आंतरखडीय क्षेपणास्त्र) होते. जगातील कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती उत्तर कोरियाकडून सुरु असल्याचेही मॅटिस यांनी म्हटले.
- तसेच ‘या प्रकरणात आपण लक्ष घालू,’ असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. तर जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी उत्तर कोरियाचे हे कृत्य हिंसक असल्याचे म्हटले. उत्तर कोरियाची ही कृती सहन केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. आबे यांनी या प्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट गोल्डन पिकॉक पुरस्कार :
- मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पीलो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला. इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी 28 नोव्हेंबरा रोजी या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली.
- 1990 च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या ‘कांस’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला. 40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या ‘अँजल्स वेअर व्हाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
- चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या या सामाजिक चित्रपटातून ही समस्या प्रभावीपणे मांडली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणून रजत मयुर आणि 15 लाख रुपये दिले जातील. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या :
- राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. लेखा व कोषागार विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची बदली अर्थ विभागात वित्तीय सुधारणापदावर करण्यात आली. वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आर.ए. राजीव यांच्याकडे व्यव विभाग सोपविण्यात आला आहे.
- पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. देसाई यांची बदली मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक या पदावर करण्यात आली. लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ माणिक गुरसळ यांच्याकडे मनरेगाचे आयुक्तपद सोपविण्यात आले आहे.
- मंत्रालयातील सहसचिव सूरज मांढरे यांची बदली पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. मनरेगाचे आयुक्त एस.जी. कोलते यांच्याकडे आता उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या साईओपद सोपविण्यात आले; तर मांढरे यांच्या जागी आर.डी. निवतकर यांची नियुक्ती करण्यात आली. विपिन इटरकर यांची बदली लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली.
‘रॉयल कपल’ होणार 2018 मध्ये विवाहबद्ध :
- प्रिन्स हॅरी आपली मैत्रीण व अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे, असे क्लेरेन्स हाऊसने जाहीर केले. वेल्सच्या राजपुत्राचा विवाह अभिनेत्री मेघन मार्कल 2018 च्या वसंत ऋतुमध्ये होईल, असे सूत्रांनी सांगितले.
- या ‘रॉयल कपल’चा या महिन्यात साखरपुडा झाला. 33 वर्षीय हॅरीने आपली आजी व राणी एलिजाबेथ-2 आणि राजघराण्यातील इतर जवळच्या मंडळींना विवाहाबाबत माहिती दिली.
- तसेच त्यांनी मेघनच्या पालकांचा आशीर्वाद घेतला. लग्नानंतर ही जोडी तेथे त्यांचे भाऊ विल्यम आणि त्यांची पत्नी केट त्यांच्या दोन मुलांबरोबर लंडनच्या केन्सिंग्टन पॅलेसमधील नॉटिंगहॅम कॉटेजवर राहतील.
- मार्कलचे पालक थॉमस मार्कल आणि डोरिया रॅगलँड यांनी म्हटले आहे की, ते या विवाहामुळे अत्यंत आनंदी आहेत आणि त्यांनी या जोडप्यासाठी सुखी जीवनाची इच्छा व्यक्त केली आहे.
दिनविशेष :
- प्रसिद्ध लेखक ‘गोपीनाथ तळवलकर’ यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला.
- 29 नोव्हेंबर 1959 हा दिवस मराठी इतिहासकार ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ यांचा स्मृतीदिन आहे.
- 29 नोव्हेंबर 1993 हा दिवस भारतीय उद्योजक ‘जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा’ (जे.आर.डी. टाटा) यांचा स्मृतीदिन आहे. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा