चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2016)
किरण शॉ यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जाहीर :
- बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांना फ्रान्स सरकारने ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
- जैवतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
- फ्रान्सच्या अध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान विशेष समारंभात या वर्षी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती बायोकॉनने दिली आहे.
- तसेच याबद्दल शॉ म्हणाल्या, ‘जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोग आणि मधुमेहावरील जैववैद्यकीय औषधे परवडण्यायोग्य किमतीत उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.’
- नेपोलियन बोनापार्ट याने 1802 मध्ये हा सन्मान सुरू केला होता.
- वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जातो.
- फ्रान्सच्या अध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येतो. याआधी यशवंत सिन्हा, नारायण मूर्ती, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, नंदिता दास, शाहरुख खान, संगीतकार बालमुरलीकृष्ण आणि दिवंगत अभिनेते शिवाजी गणेशन यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
गोलरक्षक गुरप्रीतसिंग सिंधू करणार भारताचे नेतृत्व :
- मुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये (दि.3) प्यूर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली.
- राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन यांनी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
- 24 वर्षीय गुरप्रीतसाठी कर्णधार म्हणून मोठा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल.
- तसेच नॉर्वे देशाच्या स्टाबीक एफसीकडून खेळताना गुरप्रीतने युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय असा लौकिक मिळवला आहे.
- हुकमी सुनिल छेत्रीच्या जागी गुरप्रीतची कर्णधारपदी निवड झाली असल्याने, अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलला या सामन्यात बाहेर असणार हे निश्चित आहे. नुकताच पॉलला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
- 1955 सालानंतर पहिल्यांदाच मुंबईत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना होत आहे. त्यावेळी मुंबईत भारत विरुद्ध सोवियत संघ यांच्यात सामना झाला होता.
- प्यूर्टो रिको संघाविरुध्द बाजी मारल्यास भारत जागतिक क्रमवारीत नक्कीच आपले स्थान सुधारु शकतो.
- सध्या भारत 152व्या स्थानी असून प्यूर्टो रिको 114व्या स्थानी विराजमान आहे.
नागपूरमध्ये मारबत मिरवणूक उत्साहात साजरी :
- ‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार जो फक्त नागपूरमध्येच साजरा होतो.
- तसेच या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो.
- मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.
- 1881 साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बंकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला.
- पुर्वी, बंकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.
भारत, इजिप्त सुरक्षा सहकार्य वाढविणार :
- आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवाद हा एक सर्वांत मोठा धोका असल्याचे नमूद करत भारत आणि इजिप्त यांनी या संकटाचा सर्व पातळ्यांवर सामना करण्यासाठी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांच्या दरम्यान (दि.2) झालेल्या चर्चेमध्ये दहशतवाद तसेच कट्टरता या दोन्ही आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी परस्परांमधील सुरक्षा सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला गेला.
- इजिप्त हा देश ईशान्य आशिया तसेच पश्चिम आशियामधील एक महत्त्वाचा दुवा आहे.
- दोन्ही देशांनी सुरक्षा व्यापार, प्रशिक्षण तसेच क्षमतानिर्माण वाढविण्याच्या निर्णयांसह अन्य अनेक क्षेत्रांतील संबंधांना चालना देण्यासाठी सहमती दर्शविली.
- दोन्ही देशांनी व्यापारी तसेच वाणिज्य संबंधही भक्कम करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही देशांत अनेक आर्थिक संधी उपलब्ध आहेत.
- तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इजिप्तचे अध्यक्ष सीसी, म्हणाले की आमचे सरकार द्विपक्षीय व्यापार तसेच गुंतवणूक सहकार्य वाढविण्याचा आराखडा तयार करण्याबरोबरच भारताशी भक्कम सुरक्षा सहकार्य विकसित करण्याच्या दिशेने काम करेल.
महाराष्ट्रात फोर्स वन दलाची स्थापना :
- महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, 140 अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.2) रोजी गोरेगाव येथे पार पडला.
- 26/11 च्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे स्वतंत्र फोर्स निर्माण करण्याचे ठरले व त्यानुसार फोर्स वनची स्थापना करण्यात आली.
- दलाकडे उपलब्ध असलेली आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान आणि जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके बघितल्यानंतर जोपर्यंत आपल्याकडे फोर्स वनसारखा सक्षम दल आहे, तोपर्यंत कोणत्याही हल्ल्यास महाराष्ट्र प्रत्त्युत्तर देऊ शकतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा