चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2017)
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अध्यादेश जारी :
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7 लाख 50 हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांना आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ मिळणार आहे.
- राज्य शासनाने या योजनेतील किचकट अटी वगळून सुधारित आदेश काढला आहे.
- तसेच ही योजना 1 ऑक्टोबर 2017 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच लागू राहील.
- मुलींचा जन्मदर वाढविणे, तिच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे व बालविवाहास प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने 1 जानेवारी 2014ला सुकन्या योजना सुरू केली. या योजनेचे राज्यात 26 हजार 862 लाभार्थी आहेत.
7 ऑगस्टला दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण :
- श्रावण पौर्णिमेच्या दिवशी (7 ऑगस्ट रोजी) होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
- तसेच हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप खंड; तसेच पश्चिम पॅसिफिक महासागरातून दिसेल. ग्रहणाच्या दिवशी मुंबईत सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चंद्रोदय होईल. त्या वेळी चंद्रबिंब 99.6 टक्के प्रकाशित दिसेल.
- रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजेच चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास सुरवात होईल.
- रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी ग्रहण मध्य होईल. त्या वेळी चंद्रबिंबाचा 24.6 टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. त्यानंतर ग्रहण सुटण्यास सुरवात होईल.
- रात्री 12 वाजून 49 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि चंद्रग्रहण सुटेल, असे सोमण यांनी सांगितले.
जलविद्युत प्रकल्पांस जागतिक बॅंकेची मान्यता :
- भारतास ‘काही बंधने’ पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले.
- सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता 330 मेगावॅट) व रतल (क्षमता 850 मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर ‘परिणाम’ होण्याची भीती या देशास आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन लवाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
- भारताने यासंदर्भातील आक्षेपांची छाननी करण्यासाठी एका अलिप्त तज्ज्ञ नेमण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
- सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी भारतास असल्याचे जागतिक बॅंकेने या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे.
काँग्रेसकडून ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ची स्थापना :
- दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उच्चशिक्षितांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ ची स्थापना केली आहे.
- देशातील राजकारणात आणि धोरण आखताना प्रोफेशनल तरुणांचाही विचार होणे गरजेचे असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सामील व्हावे असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
- उच्चशिक्षित तरुणांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना केली असून शशी थरुर आणि अन्य नेत्यांच्या पुढाकाराने प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे.
- ‘तुम्ही हुशार असाल आणि राजकारणात रस असेल तर तुम्ही ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसमध्ये सामील व्हा’ असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
- प्रोफेशनल काँग्रेसमध्ये तुम्ही केलेले काम थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले जाईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
- काँग्रेससाठी प्रचार मोहीमेची आखणी, धोरण तयार करणे तसेच जाहिरनामा तयार करण्याचे काम ‘प्रोफेशनल काँग्रेस’ करणार आहे. तसेच शशी थरुर हे प्रोफेशनल काँग्रेसचे प्रमुख असतील.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा